सावित्री उत्सव : सावित्रीबाई फुलेंचा वारसा बायका-मुलींनी चालवून स्वतंत्र विचारांचे व्हावे-सुमन पवार
मॅक्स महाराष्ट्र महिलांमध्ये शिक्षणाची ज्योत पेटवून महिलांना शिक्षणाचं दार उघडं करुण देणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस 'सावित्री उत्सव' म्हणून साजरा करत आहे. समाजातील सर्व स्त्रियांना शिक्षणाची वाट दाखवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा वारसा पुढे चालू ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण स्वतःपासून सुरवात करणे आवश्यक आहे.
३ जानेवारी २०१९
मी , वय वर्षे ७०.
रास्तापेठेतल्या इस्ज्रायल गल्लीत माझं बालपण गेलं, तर पलीकडल्या नानापेठेत माझं आजोळ.
त्या काळचं पुणं चांगलंच कर्मठ होतं पण आमच्या काशीद कुटुंबावर कर्मवीर भाऊरावअण्णा पाटील यांचा संस्कार होता आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे सावित्रीबाई फुलेंनी बहुजन मुलीच्या शिक्षणाचा पाया फार पूर्वीच घातला होता. माझ्या आईचं नावही सावित्रीबाई. ती मॅट्रीक शिकलेली होती. तिने स्वातंत्र्य लढ्यात गुप्त पत्रकं पोचवण्याची कामगिरी केली होती. म्हणून आम्ही बहिणी शिकलो आणि खंबीर झालो.
त्या काळाच्या चालीप्रमाणे लग्न आणि संसार केला तरी आपण समाजचं देणं लागतो हे मी कधी विसरले नाही. नव-याच्या खांद्याला खांदा लाऊन समाजकार्यात भाग घेतला. अजूनही काम करत आहे. स्त्रियांना शिक्षणाची वाट दाखवणाऱ्या सावित्रीआईचा वारसा मी पुढे चालवत आहे याचा मला अभिमान आहे.
त्यांनी दाखवलेल्या वाटेवर अधिकाधिक बायका-मुलींनी चालावे, स्वतंत्र विचारांचे व्हावे यासाठी ३ जानेवारी हा सवित्रिबाईंचा वाढदिवस मी मोठ्या प्रेमाने आणि अभिमानाने साजरा करणार आहे.
कपाळावर सावित्रीबाईंसारखी चिरी रेखणार आहे, दारात रांगोळी घालणार आहे, आणि उंबऱ्यावर पणती उजळून क्रांतीज्योतीची आठवण जागवणार आहे.
आपण सावित्रीच्या सर्व लेकींनी आपल्या लढाईचा हा वारसा जपलाच पाहिजे.