आज महिला पुरूषाच्या खांद्याला खांदा लावूल काम करत असल्याचं बोललं जातं. ज्या वेळी महिलांना फक्त चूल आणि मुल सांभाळावं अशी बंधनं होती त्या वेळी सावित्रीबाई फुले यांनी महिलांनी शिकावं या साठी शाळा काढली आज अनेक स्त्रिया साहित्य क्षेत्रात आपलं योगदान देत आहेत. अशा शिक्षणाच्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस मॅक्स महाराष्ट्र 'सावित्री उत्सव' म्हणून साजरा करत आहे. या मोहिमेत महाराष्ट्र कला साहित्य रसिक संस्थेच्या अध्यक्षा कवयित्री वृषाली विनायक या देखील सहभागी झाल्या आहेत व त्यांनी इतरांना देखील या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केल आहे.
सावित्री उत्सव
नमस्कार!
मी वृषाली विनायक
एम.ए.बी.एड.नेट.सेट
पदवी खरंतर आवर्जून सांगतेय!
कारण याच बळावर सन्मानाने जगतेय.
आज मी आत्मविश्वासाने स्वतःचं मत मांडते. बोलते, लिहिते, व्यक्त होते.
हा अधिकार मला शिक्षणाने दिला.
रस्ता सोपा नव्हता वा सहजा सहजी चालता येण्याइतपत सरळही नव्हता. तरीही समस्त स्त्रियांसाठी शिक्षणाची नवी पायवाट सुरू केली ती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी!
मी त्याच वाटेवर निष्ठेनं चालू बघतेय. माझ्या सोबत अनेक लेकींना याचं भान देतेय.
जगण्याच्या प्रत्येक अनुभवाला मी भिडतेय कारण शिक्षण व त्यातून आलेली सजगता.
आज तंत्रज्ञानाच्या युगात मी बोटांवर जग फिरवते तेव्हा अडसर बनणा-या व्हायरसना रिमुव्ह करण्याची ताकदही याच शिक्षणाच्या जोरावर मिळते.
समृद्धीचा हा वसा त्या माऊलीने
तुमच्या- माझ्या हाती दिलाय.
जपला पाहिजे!
तिच्या ऋणात राहणं हाच खरा आनंदय!
३ जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती आनंदाने साजरी करूया. फुलांनी घर सजवूया. पुस्तकांची भेट देऊया.
कुंकवाची रेघ (चिरा) खरंतर प्रतिकात्मक आहे. ती कपाळावर लावणं म्हणजे शिक्षणाचा प्रवास अखंड सुरू ठेवण्याचा निर्धारंय!
ज्ञानाच्या वाटेवर सोबत चालूया!
वृषाली विनायक
कवयित्री
अध्यक्ष, महाराष्ट्र कला साहित्य रसिक संस्था