दिल्ली आंदोलन : केंद्र सरकार आणि शेतकरी प्रतिनिधींमधील बैठक रद्द
दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दिशा आज ठरणार आहे. केंद्राच्या प्रस्तावावर काय भूमिका घ्यायची यासंदर्भात शेतकरी प्रतिनिधी निर्णय जाहीर कऱण्याची शक्यता आहे.;
नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा दुसरा आठवडा सुरु आहे. या दरम्यान केंद्रसरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये बैठकांच्या पाच फेऱ्या झालेले आहेत. नऊ तारखेला म्हणजे बुधवारी चर्चेची सहावी फेरी होणार होती, पण आता ही चर्चेची पेरी रद्द करण्यात आलेली आहे. भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी ही माहिती दिली आहे.
मंगळवारी संध्याकाळी शेतकऱ्यांनी पुकारलेला भारत बंद यशस्वी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत चर्चा केली. या चर्चे दरम्यान अमित शाह यांनी केंद्र सरकार कृषी कायदे मागे घेणार नाही, अशी भूमिका मांडली. पण लेखी स्वरूपात हा प्रस्ताव शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना पाठवला जाईल, त्यावर त्यांनी विचार करावा असे आवाहन देखील अमित शहा यांनी केलं होतं. त्यानुसार आता केंद्र सरकारच्या नवीन प्रस्तावाची आम्ही वाट पाहत आहोत आणि त्यावर चर्चा केल्यानंतरच पुढील भूमिका ठरवली जाणार आहे, अशी माहिती तिथे त्यांनी दिलेली आहे. गाझीपुर सीमेवर टिकैत यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली.
केंद्र सरकारने दिलेल्या प्रस्तावामध्ये कायदे रद्द करण्याबाबत काही नसेल तर आम्ही पुढील चर्चा कऱणार नाही, अशी भूमिका ऑल इंडिया किसान सभेचे जनरल सेक्रेटरी हाना मुल्ला यांनी मांडली.