उद्धव ठाकरेंचं आश्वासन हवेत, शेतकरी वर्षापासून मदतीच्या प्रतिक्षेत..
ठाकरे शब्दाला पक्के असतात, ठाकरे शब्द पूर्ण करतात... मात्र, उद्धव ठाकरे यांनी मागील अतिवृष्टीत एका गावाला भेट दिली होती. या गावकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण केला का? पाहा मॅक्समहाराष्ट्र चा स्पेशल;
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी पाहणी दौरे करत आहे. त्यात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, खरंच शेतकऱ्यांना या दौर्यातून काही मिळत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे? त्याच कारण म्हणजे गेल्यावेळी उद्धव ठाकरेंनी मदतीचे आश्वासन देऊन शेतकऱ्यांना रुपयाची सुद्धा मदत मिळाली नसल्याचे समोर आले आहे.
यावर्षी प्रमाणेच गेल्यावर्षी सुद्धा मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. तर निवडणूका तोंडावर असल्याने सगळ्याच पक्षातील नेत्यांनी मोठा गाजावाजा करत पाहणी दौरे केले. त्यावेळी आत्ताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा केला होता.
राज्यातील अनेक भागात यावर्षी अपेक्षेपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. हाताशी आलेले पीक गेले आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमधील माती वाहून गेली आहे. अनेक ठिकाणी जमिनीचे एवढे नुकसान झाले आहे की शेतकऱ्यांना पुढचे पीक घेतानाही अडचणी येणार आहेत. गेल्या काही दिवसात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्वच नेते शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी थेट बंधाऱ्यावर पोहचले होते. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात पाहणी केली. त्यांनतर मदतीची घोषणा सुद्धा केली. मात्र खरचं उद्धव ठाकरेंनी पाहणी करून अश्वासन दिलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे. त्याचे कारण म्हणजे गेल्यावेळी उद्धव ठाकरेंनी मदतीचे आश्वासन देऊन शेतकऱ्यांना रुपयाची सुद्धा मदत मिळाली नसल्याचे समोर आले आहे.
यावर्षी प्रमाणेच गेल्यावर्षी सुद्धा मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.ऑक्टोंबर-नोव्हेंबर 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील सुमारे 44 लाख 33 हजार 549 शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. तर निवडणुका तोंडावर असल्याने सगळ्याच पक्षातील नेत्यांनी मोठा गाजावाजा करत पाहणी दौरे केले.
त्यावेळी आत्ताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा केला होता. वैजापूर तालुक्यातील झोलेगाव येथील शेतात जाऊन त्यांनी शेतकऱ्यांची विचारपूस केली. तसेच मदतीचे आश्वासन सुद्धा दिली. आमचे सरकार येताच 25 हेक्टरी मदत करण्याचे सुद्धा म्हणाले. मात्र आतापर्यंत या शेतकऱ्यांना कोणतेही मदत मिळाली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
तर याच गावातील कैलास काकडे यांचेही त्यावेळी 8 एकर जमिनीवर लावलेले पीक पूर्णपणे उध्वस्त झाले होते. अद्रक पूर्णपणे पाण्याखाली होती. कापूस आणि मका अतिवृष्टीमुळे पूर्णपणे नष्ट झाले.त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी बांधावर जात त्यांना मदतीचे आश्वासन दिले होते. तुम्ही खचून जाऊ नका मी आणि माझा पक्ष तुमच्या सोबत असल्याचं सुद्धा त्यावेळी आवर्जून म्हणाले होते.
मात्र ठाकरे जाताच काकडे याच्या शेतात न अधिकारी आले ना कुणी लोकप्रतिनिधी फिरकला. तर महसूल विभागाने ढाब्यावर बसूनच पंचनामे केल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. शिवसेना प्रमुख स्वत: येऊन मदत करणार असल्याचे म्हणल्याने काकडे यांना सुद्धा काही तरी मदत मिळेल ही अपेक्षा होती. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा या शेतकऱ्याला अजूनही कोणतेही मदत मिळाली नाही. काकडे यांच्याप्रमाणेच याच गावातील शेतकरी जिंदलसिंग राजपूत यांची परिस्थिती आहे. गेल्यावेळी त्यांनी मका,कापूस आणि तूर लागवड केली होती. मात्र अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. नेत्यांच्या दौऱ्यात मिळणारे आश्वासन राजपूत यांना सुद्धा मिळाले. राजपूत आपली व्यथा मांडताना म्हणतात की, उद्धव ठाकरे यांनी आम्हाला मदतीचे आश्वासन दिले होते. मक्याला फुटलेले कोंब त्यांनी स्वतः हातात घेऊन पाहिले होते. तर नुकसानभरपाईसाठी शिवसेना आणि मी स्वतः प्रयत्न करू असेही ते म्हणाले होते. मात्र कोणतेही शासकीय मदत मिळाली नाही. पीक विमा सुद्धा 3 हजाराच्या वर मिळाला नाही. त्यामुळे ठाकरे यांचे आश्वासन पोकळ ठरले असल्याचं सुद्धा राजपूत म्हणतात.
ज्ञानेश्वर कनमले यांना सुद्धा गेल्यावर्षी झालेल्या नुकसानीची भरपाई अजूनही मिळाली नाही. उद्धव ठाकरे यांनी सरसकट 25 हजारांची मदत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र 25 हजार सोडा 25 रुपये सुद्धा आम्हाला मदत मिळाली नसल्याचं कनमले म्हणतात.तर ठाकरे गेल्यानंतर कुणीच आलं नाही.पंचनामे सुद्धा झाली नाही. त्यामुळे आत्तातरी काही मदत मिळावी अशी अपेक्षा आम्हाला असल्याचंही ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंचे पुन्हा दौरा मात्र...
गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आहे. गेल्यावेळी त्यांनी मात्र शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची मागणी केली होती. तसेच सरसकट 25 हजार मदत घ्यावी अशी मागणीही केली होती. आता यावेळी सुद्धा त्यांनी पाहणी दौरा केला. विशेष म्हणजे यावेळी उद्धव ठाकरे सत्तेत असून खुद्द मुख्यमंत्री आहे. त्यामुळे भरीव मदत शेतकऱ्यांना मिळेल अशी सर्वांनाच अपेक्षा होती. मात्र गेल्यावेळी आपण केलेल्या मागणीचाच त्यांना विसर पडला आणि तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना देण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
विमा कंपनीबाबत ठाकरेंची भूमिका अन्...
गेल्यावेळी भाजपसोबत सत्तेत असताना उद्धव ठाकरे यांनी पीक विमा कंपनीच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली होती. एवढंच नाही तर थेट मुंबईतील विमा कंपन्या फोडण्याची धमकी सुद्धा दिली होती. मात्र आता ते मुख्यमंत्री असताना विमा कंपन्याबाबत त्यांची गेल्यावेळची आक्रमक भूमिका कुठे गेली,असा सवाल विरोधक उपस्थित करत आहे. विशेष म्हणजे प्रशासनाचे पंचनामे जवळपास संपत आले असताना विमा कंपनीची प्रतिनिधी अजूनही शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेले नाहीत. त्यामुळे गेल्यावेळी आपल्या दौऱ्यातून पीक विमा कंपनीच्या विरोधात डरकाळी फोडणारे वाघ आता का शांत झाले हा प्रश्नच आहे. विमा कंपन्यांच्या मुजोरीला लगाम घालण्याची भाषा केली गेली होती. मग आता सरकार सत्तेत येऊन ८ महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. करुन दाखवलं म्हणणाऱ्या ठाकरे सरकारने आता खरंच शेतकऱ्यांसाठी काही तरी करुन दाखवण्याची गरज आहे.