प्रवासाचा शीण आणि जेटलॅग या दोहोंच्या त्रासामुळे आणि संध्याकाळी वेळेवर भेटू की, नाही अशा कुशंकेने आम्हाला लवकरच जाग आली. उठल्यावर जाणवलं की, डोकं प्रचंड दुखतं आहे आणि ऋतु बदलामुळे अंगाची लाही लाही होत आहे. प्रचंड ईछाशक्तीच्या जोरावर मी मरसीच्या भेटीसाठी तयार होवू लागले. यामध्ये प्रामुख्याने तिला घेतलेले खास भारतीय बनावटीचे दागिने, शेला, सुवनीर्स अश्या अनेकविध वस्तूंचे पोतडेच प्रथम बाजूस काढलं; मग लगबगीने तयारी केली आणि 8 वाजायची आतुरतेने वाट पाहू लागले. बरोबर पावणे आठला स्वागतकक्षातून फोन खणाणला; आम्ही खाली गेलो, "ओ माय स्वीट इंडियन सिस्टर" असे म्हणत मरसीने मला गळामिठी मारली; ती आणि मर दोघेही जेवणासाठी आम्हाला एका अप्रतिम अश्या जपानी रेस्टॉरंटमध्ये घेवून गेले. जौमा मागणं येणार होता.
आम्ही शाकाहारी आहोत हे ध्यानात ठेवून तिनं बरोबर जेवण मागवलं होतं. अत्यंत चविष्ट असे ते अन्न पाहून आमची भूक भडकली नसती तरच नवल. सुशी तर इतके स्वादिष्ट होते की, अव्याकाडोसोबत मी ते दोनदा चाखले. जेवताना गप्पांचा फड चांगलाच रंगला. एक तर कतालान लोकं जेवणाचे भोक्ते. कमीत कमी 3-4 ते तास जेवणासाठी मोडतील. त्यात आम्ही जवळपास 5 वर्षांनी भेटत होतो. त्यामुळे कीती बोलू आणि कीती नको असं झाले होतं. काळाच्या खुणा स्पेनवरही दिसत होत्या आणि पर्यायाने या कुटूंबावरही. पाच वर्षापूर्वी पहिलेली मर आता कमालीची देखणी दिसत होती. उंच, गोरीपान, परीसारखे सोनेरी केस, वागण्यातला मार्दव, सतत गुणगुणनारी; मोठी गोड छोकरी. सारखी बापाच्या गळ्यात पडून "पापी पापी" म्हणत हळूच आईचाही मुका घेणारी. कतालनमध्ये वडीलाना पापी म्हणतात. तीच्या या कौतुक सोहळ्यात आता आम्हीही सामिल झालो होतो. भेटी पाहून 4 डोळे मोठ्या आनंदाने लकाकले. तीनेही गच्च मिठी मारत मला स्पॅनिश भेटी दिल्या. रात्र उतरत गेली तशा गप्पाही उत्तरोत्तर रंगत गेल्या. शेवटी आईस्क्रीमने सांगता झाली आणि टॅक्सीतून आम्ही हॉटेलवर परतलो. रात्र थोडी आणि सोंगे फार असे असल्याने दुसऱ्या दिवशीचं प्लॅनिंग करणं खूप निकडीचं होतं. मन जरी आतूर असले तरी, रात्र थकलेली असल्यानं केवळ तीन ठिकाणे पहायची असे ठरवून निद्रादेवीला कॉल केला, यावेळेस आली बाई ती तातडीने.
आधी म्हटल्याप्रमाणे युरोपियन देशात नियम भारी. त्यामुळे सकाळची न्याहारी साधारण 7: 30 ते 10 पर्यंतच, याकरीता स्पेनमध्ये असेतोवर सकाळी साडेपाचला उठायचे असा नियम लावून घेतला होता. त्याचा प्रमुख फायदा असा की, न्याहारी नंतर रूमवर न येता खालच्या खाली शहर पहायला जाता येत असे. आज न्याहारीच्या दालनात अठरापगड जातीचे लोकं होते. एकाच वेळी फ्रेंच, कतालान, इंग्लीश असे संवाद ऐकू येत होते. टेबलावर वेगवेगळे चीज, केक्स, पाव, क्रोसन्थस, ओम्लेटस, मशरूम्स, बीफ, मटण, सुका मेवा, योगुर्ट्स, दूध, कॉफी शीतपेये यांची रेलचेल होती. आम्ही लगबगीने खाणे उरकले व 92 नंबरच्या बसची वाट पाहत उभे राहिलो.
आता थोडेसे बार्सिलोना विषयी - मुख्यतः रोमन सिटी असलेले हे शहर युरोपियन राष्ट्रात पॅरीस, लंडन व स्विसनंतर पर्यटकांना आकर्षून घेणारं मुख्य केंद्र आहे. इथं कतालान भाषा ही मायबोली, स्पॅनिश नव्हे. मुळात हे शहर वसवले फोनीसीयन्स व कारथाजीनीयन्स यांनी. याचं मूळ नावं होतं बारसीनो, कदाचित तत्कालिन राज्यकर्ता हमीलकार बारसा यांच्यावरुन ठेवले गेलेले. इथं रोमन्स आले ख्रिस्तापूर्व पहिल्या शतकात आणि त्यांनी इथे आपली राजधानी स्थापली. नंतर आले विसीगोथस आणि त्यांनी शहराचे नामकरण केले "बारसीनोना". मग आले मुरस. जवळपास पुढची 100 वर्षे. तद्नंतर मात्र फ्रँक्सने आक्रमण केलं आणि खऱ्या अर्थानं स्पॅनिश राज्यक्रांतीला सुरुवात झाली. या काळात शहराचे मुल्कि विभाग, जिल्हे झाले आणि इथेच "कतालान" भागाचा उदय झाला. मधल्या काळाचा इतिहास मी देत नाही पण इतकेच नमूद करते की, 19व्या शतकातल्या औद्योगीक क्रांतीनंतर बार्सीलोनाला परत पुनरुज्जीवन प्राप्त झाले. सध्या 1,620,943इतकं क्षेत्रफळ असलेली बार्सीलोना ही स्पेन मधील दुसऱ्या नंबरची सिटी आहे आणि स्वायत्त कतालानची राजधानी आहे.
तर असे 2000 पूर्व प्राचीन शहर पहायला आम्ही या प्रसन्न सकाळी बाहेर पडलो होतो आणि बसची प्रतीक्षा करते होतो. आज आम्ही 3 प्रमुख इष्ट स्थळांना भेटी देण्याचे योजिले होते. पार्क गल, सगरदा फॅमिलीया आणि प्लस्सा कतलुनीया...बसमध्ये चढल्यावर आम्ही हातातले T 10 तिकीट दोनदा मशीन मधे पंच केले व मार्गस्थ झालो. या देशांत एक सोय खूपच छान आहे. हे तिकीट बरोबर दहा वेळा तुम्हांला बस किंवा मेट्रोसाठी वापरता येते. मग भले तुम्ही कुठल्याही रूट वरुन चढा ! बस पुढं जात होती तस माझं मनही फुलपंखी झालं होतं. मनात उत्सुकता होती पुढील टप्प्याची. सो बाय आज जरा फिरुन घेते...क्रमश