स्पेन डायरी - भाग 2

Update: 2017-02-24 14:35 GMT

गाडी मार्गस्थ झाली आणि माझे विचारचक्रही सुरू झाले. या खेपेस तिथं जाण्यास माझा मुख्य उद्देश होता स्पेनची राजधानी माद्रीद पाहणे. या खेरीज जिथं फेस्टिवल होता असे सान खवीएरे सुद्धा पुन्हा एकदा डोळे भरून पहाणे; झालच तर व्यॅलेनशीया, बारर्सीलोना ईत्यादी ठिकाणी भटक्याची भ्रमंती... काही प्रमुख ठिकाणे मनात आणि कागदावरही टिपून ठेवली होती. विचाराचे वारु धावत असताना विमानतळ आल्याचे उमगलेच नाही. घाईने ट्रॉली आणून त्यावर सामान लादले आणि पळतच चेक इनसाठी धावले. माझी फ्लाइट लुफ्तान्सा एअरलाइन्सची होती. त्यामुळं त्या काऊन्टरवर माझी वर्णी लावली. पुढं हा लांबलचक क्यू होता; क्षणभर मला कळेचना की मी रेशनच्या लाइनीत आहे की विमानतळवर? फ्लाइट रात्री 12. 55 ची होती आणि चेक इन झाल्यावर इंमिग्रेशनची रांग पाहून मी उद्या पोहोचते की काय असा संभ्रम झाला; असो चेकइन, इंमिग्रेशन सारे सोपस्कार पार पडले आणि ठरलेल्या 71नंबरच्या गेट जवळ मी आरामात बसून वायफायने फेसबुक पाहत बसले;

गम्मत अशी होती की गेट 71 हे नेमके तिरके होते आणि तिकडे दोन लुफ्तान्सा ची उड्डाणे होती; इथेच माझे दुर्लक्ष झाले, सगळे लोक बसून आहेत म्हणून मी ही निर्धास्त नव्हे गफिल राहिले; सहज म्हणून मानवर केली तर एके ठिकाणी वेगळा क्यू सपंत आलेला दिसला; चौकशीअंती कळले माझ्या फ्लाईटचं बोर्डींग कद्धीच सुरू झालं होतं. बापरे माझी पाचावर धारण बसली व मी एका उडीतच ट्रॉली फरफटत, धडपडत तिकडे गेले. मनात म्हटलं की बोर्डींग चुकवलं असत तर केवढ्याला पडले असते सारे खटले? विमानात शिरतानां हवाईसुंदरी इतकी गोड हसली की झालेला सारा शीणवटा क्षणात दूर झाला....पट्टा बांधला, डोळे मिटले आणि स्पेनची दिवास्वप्न पाहण्यात गुंग झाले...

डोळा नुकताच लागला होता. इतक्यात गोड हसलेली हवाई सुंदरी हलकेच हाताने स्पर्श करीत जेवणाच विचारीत होती; हवा तो आहार घेतला आणि समोर असलेल्या टीवीवर काहीकाळ चित्रपट पाहत बसले. माझं हे विमान व्हाया जर्मनी बार्सीलोनाला जाणार होतं. त्यामुळं केबीन क्रू सगळा जर्मनच होता; मीही माझ्या क्षणाच्या सखी बरोबर मोडक्या तोडक्या जर्मनीत बोलून इंप्रेशन मारले. तीही भारी, मला चक्क तुझे केस किती छान, स्किनची तारीफ़ आणि मुख्य म्हणजे माझ्या भारत देशाची तारीफ; मग काय माझी कळी खुललीच की. सगळा प्रवासच सुकर वाटू लागला. बाजूला एक मारवाडी कुटुंब बसलं होतं, आईला अजिबात इंग्रजीचा गंध नव्हता. पण, तिची मुलगी तिला खूप मदत करत होती. ते फिरायला जर्मनीस चालले होते. खूप छान वाटलं की अजूनही अशा मुली आहेत ज्या आपल्या आईला कमी लेखत नाहीत त्यांच्या शिक्षणावरून. माझ्या डाव्या बाजूला पूर्ण मद्यपान करणारा कम्पू बसला होता. आणि निर्लज्जपणे परत परत हवाई सुंदरीकडे मद्य मागत होता; आपण आपल्याच देशाचे असे करून नाक ठेचतो याची गंधवार्ताही त्याना नव्हती. शेवटला त्यांना मेल क्रू येवून दरडावून गेला. तेंव्हा प्रकरण थंड झाले. मी मात्र लांबलचक प्रवासात जेरीस आले होते. नीद्रेने कधी माझ्यावर गारूड केलं कळलही नाही. जाग आली तेंव्हा जर्मनी विमानतळावर उतरायची वेळ झालेली. भारतीय वेळेनुसार पहाटेचे 3 वाजत होते तीथ मात्र सकाळचे साडेसहा चक्क; आम्ही खाली उतरलो, सोपस्कार आटोपल्यानंतर फ्री कॉम्प्युटर असतात जागोजागी तिथं चेहरा पुस्तक उघडून बसलो, पुढच्या उड्डाणाला अवकाश होता त्यामुळे फ्री कॉफी न वाचता येणारा जर्मन पेपर व चेहरा पुस्तक जिंदाबाद

....क्रमश

डॉ. मनिषा कुलकर्णी

Similar News