स्पेन डायरी भाग - 1

Update: 2017-02-16 18:40 GMT

पूर्वी पासून स्पेन बद्द्ल एक सुप्त आकर्षण होते. त्यामुळे जेंव्हा दुसऱ्या वेळी तिथे जायचे सुनिश्चित झाले, तेंव्हा श्यँगन व्हीझाच्या खूप कट्कटी म्हणून तिकिटे व पर्यायानं व्हीझा सुद्धा एजेंटकडे देण्याचे ठरवले. दादरच्या राजाराणी ट्रवेल्सकडे जाण्याचा तद्दन मूर्खपणा मी करून बसले. गणेश पूजेला कूजका नारळ तशी काही अंशी माझ्या या सहलीची सुरुवात झाली. कारण या साहेबांना सदर व्हीजा करीता कीती दिवस आधी अर्ज द्यायचा असतो इथपासून ते तिकिटे कशी काढावी यांची काहीही माहिती नसताना आमचे आगावू पैसे घेवून बसले आणि कुठल्या तरी सब एजेंटला घेवून मला मात्र नाकी नवू आणले. पैसे अडकले असल्याने "आदळआपट" करता येत नव्हती आणि फजीती म्हणजे ज्या दिवशी बायो मॅट्री म्हणजेच व्हीजा आपॉइन्ट्मेन्ट होती त्यावेळेस दिवस कमी पडतात म्हणून सपशेल नकार घंटा मिळाली. जड अंतकरणाने मी घराकडे निघाले; कारण तिकिटे तर चक्क काढून झालेली; पार वडा झाला की माझा.....आता पुढे काय हा यक्ष प्रश्न भेडसावत होता मला

व्हीजा नाकारला गेल्यानं तिकिटं रद्द करण्यावाचून दुसरा पर्याय तूर्तास तरी मला दिसत नव्हता. बरं ज्या खास फेस्टिवलसाठी जात होतो त्या आयोजक मंडळीनी सुद्धा स्पेन ऍम्बसीला विनंती करून पाहीली होती. परंतु जुलै हा युरोपियन उन्हाळी सुट्ट्यांच्या महीना असल्यानं आणि ऍम्बसीही नियमांवर बोटं ठेवून असल्याने एकूणच माझी डाळ शिजणे कर्मकठीण दिसत होतं. अश्या हताश मनस्थितित असताना एका सोमवारी मला अचानक ट्रेड सेंटर मधून बोलावणं आला की ताबडतोब तुमचे कागदपत्र घेवून भेटा. ऍम्बसीनं हिरवा कंदील दाखवला आहे. ज्याची मी बिलकुल कल्पना केली नव्हती असे अकल्पीत होते हे; कारण जाणे निव्वळ आठ दिवसावर आले होते. ताशी 80कीमीच्या वेगानं गाडी हाकत मी वाऱ्याच्या गतीनं वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सला पोहोचले, तिथं सारे सोपस्कार अगदी बायोमेट्रीही पार पडली. पण व्हीजा मिळेल याची ग्वाही नव्हती. असो पहिला टप्पा तर पार पडला; आणि मूर्ख एजंटमुळे माझी पहिली तिकिटं रद्द करून परत महाग दराची तिकिटं घ्यावी लागली होती. तळ्यातमळ्यात अवस्था असताना जाणे सोमवारी आणि आज शुक्रवार तरी हातात काही नाही. माझा धीर खचत चालला होता आणि पुन्हा एकदा नशीबाने साथ दिली. चक्क संध्याकाळी हातात व्हीझा.......इथवर मी आशा सोड्ल्याने सामान बिलकुल भरले नव्हते. परत धावपळ, बॅगा भरणे, मोजक्या खाण्याची तयारी इत्यादी. हातात केवळ एक दिवस, रविवारी फॉरेन करन्सी मिळणे मुश्कील, सोमवारी कामावरून विमानतळवर धाव, जग्गनाथाचा पेलणे होते हे...सर्वात मोठी गंमत म्हणजे मी रात्री 9. 30 ला घर सोडणार तर 9 वाजले तरी फॉरेक्सचा माणूस करेन्सी घेवून आला नव्हता. मनात म्हटले ही वारी गाजणार बहुतेक....स्वामींचा धावा केला आणि घराबाहेर पडणार तोच दत्त म्हणून हा पैसे घेवून आला....भले शाबास म्हणून ओला गाडीत बसले....मान मागे टेकवली आणि आंररराष्ट्रीय विमानतळावर रवाना झाले......

क्रमश:

डॉ. मनिषा कुलकर्णी

Similar News