योगी आदित्यनाथ यांच्यापलीकडेही एक जग असणारच, हे मी स्वतःला सतत बजावत असतो. एके काळी ज्या राजकारण्याला आपण जाणीवपूर्वक दूर ठेवले होते, त्याच राजकारण्याने गेला आठवडाभर टीव्हीचा पडदा व्यापून टाकला आहे. सध्या अष्टौप्रहर आपण उत्तर प्रदेशच्या नविन मुख्यमंत्र्यांच्या कवेत गेलो आहोत. परिघावरचा हा राजकारणी, ज्या व्यक्तीला एकेकाळी आपण कट्टर हिंदुत्ववादी म्हणून दूर सारले होते, तीच व्यक्ती आज गोरखपूरची ‘पाईड पायपर’ ठरली आहे. आपल्याला या माणसाची प्रत्येक बारिकसारीक गोष्ट जाणून घ्यायची आहे, त्यांचा भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ...त्यांच्या मंदीराच्या आवारात त्यांनी किती गायी ठेवल्या आहेत, त्यांच्या परिसरातील मुसलमान त्यांच्यावर कसे प्रेम करतात, ते कसे अतिशय प्रामाणिक संन्यासी आहेत, अशा कितीतरी गोष्टी आपल्याला सांगितल्या जात आहेच. सगळी द्वेषपूर्ण भाषणे, जातीयवादी जहाल टीका आणि बेलगाम वर्तनं विसरुन जा. तो भूतकाळ होता. आता मात्र भगवी वस्त्र परिधान करणाऱ्या या माणसाविषयीच्या, जो उत्तरप्रदेशचे राजकारण बदलू शकतो अशा गोडगोड गोष्टी बनविण्यात आपण गुंग आहोत. ‘योगींना एक संधी तर द्या’, हा एकच नाद सध्या सोशल मीडियावर घुमतोय. उत्तरप्रदेशला गरज आहे ती रोमिओ-विरोधी पथकांची, मग त्याचा अर्थ पुरुषाने महिलेला गाडीवर मागे बसवून नेणे हे देखील जबरदस्तीची कृती मानणे का असेना... उत्तरप्रदेशला गरज आहे ती बेकायदेशीर कत्तलखान्यांवर बंदी आणण्याची, कारण ते बेकायदेशीर आहेत बरं.. मग काय झाले, जर कायदेशीर आणि बेकायदेशीर मधील सीमारेषाच पुसल्या गेल्या असतील आणि हजारोंचा रोजगार हिरावून घेतला जाणार असेल तर.... ‘तुंडे के कबाब’ (लखनऊ मधील प्रसिद्ध कबाब) विसरा, पहिल्यांदा गुंडांना पकडू या, हाच नवा मंत्र आहे.
गोवा राजकारणाच्या पलीकडेही नक्कीच एक जग असणार. निवडणुकांनंतर अपक्ष आणि छोट्या गटांना एकत्र आणून भाजप सरकार स्थापन करेल, हा विचार तरी कोणी केला होता का? आणि ते देखील त्यांच्यापैकी किमान एक जण तरी निवडणूकांपूर्वी उघडपणे भाजप विरोधक असताना...निवडणुकीच्या काळात सगळेच माफ असते आणि जर तुम्ही मांडवीच्या काठावर रहात असाल, तर मग जुना वैरभाव सहजपणे वाहूनही जातो, महत्त्वाचे असते ते सत्ता मिळविणे आणि मंत्रीपदाचे फायदे उकळणे.
उत्तराखंड राजकारणाच्या पलीकडेही एक जग असणारच. जवळपास सगळेच दलबदलू जिंकलेः अरे हेच ते विजय बहुगुणा ना, ज्यांची संभावना कालपर्यंत भ्रष्टाचारी आणि अकार्यक्षम म्हणून केली जात होती? पण आता काळजीचे कारणच नाही, ते आता नविन मंत्रिमंडळात आहेत आणि ते सत्तेत असताना ज्यांनी त्यांच्यावर प्रचंड टीका केली, त्यांच्याच खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. मणिपूरमध्येही हेच होत आहे. तिथे सुद्धा सरकार आणि विरोधक यांच्यातील सीमारेषा शुद्ध राजकीय संधीसाधूपणामुळे अगदी धुसर झाल्या आहेत.
आणि हो, एक जग पंजाबच्यापलीकडेही असेल. पंजाबमध्ये खरे म्हणजे काँग्रेसने, खास करुन राज्यातील शेतकरी आणि तरुणांना, दिलेल्या मोठमोठ्या आश्वासनांवर सगळे लक्ष केंद्रीत होणे आवश्यक होते, त्याऐवजी चर्चेच्या केंद्रस्थानी दिसत आहेत ते नवज्योतसिंग सिद्धू.... मंत्रिपदावर असताना सिद्धू यांनी सेलिब्रिटी टीव्ही होस्ट म्हणून काम करावे का नाही, यावरच सगळ्यांचे लक्ष असल्याचे दिसत आहे. खरं म्हणजे, राजकारण आणि टीव्ही यामधील हितसंबंधांचा प्रश्न उकरुन काढण्याचे कारणच कायः जेंव्हा सांप्रत राजकारणच एक हास्यास्पद उद्योग बनून राहिला असेल, तेंव्हा कदाचित सिद्धूदेखील छोट्या पडद्यावरच्या विनोदी कार्यक्रमात सहभागी होऊ शकतील.
आणि राजकारण आणि त्यासंबंधींच्या बातम्या या पलीकडच्या जगाचा माझा शोध थांबला तो माझे पहिले प्रेम असलेल्या क्रिकेटपाशी येऊन... हिमालयाच्या कुशीत वसलेल्या धर्मशाला येथे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. फलंदाजी आणि गोलदांजी या दोन्ही विभागात भारतीय खेळाडूंनी केलेली तुफान कामगिरी अनुभविण्यात मी दोन दिवस घालविले. भारतीय संघाच्या या कौतुकास्पद कामगिरीने मला प्रचंड आनंद झाला. एक चाहता म्हणून तर मी स्वप्नांच्या दुनियेची सैरच करुन आलो, क्रिकेटला मिळालेली हिमच्छादीत शिखरांची एक विलक्षण किनारही याला होती. क्रिकेटपटू हे आपले खरे हिरो आहेत, देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे भारतीय तरुण, जे केवळ गुणवत्ता आणि कठोर मेहनतीच्या सहाय्यानेच यशोशिखरावर पोहचले आहेत. ना जात, ना धर्म, ना फुटीरतावाद, ना मतपेढ्या, ना सत्तेचे शॉर्टकटस्, फक्त आणि फक्त गुणवत्तेचे प्रदर्शन... आपले राजकारण हे भ्रष्ट आणि असभ्य आहे. आपले क्रिकेट हे रोमांचकारी आणि तेजस्वी आहे. आपल्याकडे कदाचित जगातील सर्वात अकार्यक्षम शासन व्यवस्था असतील, पण त्याचवेळी कसोटी क्रिकेटमध्ये आपण जगात नंबर वन आहोत! त्यामुळे आपल्या भ्रष्ट नेत्यांना विसरुन जा आणि त्याऐवजी आपल्या या अद्भूत क्रिकेटपटूंचा विजय साजरा करा. मग ते काही दिवसांसाठी का असेना... विश्वास ठेवा, त्यातूनच आपल्याला निखळ आनंद मिळू शकेल.
ता.कः भारतात या क्षणी बहुतेक जण भगव्या रंगालाच किंमत देत आहेत. माझ्यासाठी, आपल्या संघाला प्रोत्साहन देताना, अजूनही महत्वाचा ठरतोय तो सगळ्यांना एकत्र आणणारा तिरंगा, नेहमीसारखच गौरवशाली! त्यामुळेच थॅंक्यू विराट, जडेजा, अश्विन, अजिंक्य, राहूल, चेतेश्वर, साहा, उमेश, मुरली, करुण, भुवी आणि टीम इंडियाचा प्रत्येक सदस्य... तुम्ही हा गुढीपाडवा अविस्मरणीय ठरविलात! थॅंक गॉड फॉर क्रिकेट.
राजदीप सरदेसाई
अनुवाद – सुप्रिया पटवर्धन