माझ्या बाबासाहेबांना छळले कोणी?
गोळवलकर गुरूजींनी बाबासाहेबांची जात का काढली? कोणाच्या छळाने बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म सोडला? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विरोध का होता? वाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तानं ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांचा संघाचा बुरखा फाडणारा लेख ;
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 'पांचजन्य' हे मुखपत्र आता ऑनलाइनही दिसते. या ऑनलाइन पोर्टलवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना, नेहमीचा खोडसाळपणा केला गेला आहे. बाबासाहेबांना नेहरूंमुळे मंत्रिपदाचा राजीनामा कसा द्यावा लागला? राज्यघटना तयार करताना कॉंग्रेसने आंबेडकरांना कसा त्रास दिला? बाबासाहेबांना गांधी- नेहरूंनी कसे छळले इत्यादी.
मुळात, राज्यघटना तयार करताना गांधी, नेहरू आणि आंबेडकर सोबत होते, हे ऐतिहासिक सत्य आहे. पण, राज्यघटना तयार होत असताना संघ काय करत होता? संघाच्या मुखपत्रात, 'ऑर्गनायझर'मध्ये, तेव्हा कोणते लेख प्रकाशित होत होते? डॉ. रामचंद्र गुहांनी ते विस्ताराने मांडले आहे. संघाचे मुखपत्र काय मांडत होते? -
"या देशाची राज्यघटना एकच आहे. मनुस्मृती. आणि, या राज्यघटनेचे शिल्पकार आहेत महर्षी मनू. स्वयंघोषित 'ऋषी' आंबेडकर आणि 'महर्षी' नेहरू या देशाची राज्यघटना बदलू पाहाताहेत.", असे 'ऑर्गनायझर'ने तेव्हा म्हटले होते. ३० नोव्हेंबर १९४९ च्या 'ऑर्गनायझर'च्या अंकात तर तसा थेट अग्रलेख आहे. त्याशिवाय त्यांच्या अन्य अंकांतही असे उल्लेख आहेत. स्वतः गोळवलकर गुरूजींची अधिकृत भाषणे उपलब्ध आहेत, ज्यामध्ये तसे उल्लेख आहेत. बाबासाहेबांची जात काढली जात होती. अशा जातीच्या माणसाने राज्यघटना लिहू नये, यासाठी मोर्चे आयोजित केले जात होते.
हे लोक आज बाबासाहेबांविषयी बोलताहेत.
बाबासाहेब स्वतःला हिंदू मानत होते, तेव्हा हिंदू महासभा आणि आरएसएस काय करत होते?
तबलिगींचा उल्लेख आपण आता ऐकला. बाबासाहेबांनी १९२७ मध्ये 'तबलीघ'चा उल्लेख केला आहे. हिंदू असो वा मुसलमान, दोघांच्याही अशा कट्टर चळवळींबद्दल बाबासाहेबांनी चिंता व्यक्त केलेली दिसते. आणि, अशा कट्टर चळवळींमुळे अस्पृश्यांचे आणि स्त्रियांचे सर्वाधिक नुकसान होणार आहे, असे बाबासाहेब म्हणतात.
मुख्य म्हणजे, आपण हिंदू आहोत. आणि, हिंदू धर्म मानवतावादी व्हावा, हे माझे काम आहे, अशा पद्धतीने त्यांनी अस्पृश्यतेच्या प्रश्नाकडे पाहिलेले दिसते. महाडच्या सत्याग्रहाची तुलना बाबासाहेब फ्रेंच राज्यक्रांतीशी करतात. समता आणि बंधुता ही मूल्ये हिंदू धर्मात आली, तर हिंदू धर्म मानवतावादी होईल, असे त्यांनी त्या भाषणात सांगितले. अस्पृश्य आणि सर्वजातीय महिला यांना मानवी हक्क मिळणे कसे अपरिहार्य आहे, हेही सांगितले. त्यासाठी हिंदू स्पृश्य बांधवांनी पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहन केले.
मात्र, हिंदू महासभेला अथवा आरएसएसला यापैकी कशातच रस नव्हता. 'लोकसंख्या महाकाय दिसावी, म्हणून ते सर्वांना म्हणतात 'हिंदू', पण त्यांना फक्त ब्राह्मणांचे राज्य हवे आहे', अशी खंत बाबासाहेबांची होती.
बाबासाहेबांचा विरोध ब्राह्मणांना नव्हताच. ब्राह्मण्याला होता. २५ डिसेंबर १९२७ ला महाड सत्याग्रहात आंबेडकरांचे सहकारी गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे यांनी मनुस्मृती दहन करण्याचा प्रस्ताव मांडला होता. तर, पर्वती मंदिर सत्याग्रहात एस. एम. जोशी, ना. ग. गोरे हे मुख्य सहकारी होते.
१ जुलै १९२७ च्या 'बहिष्कृत भारत'च्या अंकात बाबासाहेब लिहितातः "ब्राह्मणेतरच आज ब्राह्मणी व्यवस्थेचे खरे वाहक झाले आहेत. ब्राह्मण आमचे वैरी नाहीत. ब्राह्मण्यग्रस्त लोक आमचे वैरी आहेत. ब्राह्मण्यरहित ब्राह्मण आम्हास जवळचा वाटतो. उलट ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मणेतर हा आम्हाला दूरचा वाटतो."
पण, आरएसएस आणि त्यांच्या ब्राह्मण्यग्रस्त भावंडांनी बाबासाहेबांचा एवढा छळ आरंभला की हा धर्म सोडण्याशिवाय दुसरा पर्याय बाबासाहेबांपुढे राहिला नाही.
१९२७ ला महाडच्या सत्याग्रहात बाबासाहेब 'ज्ञानेश्वरी'तील ओव्या उद्धृत करतात आणि हे हिंदूंचे संघटन आहे, अशी भूमिका घेतात. अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात, पुण्याच्या पर्वती मंदिरात सत्याग्रह करतात. १९३० ला बाबासाहेब नाशिकच्या काळाराम मंदिरात सत्याग्रह करतात. तेव्हाही, हिंदू धर्मसुधारणेची भूमिका मांडतात. पण, हिंदू महासभा, आरएसएस आणि त्यांची पिलावळ बाबासाहेबांना त्रस्त करून सोडते.
'अस्पृश्यांना नाइलाजाने धर्मांतर करावे लागेल', असा इशारा बाबासाहेब १९२७ ला देतात. मग आठ वर्षांनी येवल्यात हिंदू धर्म सोडण्याची घोषणा करतात. त्यानंतर २१ वर्षांनी संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात बुद्धाची वाट चोखाळतात.
एवढी वर्षे संघ काय करत होता? हिंदुत्ववादी काय करत होते? कारण, हे मुळी हिंदुत्ववादी नव्हतेच. ब्राह्मण्यग्रस्त धर्मांध होते ते.
ज्या 'हिंदू कोड बिला'ला मंजुरी मिळत नाही, म्हणून बाबासाहेबांनी केंद्रातल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला, त्या बिलाला विरोध केला कोणी? या बिलाच्या विरोधात संघाने रस्त्यावर, संसदेच्या प्रांगणात हिंसक निदर्शने केली. नेहरू- आंबेडकरांचे पुतळे जाळले. आता 'ट्रिपल तलाक'च्या निमित्ताने मुस्लिम महिलांच्या अधिकारांविषयी बोलणारे संघवाले तेव्हा काय करत होते? हिंदू महिलांना या विधेयकाने बळ मिळेल, अशी भीती त्यांना होती. ज्यांनी हिंदू कोड बिलाला हिंसक विरोध केला, त्यांना बाबासाहेबांच्या राजीनाम्याचे दुःख आता का वाटते आहे?
स्वतःला हिंदू मानणा-या बाबासाहेबांना हिंदू धर्मातून यांनीच बाहेर ढकलले.
स्वतःला 'सनातन हिंदू' म्हणणा-या गांधींना
यांनीच मारून टाकले.
आज मात्र यांना गांधी प्रातःस्मरणीय आणि बाबासाहेबांचा फार कळवळा.
हे खरे चेहरे समजल्याशिवाय, हा लढा नीट समजणार नाही.
- संजय आवटे