लाईफ इन्शुरन्स - का? किती? कुठला? कसा?

जीवन विमा का आवश्यक आहे? किती रुपयांचा आवश्यक आहे? जीवन विमा कोणत्या कंपनीचा घ्यावा आणि तो कसा घ्यावा? याविषयी लेखक डॉ. विनय काटे यांचा लेख;

Update: 2022-08-30 05:01 GMT

युरोपातल्या व्यापाऱ्यांनी कुणा एका व्यापाऱ्याच्या जहाजाचे प्रवासात नुकसान झाले, लूट झाली तर ते नुकसान सर्वांत मिळून वाटून घेता यावे व त्याचा व्यापार बुडू नये यासाठी जोखमीची गणना करून ती रक्कम सर्वांमध्ये समान वाटली. यालाच पुढे इन्शुरन्स हे नाव पडलं आणि त्या रकमेला प्रीमियम म्हणण्यात आले. जहाजांपासून सुरू झालेला इन्शुरन्स पुढे वाहने, आयुष्य, आरोग्य, शरीराचा एखादा अवयव, शेती, व्यवसाय अशा वेगवेगळ्या ठिकाणी वापरात यायला लागला. यावरून इन्शुरन्सचे दोन प्रकार पडले, एक लाईफ इन्शुरन्स आणि दुसरा जनरल इन्शुरन्स.

लाईफ इन्शुरन्स कशासाठी?

आपल्या आजूबाजूला आपण असंख्य उदाहरणे पाहतो जिथे घरातली एकमेव कमावती व्यक्ती अचानक मरण पावते आणि त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांवर आर्थिक दारिद्र्याची कुऱ्हाड कोसळते. मरण हे शाश्वत आहे आणि त्याची वेळ सांगून येत नाही, म्हणून जगातला प्रत्येक कमावता माणूस त्याच्या अकाली मरणामुळे कुटुंबाची होणारी वाताहत थांबवण्यासाठी स्वतःच्या आयुष्याचा विमा (लाईफ इन्शुरन्स) करून घेतो.

लाईफ इन्शुरन्स किती रुपयांचा घ्यावा?

कमावत्या व्यक्तीच्या अकाली मरणानंतर मिळणारी विम्याची रक्कम ही कुटुंबाला उर्वरीत आयुष्यासाठी पुरेशी असायला हवी हा ठोकताळा खूप महत्वाचा आहे. उदाहरणार्थ समजा आज माझ्या म्हणजे डॉ. विनय काटेच्या घरातला राहणीमान, शिक्षण व इतर खर्च हे सगळे मिळून महिना 50 हजार रुपये जात असतील, तर माझ्या मृत्यूनंतर विम्याची मिळणारी रक्कम ही इतकी असावी की तिचे फक्त व्याज महिन्याला 60-70 हजारपेक्षा जास्त असावे. जेणेकरून 50 हजारांत माझे घर चालेल आणि उरलेले 10-20 हजार परत गुंतवून त्याच्या व्याजातून महागाईच्या दरावर तोडगा निघू शकेल. थोडक्यात माझ्या माघारी माझ्या कुटुंबाची 50 हजारांची दरमहा सोय करण्यासाठी मला किमान 1 कोटी रुपयांचा इन्शुरन्स काढावा लागेल. माझ्यावर जर समजा काही घरकर्ज असेल तर त्या 1 कोटीच्या रकमेत ती रक्कमही जोडून घ्यावे लागेल.

जीवन विमा कुठला घ्यावा?

बाजारात आज लाईफ इन्शुरन्समध्ये अनेक प्रकार उपलब्ध आहेत जसे की टर्म इन्शुरन्स, युनिट लिंक, एनडाउमेंट, मनी बॅक वगैरे वगैरे. यापैकी टर्म इन्शुरन्स हा एकमेव असा इन्शुरन्स आहे. ज्यात कमावता व्यक्ती मरेपर्यंत एकही पैसा आधी मिळत नाही. हा शुद्ध जोखीम निवारण करणारा इन्शुरन्स आहे. कमावता व्यक्ती मृत पावला तर मात्र त्याने ठरवलेली विम्याची रक्कम एकरकमी वारसांना मिळते. बाकी सगळे इन्शुरन्स हे थोडी जोखीम आणि थोडी गुंतवणूक या प्रकारातील आहेत.

विमा एजंट लोकांना तुम्ही भरलेल्या प्रिमियमवर टक्केवारीने कमिशन मिळते. जर वार्षिक प्रीमियम पाहिला तर टर्म इन्शुरन्स हा सगळ्यात स्वस्त असतो, त्यामुळे विमा एजंटला त्यात खूप कमी पैसे मिळतात. 1 कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स अगदी 8-10 हजार वार्षिक प्रिमियमला मिळतो व त्यात कमिशन 500 रुपये वगैरे असते. म्हणूनच विमा एजंट कधीही तुम्हाला टर्म इन्शुरन्स घेण्यासाठी आग्रह करत नाहीत. जिथे सर्वात कमी रकमेत तुम्ही तुमच्या कुटुंबाचे व्यवस्थित आर्थिक संरक्षण करू शकता. याऊलट विमा एजंट तुम्हाला मनी बॅक, युनिट लिंक वगैरे योजना विकून तुम्हाला व्याजाचे, परताव्याचे गाजर दाखवतो, ज्यात एजंटला जास्त पैसा मिळतो. नेहमी लक्षात ठेवा की, इन्शुरन्स हा सर्वात आधी जोखीम निवारण करण्याचा प्रकार आहे, त्यामुळे त्यातून व्याजाची अपेक्षा कधीही ठेवू नका. पहिला इन्शुरन्स हा टर्म इन्शुरन्सच हवा. नंतरही पैसे शिल्लक राहत असतील तर दुसऱ्या योजनांत लावा. जर तुमच्याकडे टर्म इन्शुरन्स नसेल तर तुमच्याकडे लाईफ इन्शुरन्स असून नसल्यासारखा आहे हे ध्यानात ठेवा.

जीवन विमा कसा घ्यावा?

टर्म इन्शुरन्स काढण्याआधी IRDA (विमा नियामक आयोग) च्या वेबसाईटवर जाऊन वेगवेगळ्या विमा कंपन्यांचा Claim Settlement Ratio (विमा दाव्यांची पूर्तता) पाहून घ्या. ज्यांचा claim settlement ratio सगळ्यात जास्त, आणि त्यातल्या त्यात प्रीमियम कमी अशा कोणत्याही कंपनीचा टर्म इन्शुरन्स तुम्ही घेऊ शकता. अवघ्या 8-10 हजारांत तुम्ही स्वतःच्या कुटुंबाचे आयुष्य विनाजोखमीचे बनवू शकता. तुम्ही स्वतःसुद्धा विमा कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन टर्म इन्शुरन्स स्वस्तात विकत घेऊ शकता, त्यासाठी कुठल्याही एजंटची गरज पडत नाही.

ध्यानात राहू द्या की EMI वर iPhone घेण्यापेक्षा, तीर्थक्षेत्री जाऊन देवाच्या दारी संकटापासून वाचवण्यासाठी प्रार्थना करण्यापेक्षा एखादा चांगला टर्म इन्शुरन्स घेणे जास्त शहाणपणाचे आणि stylish आहे.

Tags:    

Similar News