अन् बाल मनातलं बदल्याचं धगधगतं अग्निकुडं थंड झालं!
पाकिस्तानने आपल्या मामाला गोळ्या घातल्या म्हणून बदल्याच्या भावनेतून आपणही सैन्यात सामील व्हायचं आणि आपला बदला पूर्ण करायचा असं स्वप्न उराशी बाळगणारे पत्रकार मतीन शेख यांनी माघार का घेतली ? जाणून घेण्यासाठी वाचा मतीन शेख यांच्या विचारांचा बदलता मार्ग..
मामा 'कमाल काझी' कारगील युद्धात शहिद झाले. इयत्ता दुसरीत होतो तेव्हा मी. सापटणे (ता.माढा) या मामाच्या गावीच शिकायला होतो... युद्ध, मृत्यू, भारत - पाकिस्तान नेमकं कायच समजत नव्हतं तेव्हा. पण लांब कुठे जम्मू काश्मीर मध्ये आर्मीत जवान असलेल्या मामाला गोळी लागलीय इतकं समजायचं. गावात शोककळा पसरलेली. काझी वाड्यात सतत रडण्याचा आवाज यायचा. मामाला विमानातून आणणार आहेत. परत गाडीतून सापटण्याला आणणार आहेत. हे शब्द कानी पडत होते. मी मात्र दिवसभर चौकात किंवा स्टॅण्ड वरील लिंबाखाली बसायचो. आर्मीची कपडे घातले लोक गाडीतून यायचे अन् तिथे विचारायचे 'कमाल काझी का घर कहॉ है?' मी त्यांच्या जवळ जायचो.'चलो मेरे साथ' असं म्हणत मी गाडी पुढे धावयचो. त्यांना काझी वाड्यात घेवून यायचो....
ही लोकं आली की अधिकच रडा रड सुरु व्हायची. सर्व जण दुःखात बुडालेले. मामांच काही दिवसात गावी शव आलं. अंत्यसंस्कार झाले. सगळ्यांचं आकांताने रडणं मला अजुन ही आठवतं. ते डोळ्यात मनात साचलंय. पुढे चौथी पाचवीत गेल्यावर समजायला लागलं कि पाकिस्तानच्या सैनिकांनी त्यांना गोळ्या घालून मारलं. मनात बदल्याची आग उमटत होती. आपण ही भारताचं सैनिक होणार अन् बदला घेणार; हे मनात घोळत होतं. चांगली कुस्ती खेळलो तर थेट आर्मीत घेतात असं ऐकुन होतो.
अचानक बॉर्डर सिनेमा पाहिला. आठवी नववीत असेल तेव्हा. सिनेमा पाहून रडू कोसळलं. देश, वैर, सीमा, युद्ध, संघर्ष, सत्ता अन् या द्वंद्वात्मक स्थितीत जवानाचा नव्हे तर एका माणसाचा जाणारा जीव किती वाईट असतो. त्याच्या अशा मृत्यू नंतर कुटूंबाचे, प्रियजनांचा काय आकांत होतो हे प्रखरतेने जाणवायला लागलं. तेव्हा हे युद्ध नको. हा वैर भाव नको. ही बदल्याची आग नको. असं वाटायला लागलं. मी सैनिक व्हायचा विचार तिथेच सोडून दिला. मला त्या रक्तरंजीत युद्धाचा द्वेष वाटू लागला.
आता जेव्हा कधी एखादा जवान शहिद होतो तेव्हा मी खूप अस्वस्थ होतो. ती बातमी पाहण्याचं, त्यावर बोलण्याचं टाळतो. सहन होत नाही ते... शेवटी युद्ध वाईट असतं. यात शत्रू नाही तर माणूस मारला जातो. राष्ट्र, धर्म या निर्थक संकल्पना वाटतात मला. ज्ञानोबांची, विवेकानंदांची विश्वालाच आपलं घर समजण्याची कल्पना मोठी आहे. सीमा, राष्ट्रवाद या सर्व सियासी गोष्टी आहेत. बाकी आज कारगील विजय दिवस, कमाल मामाला शहिद होऊन वीस बावीस वर्ष झाली. भारतासाठी त्यांनी प्राण दिले. ते अमर आहेत.
मतीन शेख...