जमिनी हकीकत आणि विचारकर्मी

अनेक वेळा विचारकर्मी जमिनी हकीकत समजून न घेता आपला विचार मांडतात. मात्र, त्यामुळं जमिनी सत्य दुय्यम होतं का? त्याचा नक्की काय परिणाम होतो? वाचा संजीव चांदोरकर यांचा लेख;

Update: 2021-07-10 05:28 GMT

विसाव्या शतकातील राजकीय अर्थशास्त्रातील (पोलिटिकल इकॉनॉमी) परिभाषा व वर्गीकरण एकविसाव्या शतकात तोकडे पडत आहे. उदा. अमुक देश किंवा पक्ष किंवा नेता समाजवादी आहे की भांडवलशाही विश्लेषण करण्यासाठी, ज्ञाननिर्मितीसाठी परिभाषा व वर्गीकरण लागते. मान्य. आपल्यासमोर येणाऱ्या जगाचे, घटनांचे, प्रक्रियांचे वर्गीकरण करायला माणूस शिकला. त्यातून सर्वच क्षेत्रात प्रगती साधण्यास त्याला मदत झाली आहे हे मान्य. पण काही वेळा हे विचारकर्मी मोठी चूक करतात.

जमिनी सत्याला (ग्राउंड रिऍलीटीज) त्यांना अवगत झालेल्या परिभाषेत पकडण्याचा व वर्गीकरणात कोंबण्याचा आटापिटा करतात. जमिनी सत्य नेहमीच प्राथमिक स्थानावर असते. त्याचे शब्दांकित वर्णन व वर्गीकरण दुय्यम स्थानावर असते. हे फक्त राजकीय अर्थशास्त्र या विषयापुरते मर्यादित नाही तर अनेक सामाजिक शास्त्रांबाबत, विषयांच्या बाबतीत होऊ शकते.

सर्व पंचेंद्रियांनी आपल्या आजूबाजूच्या जगाचे निरीक्षण करणे, माहिती शोषून घेणे, आकडेवारी गोळा करणे, ती पडताळून पहाणे व त्यावर स्वतंत्र विचार करण्याची कुवत अंगी बाणवणे याला शॉर्टकट नाही. आणि हे प्रत्येक पिढीला गमभन सारखे शिकावेच लागते. माझ्या वडिलांनी गमभन शिकले आहे ना? आता मी कशाला शिकायला पाहिजे असे म्ह्णून चालत नाही.

गेली काही दशके विविध राष्ट्रांमध्ये अर्थव्यवस्थांमध्ये वैविध्यपूर्ण प्रयोग होत आहेत. मला स्वतःला त्या सर्वांची माहिती आहे असे नाही, पण जाणवतेय. उदा. चीनच्या राजकीय अर्थव्यवस्थेत जे काही सुरु आहे त्याचे चिकित्सक विश्लेषण केलेच पाहिजे. पण त्याचा नतिजा काहीजण चीनचे समर्थक व काहीजण विरोधक असा कॅम्पमध्ये नाही झाला पाहिजे. म्हणूनच चीनमध्ये भांडवलशाही आहे का समाजवाद अशा काळ्यापांढर्‍यातील चर्चा टाळल्या पाहिजेत.

त्यातून हाताशी काही लागणार नाही. हा भाग झालाच पण Unsustainable जागतिक भांडवलशाहीला पर्याय उभा राहिला पाहिजे. असे वाटणाऱ्या व अर्थव्यवस्था अधिक मानवकेंद्री व्हाव्यात अशी तळमळ उरी बाळगणारे गटातटात विभागले जातील. हे आपल्याला परवडणारे नाहीये.

नवीन परिभाषा विकसित करावी लागेल, नवीन वर्गीकरण करावे लागेल. परिभाषेचे व वर्गीकरणाचे प्रयोग करावे लागतील. प्रयोग करणाऱ्यांना लेबले न लावता काय म्हणायचे आहे ते समजून घ्यावे लागेल.

संजीव चांदोरकर (९ जुलै २०२१)

Tags:    

Similar News