"दाभोळकर आजोबा देव मानू नका असं म्हणत का?" : लक्ष्मी यादव

"दाभोळकर (narendra dabholkar) आजोबा देव (god) मानू नका असं म्हणत का?""नाही. ते म्हणत की देवाच्या नावावर जे तुम्हाला फसवतात, जादू (magic)आहे असे म्हणतात त्याला फसू नका. जे तुम्ही खरं मानता, तुम्हाला जे सांगण्यात येतं ते एकदा चेक करून बघा खरं आहे का.. बस्स! एवढंच म्हणत ते." नरेंद्र दाभोळकर यांच्या जयंतीदिनी लक्ष्मी यादव यांनी मांडलेल्या मनमोकळ्या भावना..;

Update: 2022-11-01 07:44 GMT

कबीर ( वय आठ, तराजूत ठेवलेली जेंडर चिन्हाची (मुलग्याच्या) जागा त्याला बदलायची होती.), "मला वाटतं या चिन्हाला उलटं केलं की तराजूचा बॅलन्स होईल." पृथ्वी (वय चार, मुलगीच्या चिन्हाला हात लावत) "नाही, मला या चिन्हाला उलटं करायचं आहे. मग होईल बॅलन्स." "बॅलन्स होण्यासाठी मुलगीच्या चिन्हाला वर करायची गरज आहे. मुलग्याच्या चिन्हाला खाली केलं तर बॅलन्स बिघडेल. दोघेही वर, पुढे गेले पाहिजेत."





 


"खरंच हे तावीज हातात बांधल्यावर परीक्षा सोपी जाते?"
"तुला काय वाटते?"
 " नसेल जात. कशी जाईल?"
 " हो ना. अभ्यास करशील तर जाईल परीक्षा सोपी."
 "तुम्हाला वाटते देव असतो, पण मला वाटत नाही."

"ज्यांना वाटतं काळी जादू असते, भूत असते त्यांना ते आजोबा जसे एक्सपरिमेंट करून दाखवायचे तसे आपणही त्या लोकांना ते दाखवू. मग तेही समजतील खरं काय आहे ते. माझ्या बोलण्यात लॉजिक आहे आई."




 


वरील चर्चा रंगली होती, "कसोटी विवेकाची "हे प्रदर्शन यशवंतराव चव्हाण केंद्र, नरिमन पॉईंट, मंत्रालय, मुंबई इथे पाहायला आलेल्या चिमुकल्यांची. दाभोलकरांची लायब्ररी, त्यांचे हलते जीवनचरित्र, फोटो पाहून सगळं मानवीय वाटतं आहे त्यांना. (या प्रदर्शनात दाभोळकरांचं एका लहान मुलासोबतचं एक अप्रतिम पेंटिंग आहे. हे पेंटिंग पाहून " एवढ्या गोड आजोबांना कसं मारू शकतं कुणी, का मारलं " असे आणि इतर अनेक प्रश्न तिथले पेंटिंग्ज पाहून मुलांना जरूर पडतील. पडू द्या. आपण त्याचं उत्तर जरूर देऊ. उत्तर देताना त्यांच्यातील आस्था, संवेदनशीलता जागृत राहील याचीही काळजी घेऊच आपण. त्यांना हेही सांगूच की जे काही लोक अंधश्रद्धा बाळगतात, कर्मकांडे करतात, हिंसक विचार बाळगतात त्यांच्याशी कायम संवादत राहावं लागेल.)

मात्र तिथे जे गंडेदोरे, जटा, तावीज पाहून प्रश्नही खूप पडले आहेत. वास्तविक पाहता पडलेल्या प्रश्नांची उत्तरे माहित आहेत त्यांना. " हे सगळं लोक खरं कसं काय मानू शकतात? असं खरंच कसं होऊ शकेल?" त्यांना हे तार्किकपणे कळते आहे की हातात तावीज बांधून वजन वाढणार नाही बाळाचे, त्यासाठी पोषक अन्न खावं लागेल. त्यांना प्रश्न आहेत 'मोठे लोक असं कसं करू शकतात, अशा गोष्टींवर विश्वास कसा ठेऊ शकतात'. विवेकी, तर्कशुद्ध विचारांची गरज पुन्हा पुन्हा सांगावी लागेल. अशावेळी मुलांना हेही सांगूया की मोठे लोक अशा गोष्टींवर विश्वास ठेऊन त्या गोष्टी का करतात...जमेल तशी जात धर्माधारीत समाजरचना सांगून धर्मांधताही त्यांना समजेल अशा भाषेत सांगूच शकतो आपण. हे सांगण्याची वेळ आपोआप येण्याची वाट पाहत न बसता आपल्यालाच सुरुवात करावी लागेल हे सांगायला हे प्रदर्शन या सुरुवात करण्याचे यथोचित ठिकाण आहे. हिंसक विचार मोठ्या प्रमाणावर मुलांपर्यंत पोहोचवण्याची सुरुवात दुसर्‍या बाजूने केव्हाचीच झाली आहे.




 


मुलांच्या विवेकी विचारांना पुढे घेऊन जायचं आहे. दाभोलकर गेले, मात्र मागे करोडो दाभोलकर आहेत...या मुलांच्या रूपाने...आपल्या सगळ्यांच्या रूपाने. आपल्या घरातील मुलांना जरूर घेऊन जाऊया. त्यांनाही खरा इतिहास सांगायची गरज आहे. 'माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमचे सुरू ' ठेवण्यासाठी 'ले मशाले चल पडे है ' हे जगाला सांगूया.( हे हिंसक युद्ध नसलं, हिंसेच्या विरोधातील अटळ संघर्ष आहे.) या मुलांच्या कोऱ्या करकरीत विचारांना आहे तसे जपण्यासाठी, "असे विचार करणारे तुम्ही एकटे नाहीत, आम्हीही आहोत" हे ठामपणे सांगण्यासाठी मुलांना या ठिकाणी जरूर नेऊया. खरं तर मुलं नैसर्गिकरीत्या विवेकाच्या वाटेवर असतात, त्यांना आपल्या साथीची गरज असते. दाभोलकर, कलबुर्गी, गौरी लंकेश, पानसरे यांना त्यांच्या समाजपोषक विचारांमुळे गोळ्या झाडून मारण्यात आल्याचं पाहून आपली मुलं विचलित होतील क्षणभर, त्यावेळी आपला हात त्यांच्या हातात असू देऊ खंबीरपणे! "घाबरु नकोस, आम्ही सोबत आहोत" असं प्रत्यक्षात सांगणं टाळून चालणार नाही, ती गरज आहे काळाची. आपली मुलं विवेकी विचारांचीच असणार आहेत, त्यांच्या 'सुरक्षित' भविष्यासाठी एकत्र येऊया. समाज बदलासाठी, शहाणं होण्यासाठी वाचन आणि लिखाणाची आत्यंतिक गरज पुन्हा अधोरेखित करुया.

चला तर मग या विचारांना बळकटी देण्यासाठी एकदा प्रदर्शनाला भेट देऊया."संख्याही" वाढवावी लागेल, दाखवावी लागेल. विवेकी विचार वाढले, तर आपोआप ते विचार, मानसिकता नाहीशी होईल. मार्ग खडतर, आव्हानात्मक आणि संयमाची परीक्षा घेणारा नक्कीच आहे. म्हणून एकमेकांचे हात हातात असण्याची कधी नव्हे इतकी सध्या जास्त गरज आहे.

समाजविघातक शक्ती एकवटत आहेत, आपल्यालाही समाजपोषक, विवेकी आणि अहिंसक विचारांची पेरणी करण्यासाठी एकत्र जमावं लागेल. " काय फरक पडतोय नाही गेलं तर प्रदर्शनाला, माझे विचार तर विवेकी आहेत ना?, मुलांना नेण्याची काय गरज आहे, त्यांना आम्ही विवेकी विचार सांगतच असतो, शिवाय त्यांना झेपेल का हे सगळं( मुलांना 'लॉजिक' समजतं आणि मुलांच्या क्षमता अफाट असतात. फक्त त्यांच्या पातळीवर येऊन बोलावं लागेल.)?" असं म्हणून आता चालणार नाही. प्रत्यक्षात एकत्रित जमावं लागेल, विचारांची साथ द्यावी लागेल. आणि सगळ्यात महत्वाचे अलका, प्राजक्ता, दिप्ती, संयोगिता ताई, विद्याताई, जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि अशा प्रत्यक्ष राबणाऱ्या असंख्य हातांना प्रत्यक्षात हात द्यावे लागतील, सोबत करावी लागेल, बळ द्यावं लागेल. हे प्रदर्शन म्हणजे संविधांनावर विश्वास असणार्‍या आणि समाज परिवर्तन करू इच्छिनार्‍या व्यक्तींचे एकत्र येण्याचे, संवादाचे ठिकाण बनवूया. याचा विस्तार वाढवूया.

मुंबईतील प्रदर्शनाची आजची शेवटची तारीख आहे. वेळ सकाळी ११ ते ६ आहे.(एका मित्राने विचारले, "कसे आहे प्रदर्शन?" माझे उत्तर," एका अर्थाने या प्रदर्शनाची चिकित्सा करताच येणार नाही, त्यासाठी ते नाहीच; कारण ते मौल्यवान आहे. त्याचं असणंच, अस्तित्वच आश्वासक आहे.")




 


त्यानंतर हे प्रदर्शन पुण्यात असेल...तिथून महाराष्ट्रभर. तिथेही 'जमलं तर जा ' म्हणणार नाही, हक्काने 'जमवून जाच ' असं मी म्हणेन, हीच आपली बांधिलकी असणार आहे आणि त्यांना आणि स्वत:ला दिलेल्या वचनाची आठवणही होईल इथे आल्यावर.... त्यांनी आपलं आयुष्य पणाला लावलं, आता आपली पाळी..पसाभर नसेल शक्य कदाचित पण तसूभर तरी! एवढं नक्कीच करू शकतो आपण. करायलाच हवंय. शिवाय सध्याच्या असहिष्णू, जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या काळात हे आपले कर्तव्यच नाही तर काळाची गरजदेखील आहे.

माणूस मरतो, मारला जातो, विचार मरत नाही हे अगदी खरे, म्हणून तर बुद्ध, कबीर, गांधीजी, दाभोळकर..आजही जीवंत आहेत आपल्या सगळ्यात. पण माणसं मरूच नयेत, मारलीच जाऊ नयेत यासाठी एकत्र जमूया.

फार काही नाही, निदान इथे आल्यावर अनुभवयास येणारी शांती, सुकून हृदयात खोलवर साठवण्यासाठी आणि जाताना जगण्यासाठी, संघर्षासाठी अखंड ऊर्जा घेऊन जाण्यासाठी तरी नक्की याच!

©लक्ष्मी यादव

Tags:    

Similar News