खदखदणारं लक्षद्वीप आणि प्रफुल पटेलाचं व्हाया गुजरात कनेक्शन

गेल्या काही दिवसांपासून प्रफुल के.पटेल या व्य़क्तीमुळं लक्षद्वीप चांगलंच चर्चेत आहे. कोण आहेत हे प्रफुल के.पटेल? काय घडतंय लक्षद्वीपमध्ये? पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांचा प्रफुल पटेल यांच्याशी काही संबंध आहे का? मोहन डेलकर प्रकरणात प्रफुल पटेल यांचं नाव का घेण्यात येतंय? या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी वाचा... रविंद्र पोखरकर यांचा लेख;

Update: 2021-05-29 11:38 GMT

Courtesy -Social media

केंद्रशासित प्रदेशांतील प्रशासकीय कारभार करण्यासाठी २०१४ पर्यंत भारतीय प्रशासन सेवेतील IAS अधिकाऱ्याची नेमणूक केली जात असे. मोदी सरकारला संविधानिक परंपरा-संकेत यांचे वावडेच असल्याने त्यांनी ते तोडून पहिल्यांदा दीव-दमण या केंद्रशासित प्रदेशात प्रशासकीय कारभार पाहण्यासाठी राजकीय व्यक्तीची नेमणूक केली.

ती व्यक्ती कोण..? तर प्रफुल के.पटेल..! कोण हे पटेल..? तर पूर्वी अमित शहा गुजरातचे गृहमंत्री असताना जेव्हा त्यांना सीबीआयने अटक केली होती तेव्हा त्यांच्या जागी मोदींनी नेमलेले हे पटेल! असं खूप जुनं हे साटंलोटं आहे.

मोदी-शहांच्या सर्व बऱ्यावाईट काळाचे आणि त्यातील 'सर्व' घटनांचे हे पटेल साथीदार-साक्षी आहेत. मोदी सरकारने प्रशासकीय कारभाराच्या सोयीचं कारण पुढे करून दादरा-नगरहवेली हा केंद्रशासित प्रदेशही दीव-दमणला जोडला आणि 'दादरा-नगरहवेली-दीव-दमण' या इतक्या मोठ्या सामायिक केंद्रशासित प्रदेशाचे सर्व प्रशासकीय अधिकार सोपवले कुणाकडे ? तर या पटेलकडे ! तसे या पटेलांचे भरपूर काळे किस्से आहेत...

पण ताजा अजून सर्वांच्या लक्षात असेल. दादरा-नगरहवेली या प्रदेशाचे खासदार मोहन डेलकर यांनी काही काळापूर्वी मुंबईत येऊन आत्महत्या केली. त्यांच्या मुलाने आरोप केलाय की प्रफुल पटेल माझ्या वडिलांना प्रचंड मोठ्या खंडणीसाठी सतत टॉर्चर करीत होते. खंडणी नाही दिली तर भयंकर अपराधांचे खोटे गुन्हे नोंदवून तुला आयुष्यभर जेलमध्ये सडवीन अशी धमकी पटेलांनी माझ्या वडिलांना दिली होती. त्या तणावातूनच त्यांनी आत्महत्या केली आहे. डेलकरांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पंधरा पानी प्रदीर्घ सुसाईड नोटमध्येही हे सर्व लिहिलेलं आहे. परंतु जशी जज लोया केस दाबली गेली तसेच हे मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणही फाईलबंद झाले !

मी आज हे सगळं का लिहितोय..? तर लक्षद्वीप सध्या चर्चेत आहे. त्याचे कारण म्हणजे मोदी-शहांचे जीवश्च-कंठश्च याच प्रफुल पटेलांना आधीच त्यांच्यावर दादरा-नगरहवेली-दीव-दमण इतकी मोठी जबाबदारी असताना लक्षद्वीपची प्रशासकीय जबाबदारीही त्यांच्यावरच सोपवण्यात आली!

कुठे दीव-दमण आणि कुठे लक्षद्वीप? पण मोदी है तो कूच भी मुमकिन है..!

लक्षद्वीप हा निदान कालपर्यंत तरी मानवी हस्तक्षेपापासून बऱ्यापैकी वाचलेला आपला नितांतसुंदर बेटसमूह.. निसर्गाची अद्भुत रचना.. परंतु या पटेल महाशयांमुळे आता तिथली नैसर्गिक सुंदरता, तिथलं शांत जनजीवन, तिथला सलोखा हे सगळंच धोक्यात आलंय.

या पटेल महाशयांनी तिथे गेल्यापासून वर्षानुवर्षे तिथे वसलेल्या स्थानिकांना उखडून टाकण्याचे प्रयत्न सुरु केलेत. त्यांना तिथल्या अद्भुत समुद्र किनाऱ्यांवर पंचतारांकित पर्यटन संस्कृती निर्माण करायचीय. त्यासाठी मोठमोठे रिसॉर्ट उभारायचेत. आणि म्हणून त्यासाठी तिथल्या स्थानिक कोळ्यांच्या वस्त्या किनाऱ्यांवरून उखडल्या जाताहेत. इथे पूर्वीपासून अधिक प्रमाणात केरळी-मल्याळी मुस्लिम. त्यांच्यात मद्यपान वर्ज्य.. त्यामुळे या बेटावर एक अपवाद वगळता अन्यत्र मद्यबंदी होती. या पटेल महाशयांनी ती बंदी उठवली आणि सर्वत्र मद्यपान खुलं केलं!

बीफ हे तिथल्या स्थानिक जनतेचं परंपरागत आणि रोजचं खाणं.. या महाशयांनी तिथे मद्यपान खुलं केलं आणि बीफबंदी लादली! आपल्या बेबंद कारभाराविरोधात कोणी आवाज उठवू नये आणि उठवलाच तर त्याला जेरबंद करणं सोपं व्हावं म्हणू नवीन 'अँटी गुंडा ऍक्ट" आणून लागू केला! खरंतर तिथला क्राईम रेट हा देशातील सर्वात कमी.. अगदीच नगण्य आहे. यापूर्वी बाहेरून तिथे येणाऱ्या प्रत्येकाला सक्तीचे क्वारंटाईन आणि टेस्ट सक्ती होती. त्यामुळे तिथे कोरोना प्रसार अजिबात नव्हता. या पटेल महाशयांनी हे नियम रद्द करून फक्त आरटीपीसीआर टेस्टचा रिपोर्ट घेऊन या बस.. असे जाहीर केले. आज तिथे साडेचार हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत !

पटेलांच्या या सर्व उचापतींमुळे इवल्याशा त्या शांत बेटावरील सामाजिक-पर्यावरणीय वातावरण ढवळून निघालंय. लोक संतप्त आणि अस्वस्थ आहेत. शरद पवार यांनी या सगळ्या घडामोडींबाबत मोदींना पत्र लिहिलंय कारण तिथला खासदार राष्ट्रवादीचा आहे. पण पवार साहेबांच्या पत्रानेही काही विशेष फरक पडेल असं वाटत नाही कारण पटेल तिथे जे काही करताहेत ती मोदी-शहांचीच नीती आहे. देशातील हजारो-लाखो माणसं कोरोनात ऑक्सिजन-व्हेंटिलेटर-इंजेक्शन अभावी तडफडून मरत असताना ज्यांनी सेंट्रल व्हिस्टा आणि स्वतःच्या राजेशाही निवासस्थानाचे बांधकाम न थांबवता उलट त्याला अधिक गती दिली त्यांचे हृदय दूरवरच्या लक्षद्वीपवासियांच्या वेदनांनी थोडेच हेलावणार आहे..?

रविंद्र पोखरकर

Tags:    

Similar News