डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जगातील पहिला पुतळा उभारणारे भाई माधवराव बागल
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जगभरात अनेक पुतळे आहेत, पण त्यांचा जगातील पहिला पुतळा कुठे उभा राहिला, कुणी उभा केला, याची माहिती देणारा डॉ. श्रीमंत कोकाटे यांचा लेख....;
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराचे कट्टर समर्थक भाई माधवराव बागल यांचा जन्म कोल्हापूर या ठिकाणी झाला. त्यांचे वडील खंडेराव बागल हे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या राज्यात महसूल खात्यात अधिकारी व पुढे नामवंत वकील होते. भाई माधवराव बागल यांच्या आईचे नाव कमळाबाई होते. खंडेराव बागल हे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्या सत्यशोधक विचारांचा माधवराव बागल यांच्यावरती बालपणापासूनच पगडा होता. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यात माधवराव बागल हे बालपणापासूनच सक्रिय होते.
जातिव्यवस्था नष्ट व्हावी, समता प्रस्थापित व्हावी यासाठी माधवराव बागल यांनी समाजात प्रत्यक्ष उतरून काम केले. अस्पृश्यता हा मानवतेवरील मोठा कलंक आहे, ही त्यांची भूमिका होती. त्यांनी संपूर्ण हयात फुले शाहू विचारांसाठी समर्पित केले.
माधवराव बागल हे उच्चशिक्षित होते. ते जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून शिकले होते. ते नामवंत आर्टिस्ट होते. त्यांनी चित्रकलेत स्वतःची शैली विकसित केली. त्यांच्या कलेला शाहू महाराजांचा राजाश्रय होता. ते कलेचे मोठे उपासक होते. कोल्हापूर कलेवर त्यांनी विपुल लेखन केले आहे.
माधवराव बागल यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. संस्थानिकांच्या अधिपत्याखालील प्रजेच्या हक्कासाठी ते निर्भिडणे लढले. सत्यशोधक चळवळ, शेतकरी कामगार पक्ष त्यानंतर काँग्रस असा त्यांचा सामाजिक - राजकीय प्रवास आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचे मोलाचे योगदान आहे.
माधवराव बागल हे नामवंत पत्रकार होते. त्यांनी हंटर आणि अखंड भारत नावाचे नियतकालिक चालविले. त्यांनी अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, जातिभेद याविरुद्ध आवाज उठविला. त्यांची पत्रकारिता क्रांतिकारक होती. ते नामवंत लेखक होते. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. महात्मा फुले, शाहू महाराजांच्या आठवणी, स्वराज्याचे शत्रू , बहुजन समाजाचे शिल्पकार, कला आणि कलावंत, समाजसत्ता की भांडवलशाही, बेकारी आणि त्यावरील उपाय, मार्क्सवाद, सुलभ समाजवाद, माझा जीवनप्रवास इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिले.
भाई माधवराव बागल यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचे मोठे कौतुक आणि अभिमान वाटायचा. आज तर जगात अनेक ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे आहेत पण त्यांचा जगातील पहिला पुतळा कोल्हापुरातील महत्त्वाच्या बिंदू चौकात भाई माधवराव बागल यांनी ९ डिसेंबर १९५० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हयात असताना उभारला. सोबतच महात्मा फुले यांचाही पुतळा उभारला.
भाई माधवराव बागल यांना त्यांच्या कार्याबद्दल भारत सरकारने पद्मभूषण, महाराष्ट्र सरकारने दलितमित्र, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने डी. लिट. आणि शाहू स्मारक समितीने राजर्षी शाहू महाराज पुरस्काराने सन्मानित केले.
डॉ.श्रीमंत कोकाटे