भाजप छोट्या मित्रपक्षांचा वापर करून फेकून देते असे जाहीर व्यासपीठावर विधान करणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिठी मारत, थेट महायुतीचा झेंडा खांद्यावर मिरवत खूप पुढे निघून गेले. राजकारणात ऐन वेळी आणि ते हि निवडणुकीच्या काळात कोण काय करेल याचा नेम नाही. जानकरांची मिठी त्याचमुळे या गरमागरमीच्या वातावरणात लक्षवेधी ठरली आहे. याचे कारण ते महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी फक्त काही तास उरले असतांना फडणवीसांनी आपल्या जुन्या मित्रावर जादूची कांडी फिरवली आणि जानकर त्यांच्या गोटात सामील झाले. त्यामुळे शरद पवारांचा डाव असा अर्ध्यावर उघडा पडला कि सारेच चाट पडले. पवार माढ्यातून जानकर यांना उमेदवारी देणार होते. पण आता त्यांनाही वेळेवर उमेदवार शोधण्यासाठी धावाधाव करावी लागली.
जानकरांचा हा युटर्न पवारांना चांगलाच जिव्हारी लागला असेल पण पवारांनी सुद्धा वेळीच सावध पावले टाकत पुढची तयारी सुरु केलीय.कारण जानकर केवळ माढा लोकसभेचीच जागा लढणार नव्हते तर त्यांचा फायदा महाविकास आघाडीला आणि खास करून राष्ट्रवादीच्या पवार गटाला बारामतीत करून घ्यायचा होता. बारामतीतून जानकर यांनी २०१४ मध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांना ४ लाख ५१ हजार ८४३ अशी दुसऱ्या क्रमांकाची मते पडली होती. म्हणजे ४२ टक्के मते त्यांना मिळाली होती. तर जानकर यांनी माढ्यातून २००९ मध्ये थेट शरद पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना ९८ हजार ९४० अशी तिसऱ्या क्रमांकाची मोठ्या प्रमाणात मत मिळवली होती.
याचाच अर्थ स्वतःच्या हक्काच्या धनगर समाजसोबतच त्यांना इतर मते सुद्धा मिळवली होती.आणि हीच व्होटबँक त्यांच्या एकूण राजकारणासाठी कायम पूरक ठरत आली आहे. याचाच धसका महायुतीने घेतला. त्यातही भाजप उमेदवारांसाठी महादेव जानकर माढ्यात डोकेदुखी ठरले असते. आता जानकर यांना परभणीत उमेदवारी दिल्याचं जानकर यांनी स्वतःच उत्साहात जाहीर करून निवडणुकीची तयारी सुरु केल्याने भाजपने आणि पर्यायाने महायुतीने सुटकेचा निश्वास टाकला आहे. कारण बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांची गोची करणारे जानकर आता त्यांचा प्रचार मोठ्या जोमाने करणार आहेत.
परभणीत महादेव जानकार स्वतः उमेदवारी अर्ज भरतील आणि बारामती आणि माढ्यात ते सुनेत्रा पवार आणि रणजितसिंग नाईक निंबाळकर यांचा प्रचाररथ ओढतील. अशी रणनिती आता आखण्यात आली आहे. धनगर समाजाच्या मतांचं ध्रुवीकरण करण्यात शरद पवार बारामती आणि माढ्यात किती यशस्वी होतात यावर या दोन्ही जागांचं भवितव्य अवलंबून आहे. राहिला प्रश्न परभणीच्या जागेचा. इथे मराठा समाजाचे वर्चस्व आहे.मराठापाठोपाठ ओबीसी, दलित, मुस्लिम या मतांनाही निर्णायक समजले जाते.
वंजारी, धनगर समाजाची मते सुद्धा लक्षणीय आहेत. एवढेच नव्हे तर ती निवडणुकीत सुद्धा खूपच निर्णायक ठरतात.ज्या जानकरांची मदत घेऊन बारामती आणि माढाचा गड सर करण्याचे मनसुबे महायुतीने रचले आहेत. त्याच जानकरांना परभणीत विजय सुकर करण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनीही नक्कीच दिले असणार त्याशिवाय बारामती आणि माढा सोडून महादेव जानकर परभणीत फिरकणार नाहीत. कारण इथे संजय जाधव हे उद्धव गटाचे विद्यमान खासदार असून दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादीचे म्हणजेच आता अजित पवार गटाचे नेते राजेश विटेकर हे महत्वाचे नेते आहेत. आणि विटेकरांनी जाधवांना लढत देत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. आणि म्हणूनच अजितदादांनी परभणीच्या जागेवर आपला दावा कायम ठेवला होता.