माणसाला जनावर मानणाऱ्या माणसातील जनावर नष्ट होणार कधी ?
आम्हाला आरक्षण देता येत नसेल तर यांचे आरक्षण काढून घ्या अशी चर्चा आता सर्रास सुरू आहे. ज्या कारणासाठी आरक्षणाची संकल्पना पुढे आली ते माणसाला जनावर मानणाऱ्या माणसातील जनावर आज तरी नष्ट झालंय का वाचा सागर गोतपागर यांनी केलेले जातीयतेचे सखोल विश्लेषण;
“माझी आय दर्रोज रानात जायाची. मी मागं लागून तिच्याबर रानात जायाची. आय रानात दुपारपर्यंत काम करायची. खुडणी,काडणी, भांगलन आशी कामं आसायची. आय कुळवाड्याच्या बायांच्या पातीला पात लागून काम करायची. पण एकदा जेवायची सुट्टी झाली की आम्ही बाजूला बसायचो. मसराच्या भरडीच्या पाटीत आमाला जेवान वाढायची. कधी पाटी नसली तर एरंडाचं मोठं पान आणायचं. जमिनीवर मातीचं आळं करायचं. त्या आळ्यात एरंडाचं पान ठेवायचं. त्यात त्यनी दिलेलं ताक भाकरी खायची. पाणी पिताना आमी हाताची वंजळ करायचो. त्या वंजळीत ते आमाला वरून पाणी वतायचे”.
माझ्या आजीनं सांगितलेली तिची ही बालपणीची आठवण. हे विषारी जातीयतेचे किस्से ऐकताना एका गोष्टीचं नेहमी आश्चर्य वाटतं. स्पर्श टाळणाऱ्या, पाणी वाढताना विटाळ मानणाऱ्या सवर्ण समाजाला दररोजच्या जेवणात ज्या ज्वारीची भाकरी खाल्ली जाते त्या ज्वारीचे कणीस दलितांनी खुडलेलं चालत होतं. भुईमुगाच्या शेंगा तोडलेल्या चालत होतं स्वतःच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या शेतात दलितांनी काबाड कष्ट केलेलं चालत होतं. जनावरे राखलेली चालत होतं. त्यांचं शेण काढलेलं चालत होतं. मग त्यांचा स्पर्श, पाणी वाढताना विटाळ कसा होत असेल? इतक्या प्रतिकूल परिस्थितीत जागोजागी जातीयतेचे असे विखारी डंख सोसून त्या पिढ्यांची काय अवस्था झाली असेल ? काय मानसिकता झाली असेल? या दबलेल्या पिचलेल्या मानसिकतेतून ही लोकं पूर्णपणे बाहेर आली नाहीत. “कुत्रं मांजर जनावर नव्हं आण म्हार मांग माणूस नव्हं” या त्या काळातल्या म्हणीवरून जातीयवादाच्या दाहकतेची कल्पना येते. आपल्याला गावात रहायचं आहे. इथंच आपली माती होणार आहे. रोज एकमेकांची तोंड बघायची आहेत. मुंगी होऊन साखर खावी. असे म्हणून ते नेहमीच संघर्ष टाळतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या जातीयतेविरोधात बंड केलं. जनावरांचे जगणे जगणारा समाज माणसांत आला. पण माणसांना जनावरांची वागणूक देणाऱ्या माणसांच्या आतील क्रूर जनावर कायदा आल्यानंतर नष्ट झालंय का ? या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना महाराष्ट्रात आजही घडणाऱ्या जातीय अत्याचाराच्या घटना समोर येतात. बाबासाहेबांच्या जयंतीची मिरवणूक गावात येऊ नये म्हणून रस्ता अडवणारा सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील घटना असो वा खर्डा खैरलांजी येथील घटना असो. जिथे जिथे दलित समुहाला ठेचण्याची संधी मिळते तिथे त्याच्यावर अन्याय अत्याचार केला जातो. कायद्याने अस्पृश्यतेवर बंदी आली पण अस्पृश्यता देखील कायद्याच्या प्रमाणेच मॉडीफाय झाली आहे. उघड उघड अस्पृश्यतेचे पालन आजही ठराविक भागात होतेच. पण आजही हे प्रमाण अप्रत्यक्षपणे जास्त आहे. अस्पृश्य समजला जाणारा व्यक्तीवर अन्याय करण्याची संधी जिथे जिथे मिळते तिथे तिथे त्याच्यावर अन्याय केला जातो. या उलट पीडित व्यक्तीच कायद्याचा दुरुपयोग करत आहे असा डांगोरा पिटला जातो. दलितांच्या वाट्याच्या सहकार तसेच इतर व्यावसायिक योजनांचा लाभ सवर्णांनी घेतला आहे. मागासवर्गीय सहकारी संस्थांचा लाभ घेतला आहे. त्याच प्रमाणे गावागावातील आपापले राजकारण सांभाळण्यासाठी अॅट्रॉसिटी कायद्याचा स्वतःच्या स्वार्थासाठी फायदा करुन घेतला जातो. स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या की ग्रामीण भागातील अॅट्रॉसिटीचे प्रमाण वाढते. याने त्याला पुढे करुन केस करायची त्याने याला पुढे करुन त्याची जिरवायची असे प्रकार होतात. अशा केसेस मागे राजकीय आर्थिक पाठबळ असल्याने त्या लगेचच दाखल करुन घेतल्या जातात. पण ज्या ठिकाणी खरच अन्याय होतो तेथे केसच दाखल करुन घेतली जात नाही. अॅट्रॉसिटी हा एकमेव कायदा आहे की ज्याच्या अंमलबजावणीसाठी तब्बल सोळाशेच्या वरती परिपत्रक काढावी लागली. अजूनही हा कायदा पोलिसांनाच समजलेला नाही. पोलिसांच्या मनात या कायद्याविषयी अनेक दुराग्रह आहेत. ते पीडितांच्या बाजूने उभे राहत नाहीत. या कायद्याची अंमलबजावणीच झाली नाही आणि हा कायदा रद्द करा म्हणून काही संघटना सतत मागणी करत असतात. आज दलितांना कायद्याचे संरक्षण कवच असतानाही इतके अन्याय अत्याचार होतात. कायदा रद्द केल्यानंतर काय होईल. यांना कायदा रद्द करायचा आहे की दलितांवर अत्याचार करण्याची परवानगी हवी आहे? आपल्या बांधवांचे जातीयतेच्या विरोधात प्रबोधन केल्यास हे गुन्हे कमी होतील. खोटा जातीचा अहंगंड नष्ट होईल. हे न करता केवळ कायदा रद्द करा असा कांगावा करत सातत्याने या विरोधात रान उठवले जाते. गरीब बांधवांना दलितांविरोधात चेतवले जाते. याचा राजकीय फायदा घेणाऱ्यांचे षडयंत्र समजून घेणे महत्वाचे आहे. आजही ढोराळे सारख्या सांगली जिल्ह्यातील मातंग समाजातील व्यक्तीचे प्रेत गावातील मुख्य स्मशानभूमीत येऊ दिले जात नाही. जात केवळ मानसिक न राहता ती धमन्याधमन्यातील रक्तात विरघळली आहे.
मराठवाड्यात अत्याचाराचे प्रमाण जास्त होते. याबाबत मी एकदा मानवी हक्कांसाठी आयुष्यभर लढलेल्या दिवंगत एकनाथ आव्हाड यांना प्रश्न विचारला होता. “ जिजा ! तुमच्या मराठवाड्यात अत्याचाराचे प्रमाण जास्त आहे. या तुलनेत आमच्या पश्चिम महाराष्ट्रात इतके अत्याचार होत नाहीत. याचे कारण काय? ते म्हणाले “ हे खरं आहे आमच्यावर जास्त अन्याय अत्याचार होतात कारण आम्ही अन्याय सहन करत नाही. आम्ही आरे ला कारे करतो. आम्ही आमचे हक्क मागतो. कुणाच्या दहशतीत जगत नाही. जे आरे ला कारे करत नाहीत. जे सरंजामी लोकांकडून अपमान निमुटपणे सहन करतात त्यांच्यावर अत्याचार करण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून आमच्याकडे दलितांचे मूडदे पाडले जातात”.
आजही हीच अवस्था आहे. संसाधनांच्या हक्कासाठी लढणाऱ्या दलितांवर अत्याचार होतात. त्यांच्यापेक्षादेखील भटक्या विमुक्तांचे हाल अधिक आहेत. माणसाला जनावर मानणाऱ्या माणसांमधील जनावर जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत जातीय शोषित समूह मुख्य प्रवाहात येणार नाहीत.