राजकीय नेत्यांना माणूस म्हणून कधी जगू देणार?

अमृता फडणवीस ते राहुल गांधी यांच्यासारख्या नेत्यांच्या खासगी आयुष्यातील प्रसंगावरून टीका केली जाते. पण या राजकीय नेत्यांना माणूस म्हणून जगू देण्याची लोकशाही आपण स्वीकारणार का? असा सवाल उपस्थित करत कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी परखड मत व्यक्त केले आहे.;

Update: 2022-05-05 03:55 GMT

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या विविध प्रकारचे कपडे परिधान करून अनेक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावतांना आपण बघितले. तेव्हा त्यांच्यावर काही जणांनी अश्लाघ्य भाषेत टीका केल्या होत्या. कारण मुख्यमंत्री पदी असलेल्या पुरुषाच्या बायकोने कसे राहावे याचे पारंपरिक नियम आपण तयार केले आहेत व त्याच चौकटीत त्या स्त्रीने राहावे अशी समाजाची अट असते. आपल्याला शोभेल ते कपडे घालावे, सामाजिक सभ्यतेचे नियम जरूर स्त्री-पुरुषांनी कपडे निवडतांना पाळावे पण अमृता फडणवीस यांनी असे कपडे का घातले, तसे का घातले यावरून त्यांना काहीही बोलणाऱ्यांचा आम्ही अनेकांनी तेव्हा सुद्धा निषेध केला होता. उलट मुख्यमंत्री पदी असलेल्या व्यक्तीची बायको या प्रतिमेला अमृता फडणवीस यांनी पारंपरिक चौकटीतून बाहेर काढले. त्यांचे पती मुख्यमंत्री आहेत, म्हणून त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत आवडी मारून टाकायच्या, आपले अस्तित्व नष्ट करायचे व माणूस म्हणून जगायचेच नाही ही अपेक्षाच चुकीची आहे असे मला नेहमी वाटले आहे. ( अमृता फडणवीस यांची बाजू मी वरील विषयाच्या संदर्भात घेत आहे)

राजकीय नेते, त्यांचे नातेवाइक म्हणजे अती-मानव आहेत, विशेष-मानव आहेत व त्यांनी माणसांप्रमाणे जगूच नये अशा पारंपरिक समजांच्याखाली सांस्कृतिक दडपशाही अयोग्य आहे. त्याचप्रमाणे राहुल गांधी नेपाळला काठमांडू मध्ये एका लग्न समारंभात हजर राहिले. तेथे इतर कोण कोण होते, ज्यांचे लग्न होते त्यांनी कुणाला आमंत्रित केले, लग्नाची पार्टी कुठे ठेवली यावर राहुल गांधींचे नियंत्रण कसे असणार? एक माणूस म्हणून आपण कुणाला जगूच न देणे हे चुकीचे आहे इतकाच मुद्दा आहे.

प्रश्न हाच आहे की आपण राजकीय नेत्यांना ' माणूस' म्हणू जगू देण्याची लोकशाही स्विकारणार का?

सगळा देश लॉक डाऊन मध्ये असतांना, हजारो गरीब पायी पायी, पाय रक्तबंबाळ करीत आपल्या गावी परतत आहेत अश्या वेळी मोरा सोबत खेळणे, पुस्तक वाचण्याचे व झाडाखाली, हिरवळीवर कॉम्प्युटर ठेऊन जणू आपण खूप कामात आहोत असा सीन लोकांना दाखवणे हे अमानुषपणाचे असते. साधारण संवेदनशील माणूस अनेकांची बिकट परिस्थिती असतांना असे वागू शकत नाही. त्यावेळी असे वागणाऱ्या व्यक्तीचा आपण निषेध केला होता का?

निषेध केव्हा करायचा? असंवेदनशीलता कशी ओळखायची हे सुद्धा कळले पाहिजे तेव्हाच आपण वरील सर्व गोष्टींचा समर्पक, योग्य व लोकशाहीपुर्ण विचार करू शकतो.

Tags:    

Similar News