कार्यकर्ता मेल्यावर चळवळ जगेल कशी ?
आपण जेवढं जास्त उद्ध्वस्थ होऊ तेवढं जास्त योगदान चळवळीला मिळेल. ज्याला उद्ध्वस्थ व्हायचंय त्यानं चळवळीत यावं, चळवळीत यायला कोणी पत्र लिहीलं होतं का? ही तुमची निवड आहे. हे असेच आयुष्य जगावे लागेल. असाच त्याग करावा लागेल. हे बुरसटलेले विचार नेत्यांनी सोडून द्यायला हवेत. तरच नवे कार्यकर्ते चळवळीत येतील. वाचा कार्यकर्त्यांची फरपट मांडणारा सागर गोतपागर यांचा लेख;
कार्यकर्त्यांचा अकाली मृत्यू होणं चळवळींसाठी मोठा हादरा आहे. चळवळीत स्वतःला झोकून देऊन काम करणारे कार्यकर्ते बहुतांश वेळी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. कुठे मोर्चा कार्यक्रम असेल तर कसंही पोहचायचं, मिळेल ते खायचं, कुठेही झोपायचं याचा परिणाम कार्यकर्त्यांच्या आरोग्यावर होतो. त्याचं आयुष्य हळूहळू कमी होतं. पण त्यावेळी हे स्वतःला जाणवत नाही. मग एखाद्या आजार झाला की, त्याचं निदान देखील लवकर होत नाही. आजार बळावल्यावर उपचाराचा खर्च परवडत नाही. पैसे जमा झाले तरी त्यामध्ये वेळ निघून जाते. इतक्या कष्टातून कार्यकर्ता पुढे गेला तर आयुष्याचा संध्याकाळी स्वतःसाठी काहीच आर्थिक तजवीज न केल्याने मोठी फरपट होते. साधे पक्के घर नसते. बनुबाई सारखी कार्यकर्ती पडक्या घरात चिखलाच्या दलदलीत झोपलेली मी पाहिलीय. शंतनू सारखा उमदा कार्यकर्ता शाहीर अकाली निघून गेला. चळवळी टिकल्या पाहिजेत. त्या वाढल्या पाहिजेत. पण अशा त्यागातून, संघर्षातून, ताऊन सुलाखून, अभ्यास करुन तयार झालेले कार्यकर्ते अकाली निघून जायला लागल्यावर चळवळी वाढणार तरी कशा?
सर्व संघटनांनी आपापल्या कार्यकर्त्यांसाठी किंवा एकत्रित चळवळीने एकूण कार्यकर्त्यांच्या आरोग्यासाठी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. जेणेकरून चळवळीला योगदान देणारे नवे कार्यकर्ते या प्रवाहात येतील. आपण जेवढं जास्त उद्ध्वस्थ होऊ तेवढं जास्त योगदान चळवळीला मिळेल. ज्याला उद्ध्वस्थ व्हायचंय त्यानं चळवळीत यावं, चळवळीत यायला कोणी पत्र लिहीलं होतं का? ही तुमची निवड आहे. हे असेच आयुष्य जगावे लागेल. असाच त्याग करावा लागेल. हे बुरसटलेले विचार नेत्यांनी सोडून द्यायला हवेत. माणसासाठी काम करणाऱ्या चळवळीत कार्यकर्ता देखील एक माणूसच आहे हे विसरतातच कसे?(अपवाद असू शकतात)