महाराज 'राजर्षी' का होते?
शाहू महाराज राजर्षी का होते? त्यांना राज्य करताना आलेल्या अडचणी आणि त्यांनी घेतलेले लोककल्याणकारी निर्णय यातून त्यांना राजर्षी पदवी कुणी दिली? याचा वेध घेणारा वैभव छाया यांचा लेख जयंतीनिमीत्त पुनःप्रकाशित करीत आहोत.;
एक कल्पना करा...
तुमच्या आईचे निधन झाले आहे. तुम्हीही वयाने फार काही मोठे नाहीत. जेमेतेम तिशीत आहात. निर्वतलेली आई ही सावत्र असली तरी तीचा दर्जा सख्या आईइतकाच. प्रेम, माया जन्मदात्या आईसारखंच. आईचं वय देखील ४० च्या आतच. आई अचानक निर्वतली आहे. अशा वेळेस तुमच्या घराला कुणी आग लावली. आईचं मयत नाही दोऊ दिलं. मयतावर शिव्या शाप दिल्या. मयत आईचा अपमान केला तर तुम्हाला काय वाटेल? त्या दिवशी जर तुमच्या घरातील धान्य कुणी पाण्यात फेकून दिलं, किंवा आगीत टाकलं आणि तुमची महत्त्वाची कागदपत्रे जर आगीत फेकून दिली किंवा आग लावून बर्बाद करून टाकली तर...
एका बाजूला आईचे मयत, दुसऱ्या बाजूला बर्बादी असा दूर्दैवी माहोल असताना तुमच्या मनाला काय यातना होत असतील... याची एक कल्पना करा. ही कल्पना करून झाली की मनात येणाऱ्या पहिल्या भावनेसह हे खालील लेखन वाचा.
हंगामी मुख्य न्यायाधीश शिरगावकर यांनी २७ जून १९०२ रोजी महाराजांना पत्राने कळविले की ब्राह्मण नेहमी प्रमाणे उपद्रव देत आहेत, उध्दटपणे वागत आहेत. त्यांच्याशी सहनशीलतेने वागणे आम्हाला कठीण जात आहे. यास्तव मी आपणास कळकळीची विनंती करतो कि आपण शक्यतो लवकर कोल्हापूरास यावे. याच काळात लंडनमधील वास्तव्यात महाराजांनी २६ जुलै १९०२ रोजी करवीर गँझेटमध्ये महाक्रांतीकारक व अपूर्व असा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यामध्ये म्हटले होते कि, "मागासवर्गीयांची प्रगती करण्याच्या आपल्या धोरणानुसार मागासवर्गीयांनी उच्च शिक्षण घेण्यास उद्युक्त व्हावे म्हणून त्या वर्गांना सरकारी खात्यात पूर्वीपेक्षा अधिक नोकऱ्या द्याव्यात असे आपण ठरविले आहे. तरी ह्या जाहीरनाम्याच्या दिवसापासून सरकारी कार्यालयांत ज्या ठिकाणी मागासवर्गीयांपैकी ५० टक्क्यांपेक्षा कमी नोकर असतील तेथे या वर्गांपैकी तरुणांची नेमणूक यापुढे करावी." या जाहीरनाम्यातील मागासवर्गीय म्हणजे ब्राह्मण, प्रभू, शेणवी व पारसी व तत्सम पुढारलेल्या जातींव्यतिरिक्त इतर सर्व समाज होय, असे स्पष्टीकरणही दिले होते. या जाहीरनाम्यामुळे सनातनी ब्राह्मण मंडळी चांगलीच संतापली. त्यांनी छत्रपतींवर नेहमी प्रमाणे टिकेचा प्रहार केला. ब्राह्मणांचा कैवारी "समर्थ'' याने राजप्रतिनीधी मंडळाचा धिक्कार केला. समर्थने किंकाळी फोडून म्हटले कि, "कायद्याचे पावित्र्य यांनी भ्रष्ट केले आहे. शास्त्रात दिलेले अधिकार धुडकावून लावण्यात आले आहेत आणि सभ्यपणाची बंधने यांनी धिक्कारुन टाकली आहेत. (ब्राह्मण समाजाप्रती) आदर आणि भक्तीयुक्त आदर नाहीसा झाला आहे. स्वदेशीय बुध्दीचे राजकारणातील श्रेय संपूर्णपणे रसातळाला नेण्यात आले आहे."
शाहू महाराज मायदेशी परत आल्याच्या निमित्ताने सर्वत्र स्वागत समारंभांचे आयोजन करण्यात येत होते. परंतु या सनातन्यांनी तोही राजशिष्टाचार पाळला नाही. कोल्हापूर नगरपालिकेच्या सभासदांनी मात्र महाराजांच्या सन्मानार्थ भव्य समारंभ करुन त्यांना मानपत्र दिले. सर्व स्वागत समारंभ संपल्यानंतर रुढीनुसार महाराज अंबाबाई देवीचे दर्शन घ्यावयास निघाले. बऱ्याच काळाच्या अनुपस्थिती नंतर गृहप्रवेश करताना प्रथम देवीचे दर्शन घेण्याची राजघराण्याची प्रथा होती. छत्रपतींनी सिंधूबंदी मोडल्यामुळे त्यांनी प्रायश्चित घेतल्या शिवाय देवीचे दर्शन घेऊ नये, असा ब्राम्हणांनी आग्रह धरला. परंतु महाराजांनी तो धुडकावून लावला. ब्राह्मणांच्या बाजूने त्यावेळी काही मराठेही होते. महाराजांनी ब्राह्मणांच्या धार्मिक आज्ञेप्रमाणे वागावे असे मत त्या मराठ्यांचे होते. परंतु ब्राह्मणांनी महाराजांना देवदर्शनला जाण्यास विरोध केल्यास ब्राम्हणांना कसून विरोध करण्याची भूमिका कोल्हापूरातील बहुसंख्य मराठ्यांनी व इतर जातीच्या लोकांनी घेतली. त्यामुळे महाराजांना विरोध करण्यास कोणच पुढे आले नाही व महाराजांनी धर्माज्ञा झुगारुन देवीचे दर्शन घेतले.
दि. १४ सप्टेंबर १९०२ रोजी शाहू महाराजांच्या दत्तक आई आनंदीबाई राणीसाहेब यांचा मृत्यू झाला. सर्वजण या दुःखमयी वातावरणात असतानाही कर्मठ ब्राह्मण मंडळींनी शाहूंनी वेदोक्त पध्दतीने संस्कार करु नयेत, असा इशारा स्मशानभूमीतच दिला. नदीच्या तीरावर उभ्या असलेल्या ब्राह्मणांनी तिरस्काराने म्हटले, "शुद्रबाईचे संस्कार वेदोक्त पद्धतीने कोण करील ?"
खुद्द राजमातेप्रती हे झोंबणारे उद्गार एकून शाहू छत्रपती महाराजांच्या आतड्याला पीळ पडला.
( आज आपल्याला वाचतानाच जर चिड निर्माण होत असेल तर तेव्हा महाराजांच्या मनाची अवस्था काय झाली असेल याची आपण कल्पना आपण करु शकतो. ) काही दिवसांनी ब्राह्मणांच्या या उद्गाराचा उल्लेख करुन छत्रपती दुःखाने म्हणाले, " ब्राह्मणांचे ते हृदयभेदक, अपमानकारक शब्द ऐकून मला चिड आली. मरणप्राय दुःख झाले. माझे ह्दय कसे दुःखाने विदीर्ण झाले याचे वर्णन मी तुम्हाला कसे करू ? परंतू ते सर्व दुःख मी गिळले."
ब्राह्मणांचा कोप आता शिगेला पोहचला होता. काही माथेफीरु लोकांनी शहरातील घरांवर रक्तांच्या हाताचे ठसे उमटवले आणी छत्रपतींच्या जुन्या राजवाड्याला त्यांच्या आईच्या निधनादिवशीच आग लावून आपल्या द्वेषाचा व असंतोषाचा स्फोट केला. महाराज जेव्हा घटनास्थळी पोहचले तेव्हा त्यांना असे आढळले की ज्या भागात धान्यसाठा, स्फोटक द्रव्याचा साठा व सरकारी दप्तर होते त्याच भागाला आग लावण्यात आली आहे. महाराजांनी पोलिसांना तीन महिन्यांच्या आत आरोपींना शोधून काढण्याचे आदेश दिले. महाराजांच्या मातोश्रींचे निधन व त्याचदिवशी राजवाड्याला लागलेली आग या संकटाचे स्मरण करुन देऊन महाराजांना ब्राह्मणांनी पुन्हा भिती घातली. ते म्हणाले शिवाजी आणि संभाजी यांनी वेदोक्त संस्काराची आकांक्षा बाळगली म्हणून त्यांचा अंत लवकर घडून आला. गागाभट्टाने शिवाजीला वेदोक्त रितीने राज्याभिषेक केला म्हणून तो संडासात पडून मेला. ब्राम्हणांची शापवाणी कशी खरी ठरते हे ते पुन्हा-पुन्हा सांगू लागले....!
ब्राम्हणांच्या या दृष्टकृत्यांविषयी विचारविनिमय करताना महाराज एके दिवशी म्हणाले, ''कावळ्याच्या शापामुळे गाई मरत नाहीत. तसेच ब्राम्हणांच्या शापामुळे माझे काही वाकडे होणार नाही." छत्रपतींवर कोसळलेल्या संकटामुळे सनातनी ब्राम्हण लोकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. धर्मशास्त्राच्या विरुद्ध वर्तन केल्यामुळे व ब्राह्मणांच्या इनाम जमिनी जप्त केल्यामुळे ईश्वराचा कोप झाला, असे ते गर्वाने सांगत फिरु लागले. महाराज सर्व धार्मिक आणि तथाकथित दैवी संकटांविरुध्द धैर्याने उभे राहिले. गेल्या अनेक युगांत ब्राह्मणांच्या धार्मिक व दैवी शक्तिला कोणत्याही राजाने असे खुले व तगडे आव्हान दिले नव्हते.