BYJU Crisis : मल्ल्या, नीरव मोदीच्या यादीत आता बैजू?
विजय मल्ल्या, नीरव मोदी यांनी केलेल्या घोटाळ्यांमुळे ते वारंवार चर्चेत येत असतात. पण याच कर्जबुडव्या उद्योगपतींचं पुढचं व्हर्जन BYJU ला का म्हटलं जात आहे? जाणून घेण्यासाठी वाचा संजीव चांदोरकर यांचा लेख...;
लाट ओसरल्यानंतर BYJU या एड्यु टेक कंपनीच्या फुग्यातील हवा ओसरू लागली होती. अपेक्षेप्रमाणे आता तो फुगा फुटण्याचा बेतात आला आहे अशा बातम्या येत आहेत.
खरंतर BYJU ही बैजू रवींद्रन आणि त्याच्या बायकोने दिव्या रवींद्रनने २०११ मध्ये ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी स्थापन केलेली कंपनी. इंटरनेट, कॉम्युटर्स, स्मार्टफोन्स यांच्या पाठीवर स्वार होत त्यांनी कंपनी वाढवली.
या कंपनीचे जानेवारी २०१८ मध्ये १ बिलियन डॉलर्स इतके मूल्यांकन / व्हॅल्युएशन्स झाले आणि BYJU ही भारतातील पहिली युनिकोर्न एड्यु टेक कंपनी बनली.
सुंदर / तरुण मुलीच्या गल्लीतील मुले जशी मागे मागे फिरतात. अगदी त्याच प्रकारे जगभरातून व्हेंचर कॅपिटल/ प्रायव्हेट इक्विटीवाल्या गुंतवणूकदार कंपन्या यांच्या मागे फिरू लागल्या. त्यानंतर ७० जागतिक गुंतवणूकदार कंपन्यांनी गेल्या काही महिन्यात BYJU मध्ये पैसे गुंतवले.
बैजू रवींद्रन आणि त्याच्या टीमला जग पादाक्रांत करायची स्वप्ने पडू लागली. BYJU ने गेल्या दीड वर्षात १५ ऑनलाईन छोट्या मोठ्या कंपन्या विकत घेतल्या. त्यामुळे मुल्याकंन अजून वाढले.
कोरोना विषाणू इतरांसाठी देवाने पाठवलेले विष तर BYJU साठी अमृत सिद्ध झाले. मुलांची शैक्षणिक वर्षे फुकट जाऊ नयेत म्हणून पालकांनी कर्जे काढून मुलांना BYJU चे विद्यार्थी बनवले. त्यामुळे BYJU च्या माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढली आणि BYJU २०२२ मध्ये २२ बिलियन्स मूल्याची कंपनी झाली. फक्त ३ वर्षात मूल्यांकन २२ पटींनी वाढले. मीडिया, मध्यमवर्गातील गुंतवणूकदार , टाळ्या पिटू लागले आणि जे अपेक्षेप्रमाणे व्हायचं तेच होऊ लागले.
कोरोना ओसरल्यानंतर ऑनलाईन विद्यार्थी वर्गात परतले. त्यामुळे विकत घेतलेल्या कंपन्या वाढू शकल्या नाहीत. त्यात बैजू रवींद्रन एखाद्या सरंजामदारांसारखे कंपनी चालवू लागले. त्यामुळे मार्च २०२१ या वित्तवर्षाचे रिझल्ट्स १८ महिन्यांनी दिले गेले. मार्च २०२२ चा तर अजून पत्ताच नाही. मार्च २०२३ ची अजून पहाट व्हायची आहे. त्यामुळे कंपनीने आपल्या काही हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले. एवढंच नाही तर परकीय चलन कायद्यांचे उल्लंघन केल्या प्रकरणी कंपनीची चौकशी सुरु झाली.
या सगळ्याच्या परिणामी DELOITTE या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ऑडिटर कंपनीने आणि BYJU च्या डायरेक्टर्स बोर्ड्वरुन तीन गुंतवणूकदारांच्या डायरेक्टर्सनी राजीनामा दिला आहे. दुसरीकडे १२०० कोटी रुपयांचे कर्ज / व्याज न दिल्यामुळे प्रकरण कोर्टात गेले आहे. त्यामुळे २ वर्षात २२ पटींनी वाढून BYJU चे २२ बिलियन्स डॉलर्स झालेले मूल्यांकन काही महिन्यात ६० % खाली आले आहे.
चला क्रोनीझमवरील आपल्या टीकेत चघळायला अजून एक नाव मिळाले. बघा मी तुम्हाला सांगत असतो ना? टाईप
एचडीआयएल चे वाधवान, अदानी समूहाचे गौतम अदानी, गो एअरचा जेड वाडिया आणि अजून बरीच. ही गेल्या काही महिन्यातील नावे. त्याआधी नीरव मोदी, विजय मल्या अजून मागे जात जात सत्यम कॉम्प्युटर्सचे राजू अशी भली मोठी यादी आपल्या सगळ्यांची पाठ आहे. त्यात अजून एक भर बैजू रवींद्रन या नावाची.
यामध्ये बैजू रवींद्रन याने स्वतःच्या खिशातून पैसे घालून २ लाख कोटींची कंपनी बनवली का? तर याचे उत्तर हे नाही असेच आहे. कारण यामध्ये भारतातूनच नाही तर जगभरातून गुंतवणूकदारांनवी हजारो कोटी रुपये ओतले.
बैजू रवींद्रन याने सर्वांना खोके/ पेट्या दिल्या असतील? काय बैजू रवींद्रने धाक धापटशा दाखवला / ब्लॅक मेल केले असेल का? त्याच्या तर्फे सर्वांना दिल्लीतून फोन गेले असतील का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.
पण यात एक गोष्ट नक्की असते. आपल्याला कंपनीत काही तरी गडबड झाली किंवा अचानक शेअर कोसळला ही घटना घडलेली असे दिसते. पण वस्तुस्थिती तशी नसते. अनेक दिवस गोष्टी आतल्या आत शिजत असतात. त्या फक्त इन्सायडर्सना माहित असतात किंवा इन्सायडर्स कडून माहिती घेण्याचा विशेषाधिकार काहींनाच असतो.
बैजू रवींद्रनला माहित असणार आपल्या कंपनीत काय सुरु आहे. अजून बऱ्याच जणांना माहिती असण्याची शक्यता आहे. ज्यांना रेडिमेड मिळाली नसेल त्यांना ती मागण्याचा कायदेशीर / प्रोफेशनल अधिकार होता / असतो
कोण आहेत हि लोक ?
पण त्याच्या कंपनीला कर्जे देणाऱ्या बँका / एनबीएफसी / व्हेंचर कॅपिटल / प्रायव्हेट इक्विटी / मर्चंट बँकर / क्रेडिट रेटिंग / बोर्ड वरचे डायरेक्टर्स / ऑडिटर्स / कंपनी कायदा सल्लागार मोठी यादी आहे
हजारो कोटींची इक्विटी देणारे? कर्जे देणारे? निरनिराळ्या शॉर्ट टर्म वित्त स्रोत देणारे? सर्वच्या सर्व शिकलेले सवरलेले , फायनान्स / बँकिंग / कंपनी कायदा / चार्टर्ड अकाउंटसी मध्ये पारंगत , अनेक वर्षाचा त्या क्षेत्रातील अनुभव असणारे , कर्ज / गुंतवणुकीचा निर्णय घेताना अनेक प्रकारचे मॅथेमॅटिकल मॉडेलिंग करू शकणारे. भारतातील नाही लंडन / न्यूयॉर्क / हॉंगकॉंग / सिंगापूर मधील. They are all highly professionals
बैजूच्या व्यक्तिमत्वाचे विच्छेदन होत राहील ‘ पण BYJU ला मिळालेल्या १०० रुपयातील ९० रुपये देणाऱ्या सिस्टीमचे विश्लेषण कोण करणार? व्यक्तिकेंद्री नको सिस्टमिकेंद्री विश्लेषण शिकायला हवे.