...नाही तर काहीतरी गडबड आहे!
जीडीपीचे आकडे, सेन्सेक्स डोक्यात घेऊन अर्थव्यवस्थेबाबत भाष्य़ करणाऱ्या अर्थतज्ज्ञांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पाडणारा संजीव चांदोरकर यांचा लेख नक्की वाचा...
अर्थव्यवस्थेत नक्की काय सुरु आहे? हे जाणण्यासाठी तुम्ही अर्थतज्ज्ञ किंवा आकडेवारी तज्ज्ञ असण्याची गरज नसते. तुम्ही हृदयाच्या डोळ्यातून आजूबाजूला काय घेत आहे हे बघायला हवे, हृदयाच्या कानातून ऐकायला हवे, पण फक्त आजूबाजूला लक्ष द्या आणि त्याचे अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करा.
तुमच्या कॉलनीत कचरा गोळा करायला येणारी तरुण मुलगी "I was sick hence i could not come" असे सेक्रेटरीला सांगते, नंतर तुम्ही चौकशी करता त्यावेळी ती सेमी इंग्रजी मीडियममध्ये चांगल्या मार्काने बारावी पास झाल्याचे तुम्हाला कळते.
यावरून तरुण तरुणीमधील बेरोजगारीच्या प्रश्नाचे गांभीर्य तुम्हाला आकळले नाही तर काही तरी गडबड आहे. तुमच्याकडे जेवण बनवणारी / घरकाम करणारी तुमच्याकडे तिच्या मुलीची / मुलाची कॉलेजची फी भरायची आहे. म्हणून ५००० रुपये ऍडव्हान्स मागते.
यावरून आर्थिक वंचित वर्गात आपल्या मुलांना शिकवण्याची आस किती खोलवर रुजत आहे; आणि हे साऱ्या देशासाठी चांगली गोष्ट आहे; आणि शिक्षण कोट्यावधी मुलांसाठी परवडणारे असले पाहिजे.
हे असे तुमच्या डोक्यात आले नाही तर काहीतरी गडबड आहे.
कोरोना काळात घरातून बाहेर पडल्यावर याआधी त्या नाक्यावर कधीही न पाहिलेले मध्यमवयीन खात्या पित्या घरातील नवरा बायको
घरातील पत्र्याच्या टेबलवर नारळ, अंडी, ब्रेड, कांदे, बटाटे विकत दिवसभर उभे राहू लागले आहेत. हे पाहून अनेकांच्या नोकऱ्या / नेहमीची मिळकतीची साधने हातातून गेली आहेत आणि सरकारची आर्थिक धोरणे या लोकांना रोजगार / स्वयंरोजगार केंद्री असली पाहिजेत.
हे तुम्हाला मनोमन पटले नाही तर काहीतरी गडबड आहे. ही झाली वानगीदाखल निरीक्षणे; हा चष्मा लावून शहरी, निमशहरी, ग्रामीण भागात फक्त आजूबाजूला बघा. दिल्लीतून केंद्र सरकारचे प्रवक्ते आणि गल्लीबोळातील अर्थतज्ज्ञ भारतीय अर्थव्यवस्था किती वेगाने सुधारत आहे. याची आकडेवारी फेकून तुम्हाला आंधळे / बहिरे करून टाकतील.
संजीव चांदोरकर (१८ जून २०२१)