आत्मविश्वास म्हणजे काय असतो?

इतिहास वादाचे केंद्र ठरत असताना मराठेशाहीच्या इतिहासाबद्दल लिहिताहेत सुनील सांगळे...

Update: 2022-03-15 14:08 GMT

आताच मराठेशाहीचा अस्सल इतिहास असलेल्या "मराठी रियासत" या पुस्तकाचा पहिला खंड वाचण्यात आला. त्यातील अनेक गोष्टींबद्दल तपशीलवार लिहिण्यासारखे आहे. सध्या फक्त एकाच गोष्टीबद्दल! आत्मविश्वास म्हणजे काय असतो? सकल हिंदुस्थानचा बादशाह असणाऱ्या मोंगल सम्राटाच्या दख्खनच्या सुभेदारास छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेले एक पत्र म्हणजे स्वतःच्या सामर्थ्यावर किती विश्वास असावा याचे ज्वलंत उदाहरण आहे. हे पत्र इ.स.१६६५ च्या आरंभी लिहिलेले आहे. ते मुळातूनच वाचण्यालायक आहे. ते असे:

"आज तीन वर्षे बादशहाचे मोठेमोठे सल्लागार व योद्धे आमचा प्रदेश काबीज करण्यासाठी चालून येत आहेत, हे तुम्हा सर्वास माहित आहेच. बादशाह हुकूम फर्मावितात, 'शिवाजीचे किल्ले व मुलुख काबीज करा.' तुम्ही जवाब पाठविता, 'आम्ही लवकरच काबीज करितो'. आमच्या ह्या कठीण प्रदेशात नुसता कल्पनेचा घोडा नाचविणे सुद्धा कठीण आहे. मग तो प्रदेश काबीज करण्याची गोष्ट कशाला? भलत्याच खोट्या बातम्या बादशहाकडे लिहून पाठविण्यास तुम्हाला लाज कशी वाटत नाही? कल्याण व बेदरचे किल्ले केवळ उघड्या मैदानात होते ते तुम्ही काबीज केले. आमचा प्रदेश अवघड व डोंगराळ आहे. त्यातून नदी नाले उतरून जाण्यास वाट नाही. अत्यंत मजबूद असे साठ किल्ले आज माझे तयार आहेत, पैकी काही समुद्र किनाऱ्यावर आहेत. बिचारा अफझलखान बेसावधपणे जावळीवर फौज घेऊन आला आणि नाहक मृत्युमुखी पडला. इकडचा हा सर्व प्रकार तुम्ही आपल्या बादशहास का कळवीत नाही? अमीर-उलउमराव शायिस्ताखान आमच्या या गगनचुंबित डोंगरात व पाताळात पोचणाऱ्या कप्प्यात तीन वर्षे सारखा खपत होता. "मी शिवाजीचा पाडाव करून लौकरच त्याचा प्रदेश काबीज करितो" असे बादशहाकडे लिहून लिहून तो थकला. ह्या खोडसाळ वर्तनाचा परिणाम त्याला भोवला. तो परिणाम सूर्यासारखा स्वच्छ सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. आपल्या भूमीचे संरक्षण करणे माझे कर्तव्य आहे आणि तुम्ही बादशहाकडे कितीही खोट्या बातम्या लिहीन पाठविल्या तरी मी आपले कर्तव्य बजावण्यास कधी चुकणार नाही."

हे आव्हान दख्खनच्या मोंगली साम्राज्याच्या प्रतिनिधीस आहे. हे मोंगली साम्राज्य पार अफगाणिस्तानच्या सीमेपासून ते संपूर्ण भारतात पसरलेले होते. शिवाजी महाराजांच्या राज्यास अडीच जिल्ह्यांचे स्वराज्य म्हणून हिणवले जायचे. या पोस्टसोबत दिलेला तत्कालीन नकाशा पाहता ते खोटेही नव्हते. अशा या परिस्थितीत हा आत्मविश्वास कुठून आला असावा? खरं सांगायचं तर याला काही तार्किक उत्तर असूच शकत नाही. हा केवळ स्वतःच्या बुद्धी आणि सामर्थ्यावर असलेला सार्थ विश्वास होता.

दुसऱ्या एका पत्रात महाराजांना किल्ल्यांचे महत्व किती वाटत असे ते दिसते. "किल्ले बहुत झाले, विनाकारण पैका खर्च होतो" असा जवळच्या मंडळींनी महाराजांना अर्ज केला असता ते लिहितात:

"जैसा कुळंबी शेतास माळा घालून शेत राखितो, तसे किल्ले राज्यास रक्षण आहेत. तारवास खिळे मारून बळकट करितात, तशी राज्यास बळकटी किल्ल्यांची आहे. किल्ल्यांच्या योगाने औरंगशहासारख्याची उमर गुजरून जाईल. आपणास धर्मस्थापना व राज्यसंपादन करणे, सर्वास अन्न लावून, शत्रुप्रवेश न होय, ते किल्ल्यामुळे होते. सर्वांचा निर्वाह आणि दिल्लींद्रासारखा शत्रू उरावर आहे. तो आला तरी नवे जुने तीनशे साठ किल्ले हजरतीस आहेत. एक एक किल्ला वर्ष वर्ष लढला, तरी तीनशे साठ वर्षे पाहिजेत". या किल्ल्यांच्या योगाने मराठ्यांना जिंकण्यासाठी औरंगझेबासारख्या बादशहाची पूर्ण उमर खर्ची पडेल या भाकिताबद्दल तर काय बोलावे? ते पुढील इतिहासाने सिद्धच केलं.

"मराठी रियासत (खंड १)"

गोविंद सखाराम सरदेसाई

(पृष्ठ २२०-२२१) (पृष्ठ ३७१)

Similar News