का होतो सावरकरांना विरोध ?
देश स्वातंत्र्याच्या चळवळीत सावरकरांची भूमिका काय होती? सावरकर खरंच ‘स्वातंत्र्यवीर’ आहेत का ? सावकरांना वारंवार का विरोध होतो ? आजच्या पिढीला समजून सांगणारा लेख नक्की वाचा...;
विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांना 'वीर' हे विशेषण १९२० मध्ये प्रथम लावण्यात आले. 'भाला'कार भोपटकरांनी ते पहिल्यांदा वापरले. आणि ते रूढ झाले. अगदी आजसुद्धा त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणूनच ओळखले जाते. परंतु सावरकरांच्या अस्सल कागदपत्रांच्या आधारे सावरकर हे 'स्वातंत्र्यवीर' नव्हे, तर 'माफीवीर' असल्याची मांडणी अभ्यासक करतात. 'द वीक' या देशातील जबाबदार नियतकालिकाने जानेवारी २०१६ मध्ये यासंदर्भातील माहिती पुढे आणली आहे. ती ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे मांडली आहे. आणि ती आजवर कुणी खोडून काढल्याचे ऐकिवात नाही.
केंद्रात अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार असताना २००३मध्ये संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सावरकरांचे तैलचित्र लावण्यात आले. महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) तैलचित्राच्या अगदी समोर. भारतीय संसदेच्या इतिहासात काँग्रेस आणि इतर विरोधकांनी बहिष्कार घातलेला हा एकमेव समारंभ आहे. हा विरोध केवळ राजकीय स्वरुपाचा नव्हता तर, स्वातंत्र्यचळवळीला विरोध करणाऱ्या सावरकरांना विरोध करण्याची भूमिका त्यामागे होती.
भाजपचे (BJP) अमित शहा (Amit Shah) यांनी आपल्या वेबसाइटचे अनावरण झाले, तेव्हा त्यांनी पहिला ब्लॉग सावरकरांना अर्पण केला. यावरून लक्षात येते की ते भाजपवाल्यांना प्रिय आहेतच, परंतु कोणत्याही प्रकारच्या अभ्यासाचे आणि अभ्यासावर आधारित वस्तुनिष्ठ माहितीचे वावडे असलेल्या शिवसेनेलाही ते तेवढेच प्रिय आहेत. त्याचमुळे शिवसेना अनेक वर्षांपासून सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करीत आहे.
सावरकरांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च पुरस्कार देण्याची मागणी जोर धरू लागल्यावर 'द वीक' या साप्ताहिकाने अस्सल कागदपत्रांच्या आधारे सावरकरांच्या 'वीर' विशेषणाचा तपशीलवार उलगडा केला. या साप्ताहिकाचे तत्कालीन प्रतिनिधी निरंजन टकले यांनी हा विशेष स्पेशल रिपोर्ट लिहिला आहे. टकले हे मूळचे नाशिकचे. त्यांना सावरकरांच्याबद्दल प्रेम आणि आपुलकी होती. त्यापोटीच ते सावरकरांच्यासंदर्भात माहिती घेत, कागदपत्रे तपासत राहिले. प्रेमापोटी केलेला प्रयत्न होता. मात्र त्या प्रयत्नामध्ये त्यांना जी माहिती मिळत गेली, ती पाहिल्यानंतर त्यांचा या स्वातंत्र्यवीराच्या कथित पराक्रमाच्या गोष्टींबद्दल पुरता भ्रमनिरास झाला. ब्रिटिश सत्तेविरुद्ध त्यांनी संघर्ष केला नाही, तर शिक्षेतून माफी मिळण्यासाठी वारंवार दया याचिका केल्या.
केंद्रातील सरकार नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासंदर्भातील कागदपत्रांवरून राजकारण करीत असतानाच निरंजन टकले सावरकरांच्या कागदपत्रांकडे वळले होते. त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत गेल्या. सावरकरांच्यासंदर्भात श्रीकांत शेट्ये यांचे 'माफीवीर सावरकर' नामक पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यात त्यांनी सावरकरांचे माफीनामेही दिले आहेत. ते असे आहेत -
'मी घराबाहेर पडून बिघडलेला उधळ्या खर्चिक मुलगा आहे. मायबाप ब्रिटिश सरकारच्या पंखाखाली सुरक्षित रहाण्यासाठी माझी अंदमानच्या तुरुंगातून सुटका करावी. मी १९११ मध्येही दयेचा अर्ज केला होता. त्याचाही सहानुभुतीपूर्वक विचार करून दयाळू आणि परोपकारी ब्रिटिश सरकारने माझी सुटका केली तर इंग्रज सरकारचा मी जन्मभर पुरस्कर्ता राहीन. जोपर्यंत आम्ही (नागरिकच) तुरुंगात आहोत, तोपर्यंत इंग्लंडच्या राजेसाहेबांच्या भारतातील रयतेच्या लाखो घरकुलात आनंद आणि समाधान कसे लाभेल? कारण ते आणि आम्ही एकाच रक्ताचे आहोत. पण आमची सुटका झाली तर सारी रयत हर्षाने आरोळ्या ठोकील आणि शिक्षा सूडबुद्धी न ठेवता माफी आणि पुनर्वसनावर भर देणाऱ्या सरकारचा जयजयकार करील.
'एकदा मी स्वत:च सरकारच्या बाजूने झालो, की मला गुरूस्थानी मानून रक्तरंजित क्रांतीचे स्वप्न बघणारे भारतातील व परदेशातील हजारो तरुण पुन्हा ब्रिटिश सरकारच्या बाजूने येतील.'
'माझी भविष्यातील वागणूक सरकारला अनुकूल राहील. इंग्रज सरकारला ज्या पद्धतीने माझ्याकडून सेवा करून घ्यावीशी वाटेल, त्या पद्ध्तीने काम करण्यास मी तयार आहे. मला तुरुंगात ठेवून सरकारला काय मिळेल? यापेक्षा मला सोडाल तर त्याहीपेक्षा जास्त फायदा सरकारचा होईल. माझ्यासारखा वाट चुकलेला पुत्र आपल्या पितारुपी ब्रिटिश सरकारच्याच दरबारात नाही येणार तर कुठे जाणार?'
सावरकरांचा १४ नोव्हेंबर १९१३चा हा माफीनामा भारत सरकारच्या अर्काइव्हजमध्ये असल्याचे शेट्ये यांनी नमूद केले आहे. टकले यांनी म्हटले आहे की, सावरकरांनी इंग्रज सरकारकडे एखादे-दुसरे माफीपत्र दिले नाही, तर एकूण सात माफीपत्रे दिली आहेत.
सावरकर चार जुलै १९११ रोजी तुरुंगात दाखल झाले. आणि माफी मागणारे पहिले पत्र त्यांनी ३० ऑगस्ट १९११ रोजी लिहिले. पहिले सहा महिने सावरकरांना एकट्याला एका सेलमध्ये ठेवले होते. त्या काळात त्यांना कोणतेही काम सोपवले नव्हते. म्हणजेच त्यांचा छळ वगैरे काही होत नव्हता. फक्त त्यांना कुणाला भेटता येत नव्हते.
सावरकरांनी सुमारे पंचवीस वर्षे तुरुंगात काढल्याची चर्चा केली जाते. प्रत्यक्षात ते नऊ वर्षे दहा महिने तुरुंगात होते. या काळात त्यांनी स्वतः सात माफीपत्रे लिहिली. आणि त्यांच्या पत्नीने त्यांच्यातर्फे मुंबई सरकारकडे तीन माफीपत्रे लिहिली. सावरकरांच्या पत्रांची भाषा पाहिली तर ती किती आर्जवी आणि ब्रिटिश सरकारची भलावण करणारी आहे, हे लक्षात येते आणि ती वाचून आश्चर्यही वाटते.
महत्त्वाची बाब म्हणजे हे सावरकरांच्यावरचे आरोप नाहीत. इतिहासाच्या पानांमध्ये दडलेले हे पुरावे कागदपत्रांच्या आधारे पुढे आणण्यात आले आहेत. यातील काही गोष्टी जुन्या असल्या तरी काही नव्याने पुढे आल्या आहेत. टकले यांनी त्यासाठी २१ हजार कागदपत्रांचा अभ्यास केला.
सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 'येणाऱ्या काळात ब्रिटिश साम्राज्याला हिंदूंच्या मदतीनेच समान ध्येय ठरवावे लागेल. हिंदू महासभा आणि ब्रिटिशांनी समान उद्देश ठेवून काम केले पाहिजे.'
सावरकरांच्या या पत्रातून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे, काँग्रेस ही त्या काळात राष्ट्रीय चळवळ होती. रुढार्थाने राजकीय पक्ष नव्हता. म्हणजेच काँग्रेस आणि मुस्लिमांना विरोध करणे हा समान उद्देश सावरकरांनी सूचित केला होता. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये १९४२च्या चले जाव चळवळीला विशेष महत्त्व आहे. या चळवळीला सावरकरांनी जाहीरपणे पत्रक काढून विरोध केला होता. एवढेच नाही, तर त्या काळात सावरकरांचे कार्यकर्ते राष्ट्रीय चळवळीच्या विरोधात पोलिसांना म्हणजे ब्रिटिश सरकारला माहिती पुरवत होते. म्हणजे महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधात, ब्रिटिशांचे खबरे म्हणून सावरकरांचे अनुयायी काम करीत होते. 'रिस्पॉन्सिव्ह को-ऑपरेशन' अंतर्गत ब्रिटिश सरकारला मदत करायची, असे त्यांचे धोरण होते.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इंग्रज सैन्यात लष्कर भरतीसाठी हिंदू महासभेने रिक्रूटमेंट बोर्डस् तयार केली होती. जपान भारतावर आक्रमण करणार, असा प्रचार केला जात होता. जपान त्यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मदत करत होता आणि भारताला मदत करण्यासाठी नेताजी जपानच्या मदतीने आक्रमण करणार होते. म्हणजे नेताजींच्या विरोधात सावरकर उभे ठाकले होते.
तुरुंगातून सुटल्यानंतर कोणत्याही राजकीय आंदोलनात सहभागी होणार नसल्याची हमी सावरकरांनी दिली असली तरी सामाजिक सुधारणेच्या नावाखाली त्यांचे राजकीय कार्य सुरूच होते. हिंदू महासभेचे अनेक राजकीय कार्यक्रम होत होते. आणि ब्रिटिशांना सोयीचे असतील अशा कार्यक्रमांना परवानगीही मिळत होती. हिंदू महासभेच्या धर्मांतराच्या किंवा शुद्धीकरणाच्या कार्यक्रमांना परवानगी मिळत होती.
सावरकरांच्या अटकेसंदर्भातही विविध प्रवाद आहेत. नव्या माहितीनुसार त्यांना १३ मार्च १९१० रोजी लंडनमध्ये अटक झाली. नाशिकचे तत्कालीन कलेक्टर जॅक्सन यांच्या हत्येसाठी मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. अनंत कान्हेरेनी ज्या पिस्तूलाने जॅक्सनची हत्या केली ते पिस्तूल सावरकरांनी लंडनहून पाठवले होते.
त्यांच्यावर दोन आरोप होते. खून आणि खुनाचा कट रचणे. त्यासाठी प्रत्येकी पंचवीस वर्षांच्या अशा दोन जन्मठेपेच्या शिक्षा त्यांना सुनावण्यात आल्या होत्या. काळ्यापाण्याची शिक्षा झालेल्या प्रत्येक कैद्याचे जेल हिस्टरी तिकीट असायचे. त्यामध्ये त्याचा गुन्हा, शिक्षा आणि त्याला दिलेल्या कामाचा उल्लेख असायचा. सावरकरांच्या या तिकिटावर कैदी नंबर ३२७७८, सेल ५२, लेव्हल ३ असा उल्लेख होता. त्यांचा भाऊ गणेश आणि बाबाराव हेसुद्धा त्यांच्यासोबत तुरुंगात होते.
स्वातंत्र्यसैनिक त्रैलोक्यनाथ चक्रवर्ती यांनी लिहिले आहे की, जेलमधील राजकीय कैदी दोन गटामध्ये विभागले होते. नेमस्त आणि जहाल किंवा अतिरेकी (मॉडरेट आणि एक्सट्रिमिस्ट). सावरकर बंधू, बंगाली क्रांतिकारक बरिंद्र घोष आणि इतर काही कैदी जे आधी आले होते, ते छळवणुकीने त्रासले होते. ते आमच्या संभाव्य चळवळीत सहभागी झाले नाहीत. सावरकर बंधू आम्हाला खासगीत प्रोत्साहन देत होते, परंतु उघडपणे आमच्यासोबत येण्यास तयार नव्हते.
अंदमानमध्ये आलेल्या राजकीय कैद्यांपैकी फक्त सावरकर बंधू आणि बरिंद्र घोष या दोघांनी इंग्रजांकडे दयेची याचना केली. सावरकरांनी केलेल्या दयेच्या याचनेच्या सहा तारखा उपलब्ध आहेत, त्या- तीस ऑगस्ट १९११, चौदा नोव्हेंबर १९१३, चौदा सप्टेंबर १९१४, दोन ऑक्टोबर १९१७, चोवीस जानेवारी १९२० आणि तीस मार्च १९२०. याशिवाय सावरकरांच्या पत्नीनेही जुलै १९१५, ऑक्टोबर १९१५ आणि जानेवारी १९१९ मध्ये मुंबई सरकारकडे तीन माफीपत्रे सादर केली होती.
यासंदर्भातील सगळी वस्तुस्थिती विचारात घेऊन परिस्थितीचे मूल्यमापन करावे लागेल. सावरकरांनी सुमारे दहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा भोगली ही वस्तुस्थिती आहे. आणि दहा वर्षे हा तसा मोठा काळ आहे. परंतु विरोध करणारांचे म्हणणे असे आहे की, सावरकर माफी मागून बाहेर पडले तरी ते स्वातंत्र्यवीर, मग माफी न मागता अंदमानमध्येच ज्यांनी देशासाठी प्राण सोडले त्या वीरांना काय म्हणायचे ? माफी मागून सुटका करून घेतलेल्या सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हटल्यामुळे देशासाठी प्राण सोडलेल्या त्या अनेक वीरांचा अपमान ठरतो. अर्थात असे कोणतेही मूल्यमापन आजच्या काळात करणे योग्य ठरणार नाही, किंबहुना ते सावरकरांसह इतरांवरही अन्याय करणारे ठरू शकेल.
सावरकर विरोधकांचे आणखी एक म्हणणे असे की, माफी मागणाऱ्या सावरकरांना भारतरत्न द्यायचे असेल तर फासावर गेलेल्या भगतसिंग-राजगुरु-सुखदेव यांच्यासह अनेक वीरांचा अपमान ठरतो.
विषयाला अनेक बाजू आहेत. भावनेच्या आहारी न जाता त्या समजून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. सावरकरांना भारतरत्न द्यावे अशी मागणी करणाऱ्यांची बाजू आहे तशीच विरोधकांचीही एक बाजू आहे. प्रामुख्याने हा संघर्ष ब्रिटिशविरोधी आणि ब्रिटिशधार्जिन्या प्रवृत्तीमधला आहे. तसेच तो भिन्न विचारधारांमधला आहे. या संघर्षातूनच गांधीजींची हत्या झाली हे विसरता येत नाही. शिवसेनेसारख्या पक्षाने केवळ उथळ भावनिक राजकारण करण्यापेक्षा विषय नीट समजून घेऊन भूमिका घेतली पाहिजे. नाहीतर महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणात अनेक गफलती होत राहतील.