वेदोक्त प्रकरण : हा संघर्ष क्षत्रियत्वासाठी नाही तर वर्णव्यवस्था संपवण्यासाठी व्हायला हवा
संयोगिताराजे यांना भेदभावजनक वागणूक मिळाल्याची घटना पहिली नाही. भुतकाळात देखील देशातील महान राजांना या भेदभावाला सामोरे जावे लागले आहे. हा संघर्ष केवळ क्षत्रियत्व सिद्ध करण्याचा नाही तर जुलमी, भेदभाव मानणारी वर्णव्यवस्था नष्ट करण्याचा आहे. नेमकं याच मुद्द्यावर परखड भाष्य करणारा सागर गोतपागर यांचा हा लेख नक्की वाचा...;
नाशिकच्या (Nashik) काळाराम मंदिरात (Kalaram temple) संयोगिताराजे यांच्याबाबत भेदभाव केल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे. इंस्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर करत त्यांनी हा आरोप केला आहे. आरोपात त्यांनी म्हटले आहे की काळाराम मंदिरातील महंतांनी त्यांच्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी त्या महंतांना ठाम विरोध केला. यावर सदर महंत वेदोक्त मंत्रांचा (Vedokta mantra) त्यांना कसा अधिकार नाही ते सांगू लागले. यावर आम्ही परमेश्वराची लेकरे असून त्याची स्तुती करायला त्याला भेटायला आम्हाला तुमच्यासारख्या मध्यस्थीची गरज नसल्याचे खडसावून सांगत त्यानी त्या महंतांना खडे बोल सुनावले. यानंतर त्यांनी गेल्या शंभर वर्षात ही मानसिकता का बदलली नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.
संयोगिताराजे यांना सदर महंताने दिलेली ही वागणूक नवी नाही. छत्रपती शिवरायांना (Chhatrapati Shivaji maharaj) देखील याचा सामना करावा लागला होता. छ. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात देखील अशाच प्रकारची घटना घडली होती. शिवरायांनी जेव्हा राज्याभिषेक करायचा ठरवलं तेव्हा त्यांच्या राज्यातील बाह्मणांनी याला कडाडून विरोध केला. याला कारण देताना त्यांनी राज्याभिषेक हा फक्त क्षत्रियांचाच केला जातो असे फर्मावले. परशुरामाने ही पृथ्वी निक्षत्रिय केली असुन आज पृथ्वीवर एकही क्षत्रिय शिल्लक राहीला नाही. त्यामुळे आपण शुद्र आहात. शुद्र हा राजा होऊ शकत नाही. त्यामुळे आपला राज्याभिषेक होऊ शकत नाही. शिवाजी महाराज हे ऐकून थांबले नाहीत. त्यांनी वाराणसीवरून गागाभट्टाला आणले त्याला संपत्ती दिली. त्याच्याकडून राज्याभिषेक केला.
याच प्रकारचा एक प्रसंग छत्रपती शाहू राजांच्या आयुष्यातदेखील घडला होता. ते अंघोळीला तलावावर गेले असताना त्यांच्या लक्षात आले की भटजी वेदोक्त मंत्र न म्हणता पुराणोक्त पद्धतीचे मंत्र म्हणत आहे. त्यांनी त्याबाबत विचारले असता त्याने सांगितले की, वेदोक्त मंत्र फक्त क्षत्रियासाठी म्हणतात. यावर महाराज चिडले. यानंतर त्यांनी ब्राह्मणेतर चळवळ सुरू केली. तिचे नेतृत्व केले. त्यांनी पौरोहित्य प्रशिक्षण देणाऱ्या शाळा सुरू केल्या. त्यातुन बहुजनातील पुजारी, जंगम, गुरव , स्वामी निर्माण झाले. ते आजही गावगाड्यात पौरोहित्य करताना दिसतात. जोतीबाच्या देवळात आजही कांबळे त्यांच्या समाजाचं पुजेचं काम करतात. त्यांनी कुळे वाटुन घेतलेली आहेत. गावागावात त्याबदल्यात ते धान्य जमा करतात. अजित ऊत्तम कांबळे हे वडीलोपार्जित पुजारी आहेत. ते सांगतात 'शाहु महाराजांच्या काळापासुन आमच्या घरी हे काम केले जाते. आमच्या भावकीतील सर्व लोक पुजाऱ्याचं काम करतात.
या दोन महान राजांना भेदभावाचा सामना करावा लागला होता. भेदभावाच्या या घटना भूतकाळ होऊच दिल्या जात नाहीत. वर्तमानात देखील पुढच्या पिढ्यांना अशीच वागणूक दिली जाते. भेदभावाचा हा वारसा चालवणारे कोण आहेत ? त्यांना ही विषमता का हवी आहे ? या विषमतेचा त्यांना कोणता सांस्कृतिक फायदा होणार आहे? या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे आहे.
काही वर्षापूर्वी पुण्यात (Pune) घडलेले सोवळे प्रकरण याच भेदभावाचा एक प्रकार होता. मेधा खोले नावाच्या एका ब्राह्मण स्त्रीने मराठा असलेल्या निर्मला यादव यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत तिने म्हटले होते की माझ्या घरातील सोवळ्याच्या स्वयंपाकास ब्राह्मण महिला आवश्यक असताना जात लपवून निर्मला यादव यांनी हा स्वयंपाक केला. जात लपवून स्वयंपाक केल्याने माझे सोवळे बाटल्याची तक्रार देत या मराठा स्त्रीवर तक्रार दाखल केली होती. संतापजनक बाब म्हणजे या बाईने निर्मला यादव यांच्या घरात छत्रपती शिवरायांचा फोटो पाहिल्यावर त्यांच्या जातीचा अंदाज लावला. धक्कादायक म्हणजे ज्या शिवरायांच्या फोटोकडे पाहून लोकांना अठरा पगड जातीचे स्वराज्य आठवते. त्यांचा फोटो पाहून उच्च पदावर असुणाऱ्या या बाईंना त्या स्त्रीची जात आठवते. या प्रकारावरून उच्च जातीय मानसिकता किती खोलवर रुजली आहे याची प्रचिती येते.
याचा अर्थ असा होतो की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारणाऱ्या व्यवस्थेला तोडत तिला पर्यायी व्यवस्था शाहु राजांनी (Rajarshi Shahu Maharaj) निर्माण केली होती. महात्मा फुलेंना (Mahatma Phule) वरातीतुन हाकलून लावणारी अशाच प्रकारची मानसिकता होती. त्याच मानसिकतेनं बाबासाहेबांना पाणी नाकारलं. दलितांच्या गळ्यात झाडू बांधला, स्त्रियांचे स्वातंत्र्य नाकारले. मराठा समाजाला शुद्राची वागणुक देणे आणि दलितांना अस्पृश्य बनवणं यांची मुळं भारतीय समाजव्यवस्थेत वर्णाश्रमाच्या रूपात रूजलेली आहेत. याला बळी पडलेल्या मराठा समाजाकडुन आजही अस्पृश्यता पाळली जाते. अनेक गावात आजही दलितांना मंदिरप्रवेश नाही. दलितांना सवर्णांच्या स्मशानभूमीत प्रेत जाळू दिले जात नाही. ज्या व्यवस्थेचे बळी मराठा आहेत ती व्यवस्था टिकवण्यासाठी त्यांचाच मोठा हातभार आहे. ही वस्तुस्थिती आज मान्यच करावी लागेल.
दक्षिण आफ्रीकेत (South Africa) गांधीजींचे सामान गोऱ्यांच्या डब्यातुन फेकुन दिले गेले. तेव्हा खरी गांधीजींना अस्पृश्यतेची तीव्रता समजली. या घटनेनंतर त्यांनी अस्पृश्योध्दाराचे काम सुरू केले. नाशिकमधील ही घटना पुण्यात घडून गेलेली घटना मराठ्यांच्या दृष्टीने गांधीजींच्या आयुष्यातील घटनेसारखीच आहे. कुणाच्या तरी स्पर्शाने सोवळे बाटले असे म्हणणे, वेदोक्त प्रकारचे मंत्र म्हणण्यास नकार देणे हे अस्पृश्यता पाळण्याचे लक्षण आहे. याचा अर्थ ब्राम्हण मराठ्यांनाही अस्पृश्य समजतात.
दुसऱ्याला शुद्र ठरवणे हे फार मोठे षडयंत्र आहे. दलितांच शुद्रत्व मराठ्यांकरवी पाळलं गेलं. त्यात त्यांचं सवर्णत्व गोंजारलं गेलं. त्याचवेळी त्यालाही शुद्र ठरवलं. एका गुलामाला तो गुलाम आहे हे कळु नये म्हणुन दुसऱ्याला गुलाम करायला लावले व त्याचवेळी त्यांच्या मनामध्ये सवर्ण असल्याचा दुराभिमान पेरला. हे करतानाच त्यांना पद्धतशीरपणे आपली गुलामी करायला लावली. मानसिकतेचा अभ्यास करून बनवलेली हि व्यवस्था आहे.
महाराष्ट्रातील बहुसंख्य मराठा समाज हा शेती करतो. पशुपालन हा शेतीला जोडधंदा आहे. मराठ्यांना शुद्र ठरवणारांना ,सोवळे पाळणारांना मराठ्यांनी पिकवलेली भाजी चालते, मराठ्यांनी पिकवलेल्या ऊसाच्या साखरेचा चहा चालतो, मराठ्यांनी पिकवलेल्या कापसापासुन बनलेल्या धाग्याचं जाणवं चालतं , त्यांच्या गाईचं शेण चुर्ण म्हणुन खायला चालतं , गोमुत्र चालतं, लोणी , दुध चालतं पण त्यांना वेदोक्त मंत्र म्हटल्याचे चालत नाही. छत्रपतींच्या वारसदाराला देखील हे लोक शुद्रच समजतात. पण मराठा समाजाचा कुठलाच विधी आज ब्राम्हणाशिवाय होत नाही हा विरोधाभास आहे.
वारंवार अशा भेदभावाच्या घटना घडतात याचा अर्थ यांना अशा घटनांमधून आपण शुद्र आहोत क्षत्रिय नाही, हे वारंवार बिंबवायचं आहे. वर्णव्यवस्थेत ब्राह्मण सर्वोच्च स्थानावर तर क्षत्रिय द्वीतीय स्थानावर आहेत. क्षत्रिय संपल्याचे सांगत त्यांनी संपुर्ण क्षत्रिय वर्ग हा शुद्रामध्ये वर्ग केला असुन हे सर्व शुद्र आपल्या सेवेसाठी आहेत असे नवे स्ट्रक्चर ऊभा केलेले आहेत.
मराठ्यांनी या टप्प्यावरच्या लढाईत आपण क्षत्रिय की शुद्र हि भुमिका न घेता हि वर्णव्यवस्थाच शोषणाचं मुळ आहे आणि हे मुळच ऊखडून फेकत वर्णव्यवस्थेच्या विरोधात एल्गार केला पाहीजे.