संजय राऊतांना फुलबाज्या उडवायला लावून लोक मतं देतील का? विश्वंभर चौधरी
मराठवाड्यात इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही सरकारने अद्यापपर्यंत ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही. या सरकारला पुन्हा निवडून द्यावं अशी कोणती कामगिरी ठाकरे सरकारने केली आहे का? वाचा सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी ठाकरे सरकारच्या कामगिरीचं केलेलं विश्लेषण;
फडणवीस- दरेकर- चंद्रकांतदादा मंत्र्यांच्या आधी दौरा करतात. परवा ते येणार हे कळल्यावर अशोकराव चव्हाणांनी घाईघाईत रात्री अर्धापूरचा दौरा केला. 2014 ते 2019 विरोधी पक्ष फार तुरळक ठिकाणी दिसला. आत्ता आहे तसा विरोधी पक्ष कधीच दिसला नाही. खडसेंचा जमीन घोटाळा असो की चिक्की प्रकरण, एकही 'सोमय्या' पहायला मिळाले नाहीत, ना विरोधी पक्ष म्हणून कोणी कोणत्या प्रकरणाचा नीट पाठपुरावा केला.
आत्ता मविआच्या तीन पक्षांना मिळालेली सत्ता जनाधारातून मिळालेली नसून आकडेमोडीतून आलेली आहे. ही आकडेमोड निवडणुकीच्या वेळी अडचणीची ठरू शकते कारण किमान शंभरावर विधानसभा मतदारसंघ असे आहेत की जिथं उमेदवारीसाठी या तीन पक्षांचीच आधी रस्सीखेच असणार आहे. त्यातून होणारा संघर्ष काल दिसला. शिवसेनेचे सुभाष साबणे काहीही न करता भाजपाला मिळाले आणि भाजपाला देगलूरात आयता उमेदवार मिळाला.
राज्य सरकारला लोकांनी पुन्हा निवडून द्यावं अशी कोणतीही कामगिरी आजपर्यंत दिसलेली नाही. उलट दोन मंत्र्यांच्या विकेट गेल्या, दोघांच्या आता कधीही जाऊ शकतात अशी स्थिती आहे. गेली दोन वर्ष कोविडची ढाल मिळाली.
यापुढे परफाॅर्मन्स दाखवावा लागेल. दररोज संजय राऊतांना फुलबाज्या उडवायला लावून लोक मतं देतील या भ्रमात राहू नका. अन्यथा 2024 साली महाराष्ट्रात पुन्हा एखाद्या आंदोलनावर खापर फोडण्याची वेळ येऊ शकते. किंवा पुन्हा 2011च्या लोकपाल आंदोलनावर जबाबदारी टाकावी लागेल. मराठवाडा विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी अजून विलंब लावला तर लोक मतं देतांना दहादा विचार करतील. राज्य सरकारमध्ये कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही हे त्यातून ठळक होईल. केंद्राचा परफार्मन्स वाईट आहे म्हणून राज्यात काही केलं नाही तरी लोक मत देतील हा भ्रम आहे.