सेनापती उद्धव ठाकरे!
दसरा मेळाव्या निमित्त राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणाचे ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी केलेले विश्लेषण... नक्की वाचा;
उद्धव ठाकरे हे प्रकरणच अनपेक्षित आहे.
राजच्या करिष्म्यापुढे हे कसले टिकतात, असे लोक म्हणत असताना त्यांनी पक्षावर मांड ठोकली आणि पक्ष वाढवत नेला. बाळासाहेबांच्या पश्चात, मोदी लाटेत हे वाहून जातील, असे लोक म्हणत असताना, त्यांनी २०१४च्या निवडणुकीत एकाकी लढत, खणखणीत यश मिळवले. आणि, वर्षभरापूर्वीच ज्यांची फरफट होतेय, असे वाटत होते, ते उद्धव आज महाराष्ट्राचे कणखर मुख्यमंत्री म्हणून विरोधकांना रोज नवे धक्के देताहेत.
हिंदुत्वाच्या ट्रॅपमध्ये उद्धव ठाकरे अडकत नाहीत, ही भाजपची सगळ्यात मोठी गोची आहे. कॉंग्रेससोबत सरकार चालवताना उद्धव दररोज गोंधळतील, असा भाजपचा कयास होता. घडते आहे ते उलटेच. भाजपचा गोंधळ वाढत चाललाय आणि उद्धव ठाकरे मात्र, अत्यंत सुस्पष्ट मांडणी करताहेत.
आजचे उद्धव यांचे भाषण हा त्याचा पुरावा होता.
कधी सुशांत सिंग प्रकरण तर कधी कंगना यांच्या आडून महाराष्ट्राची यथेच्छ बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. अर्णबसारख्यांना अंगावर सोडले गेले. राज्य सरकारला आर्थिक अडचणीत आणले गेले. दुसरीकडे, साक्षात राज्यपालांनी 'सेक्युलरिझम'चा उल्लेख शिवीसारखा केला.
राम मंदिर आणि असा सगळा माहोल तयार होत असताना, उद्धव यांना खिंडीत गाठले गेले. आदित्य यांना कोंडीत पकडले गेले.
उद्धव सगळ्यांना पुरून उरले. मात्र, ते बोलत काहीच नव्हते.
अर्णबने त्यांना ललकारले, तरी ते शांत राहिले. कंगनाने एकेरीवर आणले, तरी गप्प राहिले. नितेश राणे हवे ते पचकले, तरी उद्धव चूप बसले. किंबहुना, संयमी असेच त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे.
आज मात्र, त्यांनी मास्क काढला आणि ते जोरकस बरसले.
'कसलं घंटा हिंदुत्व तुमचं, आमचं हिंदुत्व हे त्यापेक्षा व्यापक आहे', असे सांगत उद्धव यांनी थेट प्रबोधनकारांचा वारसा सांगितला. ज्ञानेश्वर - तुकारामाच्या हिंदुत्वाशी जोडून घेत, आरएसएस आणि भाजप यांच्यातच त्यांनी आज जुंपवून दिली.
'काळ्या टोपीखाली डोकं आहे की नाही?' असं विचारत राजभवनातील आजोबांनाही छान शिलगावली. मोहन भागवतांनी सांगितलेला हिंदुत्वाचा अर्थ आणि त्यांचे आजचे पूर्ण भाषण 'सामना'ने सविस्तर प्रसिद्ध करायला हवे, असे सांगत उत्तुंग षटकार लगावला.
एरव्ही, नको तेवढ्या संयमानं बोलणा-या मुख्यमंत्र्यांनी आज मुख्यमंत्री पदाचा मास्क काढून जे चौफेर घणाघाती भाषण केलं, त्यानं कित्येकांच्या तोंडावर मास्क लागेल. मेणाहूनी मऊ वाटणा-या उद्धव यांच्या या वज्राहून कठोर रूपाने भल्या-भल्यांचे तोंड बंद होईल.
'माझे सरकार पडणार नाहीच, पण तुम्ही मात्र, तुमचं केंद्रातलं सरकार सांभाळा. तुमचा पक्ष सांभाळा', असं सांगताना उद्धव यांचा निशाणा थेट दिल्लीच्या दिशेने होता. भाजप किती महाराष्ट्रविरोधी आहे, हे सांगण्यासाठी उद्धव यांना काहीच कष्ट पडू नयेत, अशी खुद्द भाजपचीच कर्तबगारी आहे!
आज जे थेट 'नॅरेटिव्ह' उद्धव ठाकरे यांनी सेट केले आहे, त्यामुळे बरीच समीकरणे बदलणार आहेत.
उद्धव ठाकरे हे रसायनच 'अनप्रेडिक्टेबल' आहे!
विरोधक तर सोडाच, सरकारमधील मित्रपक्षांनाही एव्हाना जाणवलं असेल, वाटतं एवढं हे प्रकरण सोपं नाहीए.
ब्राव्हो उद्धवराव, तुम्ही अपेक्षा उंचावून ठेवल्यात.
(संजय आवटे यांच्या फेसबुक भिंतीवरून)
- संजय आवटे