तीन मुर्ती भवन आणि सर्व भारतीय पंतप्रधानांच्या स्मृतीस अभिवादन

पंतप्रधान श्री. मोदी यांनी 'तीन मूर्ती भवन' या इमारतीमधे 'भारतीय पंतप्रधानांचे स्मृती संग्रहालय' या स्वरूपात दालनाचे उदघाटन केले. पुर्वी तीन मूर्ती भवन हे , भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचे स्मारक म्हणून ओळखले जात होते ,आता ते भारतीय पंतप्रधानांचे स्मारक म्हणून ओळखले जाईल. या स्मारकात नेहरूंबरोबर देशाच्या सर्वच पंतप्रधानांच्या स्मृती जतन केल्या आहेत. याचे उदघाटन विद्यमान पंतप्रधानांच्या हस्ते झाले. ही आनंदाची बाब आहे सांगताहेत राज कुलकर्णी....;

Update: 2022-04-16 09:03 GMT


नेहरूच्या स्मारका प्रमाणेच दिल्लीत लालबहादुर शास्त्री स्मारक, चौधरी चरणसिंग स्मारक, इंदिरा आणि राजीव गांधी यांचे स्मारक ही स्वतंत्रपणे आहेत. पण सर्व पंतप्रधानांचे स्मारक उभारले गेले ते नेहरूंच्या स्मारकामधे ही खरं तर खूप सूचक अशी घटना आहे. मोदींचे नेहरू प्रेम सर्वश्रुत आहे पण नेहरूंना पहिले पंतप्रधान म्हणून या स्मारकात जागा दिली गेली आहे ही बाब नेहरूंचा मोठेपणा स्पष्ट करणारी आहे ,म्हणून केंद्र सरकारच्या या कृतीचे स्वागत करायला हवे!

नेहरूंनी या देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून या देशाची सेवा , प्रथम सेवक या स्वरूपात याच तीन मूर्ती भवन मधून केली आणि त्यांची अंतिम यात्रा ही याच भवनातून निकाली. ही वास्तू आणि नेहरू यांच्यातील अद्वैत श्री. मोदींनाही मान्य असेल म्हणून त्यांनी या स्मारकाचे रूपांतर सर्व पंतप्रधानांचे स्मारक म्हणून करताना त्यात नेहरूंच्या स्मृती समस्त भारतीयांसाठी जतन करण्याचे कार्य केले आहे.

तीन मुर्ती भवनचा इतिहास ,हा सिविलियन लीडर हाऊस असा आजीबात नसून हे भवन भारतीय लष्कराशी संबधित आहे. तीन मुर्ती भवन ही वास्तू 1930 साली ,ब्रिटीश इंडियन आर्मी च्या कमांडर-ईन-चीफ चे निवासस्थान म्हणून ब्रिटीश वास्तूविशारद रॉबर्ट रस्सेल यांच्या प्लँन नुसार बांधण्यात आली. त्यावेळी ही वास्तू ' Flagstaff House' म्हणून बांधली गेली. भारताला स्वातंत्र्य मिळण्याची प्रक्रिया जेंव्हा 1945 साली दुस-या महायुद्घानंतर सुरू झाली तेंव्हा या वास्तूत राहत होते, ब्रिटीश इंडियन आर्मीचे कमांडर ईन चीफ , फिल्ड मार्शल क्लाऊड अकिनलेक !

ब्रिटन मधील पंतप्रधानांचे निवासस्थान हे लंडन मघे 10 Downing Street असे आहे. यात धर्तीवर 10 Janpath हे निवासस्थान भारतीय पंतप्रधानांसाठी असताना नेहरूंनी पंतप्रधान म्हणून कारभार तीन मुर्ती भवनमधून का केला असावा? खरं तर हा मोठा प्रश्न आहे!

तीन मुर्ती भवन ही वास्तू , भारतीय पंतप्रधानांचे निवासस्थान आणि कार्यालय का झाले ,याची माहीती अनेकांना नाही. पण ही माहीती विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असण्याची कांही शक्यता नक्कीच आहे! म्हणून तर त्यांनी या वास्तूस सर्व पंतप्रधानांच्या स्मृती स्मारक म्हणून आज उदघाटन केले आहे.

तीन मुर्ती भवन ही ईमारत पुर्वी लष्कर प्रमुखाची निवासी आणि प्रशासकीय ईमारत होती आणि हीच ईमारत स्वातंत्र्यानंतर नेहरूंची म्हणजे पहिल्या भारतीय पंतप्रधानाची आणि आज सर्व भारतीय पंतप्रधानांची स्मारक बनली ही बाब खूप महत्वाची आहे!

तीन मुर्ती भवन ही ईमारत भारताच्या सर्व पंतप्रधानांच्या कार्याची स्मारक बनली हे पाहताना , महत्त्वाची बाब लक्षात ठेवली पाहिजे ती अशी की, भारतीय उपखंडातून ब्रिटीश सत्ताधीश निघून गेल्यापासून ज्या देशात लोकशाही व्यवस्था उत्तम प्रकारे कार्यान्वयीत आहे, असा भारत हा एकमेव देश आहे.

पाकिस्तानमध्ये अनेक वेळा लष्कराने देशाचा ताबा घेतला, बांग्लादेशातही असेच घडले नि श्रीलंकेतही हे झाले. अफगाणिस्तानबद्दल तर विचारही नको करायला! चीनमध्ये ब्रिटिशांनी चीन सोडून जाताना 'ट्रान्सफर ऑफ पावर'द्वारे 'चँग कै शेक'च्या नेतृत्वाखालील 'रिपब्लिक ऑफ चायना' सरकारकडे सत्ता सूत्रे दिली. पण जपान विरोधातील युद्धातून तयार झालेल्या माओ त्से तुंग या लष्करी नेतृत्वाने हे सरकार उध्वस्त केले. सैन्याने देश ताब्यात घेणे हे सयाम म्हणजे आजच्या थायलंडमध्ये घडले, म्यानमारमध्येही घडले. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या केवळ आठवडाभरापूर्वी म्यानमारमध्ये आँग सान यांची हत्या झाली व देश लष्कराने ताब्यात घेतला. अशी अजूनही अनेक उदाहरणे सांगता येतील. पण भारतात असा प्रयत्नही होऊ शकला नाही. भारत लोकशाही व्यवस्थेत कायम राहिला, याचे श्रेय नेहरूंना नक्कीच आहे.

भारतास स्वातंत्र्य देत असताना तीन मूर्ती हाऊस हे निवासस्थान तत्कालिन ब्रिटिश आर्मी चीफ क्लाऊड अकिनलेक यांच्याकडे होते. नेहरू खरेतर ट्रान्सफर ऑफ पॉवर' नंतर '10 Downing Street'च्या धर्तीवर '१० जनपथ' हे निवासस्थान निवडू शकत होते. पण त्यांनी हेतूत: तीन मूर्ती हाऊसबद्दल आग्रह धरला नि चीफ आर्मी स्टफ क्लाऊड अकिनलेकला घराबाहेर काढले. ही बाब तत्कालीन ब्रिटीश भारतीय आर्मीतील सर्वच प्रभावी अशा, सैन्याधिका-यांसाठी खूप सूचक होती.

भारतीय सैन्यदलातील सर्व सैन्य अधिका-यांचे हुद्दे नि पदे स्वतंत्र भारत सरकारने पुढे तसेच कायम केले होते. भारतीय सैन्यदलांची स्थापना स्वातंत्र्यापूर्वी कित्येक दशके झालेली होती. त्यामुळे सैनिकांच्या भारत देशाप्रती असणा-या निष्ठेबरोबर स्वत:च्या पलटणीची, ब्रिगेडची निष्ठा त्यांना प्रिय होती. आझाद हिंद सेनेतील सैनिकांना सैन्यात पुनर्भरती करून घेण्यास तत्कालीन सर्वच वरिष्ठ सैन्यधिका-यांचा विरोध होता. ही बाब मात्र मुद्दाम सांगितली जात नाही.




 


भारताची स्वातंत्र्यप्राप्ती ही दुस-या महायुद्धाच्या उत्तरार्धातील एक महत्त्वपूर्ण घटना होती. महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सैन्यदलातील अधिका-यांना व भारतीय अधिका-यांनाही विशेष अधिकार दिले गेले होते. युद्धोत्तर काळात अनेक घडणा-या नॉन-मिलिटरी विषयाबाबतही सैन्य अधिका-यांची मतमतांतरे होती.फाळणीचा निर्णय हा पूर्णत: राजकीय होता, ज्यात लष्कराचेही विभाजन झाले. पण लोकशाही देशात राजकीय निर्णय देशातील सरकारचेच असतात ही बाब आजवर ब्रिटिश सरकारचे आदेशांचे पालन करणा-या अनेकांना मान्य नव्हती. यातून सैन्यदलात गांधी, पटेल नि नेहरू या प्रमुख नेत्यांबद्दल आदर होता पण त्या सोबतच काहीशी नाराजीही होती.

गांधीजींची १९४८ ला हत्या झाली नि पटेल १९५० ला वारले. नेहरू १९६४ पर्यंत पंतप्रधान होते. नेहरूंनी मुद्दाम स्वत:चे निवासस्थान आणि पंतप्रधान म्हणून असणारे कार्यालय या ईमारतीत असावे ही भुमिका घेतली होती कारण ब्रिटीश इंडियन आर्मीतील ऑफीसर्सना देखील आता देशात लोकशाही असून संसदेत बहुमत असणा-या पक्षाने वा समुहाने ठरविलेला नेता आता निर्णय घेणार आहे ,ही बाब अधोरेखित करणे गरजेचे होते.म्हणून नेहरूंनी क्लाऊड अकिनलेकला त्याच्या घराबाहेर काढून भारतीय पंतप्रधान पदावरून कारभार या वास्तूमधून केला .

नेहरूंच्या या हेतुत: केलेल्या कृतीवर अनेक सैन्य अधिकारी अगदी भारतीय सैन्य अधिकारी देखील नाराज होते. नेहरू हयात असेपर्यंत अनेक सैन्य अधिका-यांना ही नाराजी व्यक्त करता आली नाही. निवृत्त झाल्यावर त्यांनी लेखन केले तेव्हा त्यांच्या समोर एकटे नेहरूच होते. तरीही चीन-भारत युद्धाबद्दलची पुस्तके वगळता, आजवर कोणत्याही निवृत्त सैन्याधिका-याच्या आत्मचरित्रात, अनुभवकथनात नेहरूंबद्दल अवमानकारक असे काहीही आढळत नाही.

भारतात संसदीय लोकशाही प्रबळ व्हावी आणि त्यात राजकीय विरोधकांबरोबरच, सर्व प्रशासकीय अधिका-यांनी आणि सैन्य अधिका-यांनीही केवळ संसदेचे म्हणजे समस्त भारतीय जनतेचे सार्वभौम मान्य करायला हवे ,ही नेहरूंची भुमिका होती

तीन मुर्ती भवन , ही भारतीय संसदेच्या म्हणजेच समस्त भारतीय जनतेच्या सार्वभौमत्वाची आणि अधिपत्याची ग्वाही देणारी वास्तू आहे. या वास्तुूला ते पावित्र्य जवाहरलाल नेहरूंनी दिलेले आहे, याचे स्मरण आज खूप महत्वाचे आहे!

भारताच्या सर्व जनतेची सेवा करणा-या नेहरू पासून मोदी पर्यंत सर्व भारतीय पंतप्रधानांना विनम्र अभिवादन

© राज कुलकर्णी

Tags:    

Similar News