अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या अनैसर्गिक मृत्यू प्रकरणी आता सीबीआयने कारवाईला सुरूवात केली आहे. त्यामुळे यासंबंधाने दिशा सॅलियनच्या मृत्यूचीही चौकशी होणार हे निश्चित आहे. या दोन्ही आत्महत्या होत्या की हत्या याचे वास्तव लवकरच समोर येईल.
राज्याच्या माजी गृहसचिव चित्कला झुत्शी ज्यांनी राज्य आणि मुंबई पोलीस दोन्हीचे नेतृत्व केले आहे. सध्या सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतरच्या घडामोडींमुऴे मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला तडा गेल्याबद्दल त्यांना अजिबात आश्चर्य वाटत नाही. मॅक्स महाराष्ट्रने यासंदर्भात संपर्क साधल्यानंतर त्यांनी या विषयावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. पण त्यांनी एका जुन्या घटनेची आठवण मात्र सांगितली. पुण्यात 1988मध्ये एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. पण अखेर तो पोलीस कोठडीतील मृत्यू असल्याचे उघड झाले होते.
“1988मध्ये पुण्याची जिल्हाधिकारी म्हणून माझी बदली झाली तेव्हाची घटना मला आठवते. पारधी समाजातील एका आरोपीचा पुण्यातील पोलीस स्टेशनमधल्या वॉशरुममध्ये मृत्यू झाल्याचा प्रकार घडला होता. त्यासंदर्भातला अहवाल वैद्यकीय तज्ज्ञांनी सादर केला होता. या अहवालानुसार त्या आरोपीने पोलीस स्टेशनमधील वॉशरुममध्ये स्वत:च्या शर्टच्या सहाय्याने नळाला लटकून आत्महत्या केली होती. पण तो नळ जमिनीपासून फक्त 3 फूट उंच होता, ही वस्तुस्थिती असल्याने मी तो अहवाल फेटाळला आणि पुन्हा चौकशीचे आदेश दिले.”
त्या आरोपीने गळफास घेतला तेव्हा तो पोलीस कोठडीत होता. ज्याप्रमाणे सुशांत सिंह राजपूतच्या अनैसर्गिक मृत्यूला आत्महत्या म्हणण्याची तत्परता पोलिसांनी दाखवली तशीच त्यावेळी पुणे पोलिसांनी दाखवली होती. झुत्शी यांनी तो अहवाल फेटाळला आणि हे प्रकरण तेव्हाचे एसपी एस गायकवाड यांच्या कानावर घातले. “ ते अतिशय चांगले अधिकारी होते. सध्या त्यांची मुलगी पूर्णिमा गायकवाड पुण्यात पोलीस उपायुक्त पदावर काम करते आहे. (एकेकाळी एस. गायकवाड यांनीही या पदावर काम केले होते.) एस गायकवाड यांना हा प्रकार सांगितल्यानंतर माझी पुण्यातून बदली होईपर्यंत संपूर्ण पुणे जिल्ह्यात कोठडीतील मृत्यू आत्महत्या म्हणून दाखवला जाण्याचा एकही प्रकार घडला नाही.
एवढेच नाहीतर मी पुण्याची जिल्हाधिकारी असेपर्यंत पुणे जिल्ह्यात पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याची एकही घटना घडली नाही. राज्यातील पोलीस दलातील विसंगती (अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक गरजा) दूर केल्या तर संपूर्ण पोलीस दल एक सार्वजनिक सेवा म्हणून पूर्ण ताकदीने चांगले काम करु शकेल”, असे चित्कला झुत्शी यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितले.
वैद्यकीय तज्ञांनी तयार केलेल्या अहवालातून झुत्शी यांना त्या प्रकरणात कुठेतरी पाणी मुरतंय असा संशय आला. त्यांनी पोलिसांना काही प्रश्न विचारले.
प्रश्न - आरोपीने कशाला लटकून आत्महत्या केली?
उत्तर - पाण्याच्या नळाला
प्रश्न - भिंतीवर तो नळ किती उंचीवर आहे?
उत्तर - तीन फूट उंचीवर
प्रश्न - म्हणजे आरोपीची उंची दोन फूट असली पाहिजे, म्हणूनच त्याला आत्महत्या करता आली, बरोबर ना?
चित्कला झुत्शी यांच्या या तर्काच्या आधारे विचार केला तर सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणातही पोलिसांच्या तपासात विसंगती दिसते आहे.
ज्या अभिनेत्याने १५० कोटींचा गल्ला जमवणारा एम. एस. धोनी आणि १४० कोटींपेक्षा जास्त कमाई करणारा छिछोरे यासारखे सुपरहिट सिनेमे दिले, त्याने आपल्या घरातील पंख्याला लटकून गळफास घेत आत्महत्या केली असे सांगितले जात आहे. हा पंखा सुशांत सिंगच्या बेडपासून सहा फूट अंतरावर आहे. सुशांतची उंचीदेखील सहा फुटांपर्यंत होती. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार सुशांतने बेडवरून खाली उडी मारत गळफास घेऊन आत्महत्या केली .
पण सरळ स्थितीत राहिला तर मृत्यू होणार नाही म्हणून तो एका बाजूला कलला होता असे मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे. कॉमन सेन्सने विचार केला तर एखादी व्यक्ती आत्महत्या करत असली तरी गळफास घेतल्यानंतर होणाऱ्या त्रासामुळे पायाखालच्या बेडचा आधार ती घेऊ शकते. म्हणूनच अशा आत्महत्यांमध्ये आत्महत्या करणारी व्यक्ती पायाखाली स्टूल घेते आणि तो पायाने पाडल्यानंतर वाचण्याची कोणतीही शक्यता राहत नाही. पण या प्रकरणात मुंबई पोलिसांनी असा कोणताही विचार केलेला दिसत नाही.