महाराष्ट्राबाहेरील शिवचरित्राचा प्रभाव-डॉ.श्रीमंत कोकाटे
छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास हा केवळ एका जाती-धर्मापुरता किंवा प्रांत-देशापुरता मर्यादित नाही, तर तो जागतिक कीर्तीचा इतिहास आहे, सांगतायहेत इतिहासकार डॉ. श्रीमंत कोकाटे;
शिवरायांच्या समकालीनांनीदेखील शिवरायांच्या शौर्याचा, कार्याचा गौरव केलेला आहे. थेवनॉट त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करताना लिहितो "शिवाजीराजे उंचीने कमी, गव्हाळ रंगाचे, तेजस्वी नेत्राचे, बुद्धिमान आणि दिवसातून एकदाच भोजन करणारे असून त्यांची प्रकृती उत्तम आहे" समकालीन अबे कॅरे सांगतो "पूर्वेच्या देशातील सर्वात थोर व्यक्तिमत्व म्हणजे शिवाजी महाराज आहेत. ते उदार अंत:करण्याचे असून ते सैनिकांना उत्तम पगार देतात. ते शक्यतो रात्रीचा प्रवास करतात. ते थोर सेनानी, सुस्पष्ट निश्चय, अचूक निर्णयक्षमता असणारे राजे आहेत. त्यांच्याकडे उच्च प्रतीची सैनिकविषय गुणवत्ता असून यश मिळविण्यासाठी प्रचंड क्षमता आहे. ते आपल्या सहकाऱ्यांना मोठेपणा देत असतात. ते जसे शस्त्रात कुशल तसेच राजनीतीत देखील कुशल आहेत. ते सतत सैनिकांसोबत राहत असतात व विलासी जीवनापासून दूर राहतात. त्यांनी सिंधू नदीपासून बंगालपर्यंतच्या गंगा नदीपर्यंतचा भाग जिंकायची महत्त्वकांक्षा ठेवलेली आहे. ते स्थापत्य विशारद आहेत. त्यांचे लोक मूर्तीपूजक असले तरी ते माणुसकीने वागतात. शिवाजीराजे यांच्या ठायी खूप कणखरपणा आहे", असे समकालीन अबे कॅरे लिहितो.
डच, फ्रेंच, ब्रिटिश, पोर्तुगाल, मोगल, आदिलशहा यांच्या दप्तरात छत्रपती शिवाजी राजांच्या कार्याचे, व्यक्तिमत्त्वाचे असंख्य पैलू आपणास मिळतात. शिवरायांच्या कार्याचा मराठी, संस्कृत साहित्यावर प्रभाव आहे. तसेच कन्नड, तमिळ, बंगाली, पंजाबी, हिंदी, गुजराती, आसामी इत्यादी भाषावर आणि तेथील जनतेवर प्रचंड प्रभाव आहे.
तमिळ साहित्य आणि व्यक्तींचा भारतीय संस्कृतीवर विशेषता: दक्षिण भारतीय संस्कृतीवर मोठा प्रभाव आहे. सुप्रसिद्ध लोकनेते तामिळनाडूचे दिवंगत मुख्यमंत्री अण्णा दुराई यांनी "शिवाजी कांडम हिंदू राज्यम्" नावाचे नाटक लिहिले. ते नाटक रंगमंचावर तुफान चालले. या नाटकात वेल्लूपुरम गणेशन यांनी शिवाजीराजेंची भूमिका केली. ती खूप गाजली. हे नाटक पाहण्यासाठी महान समाज सुधारक द्रविड संस्कृतीचे मोठे नेते पेरियार रामास्वामी आले होते. नाटकातील वेल्लूपुरम गणेशन यांची प्रभावशाली भूमिका पाहून पेरियार रामास्वामी म्हणाले "हा तर शिवाजी गणेशन!" अशाप्रकारे वेलूपुरम गणेशन यांचे नामकरण "शिवाजी गणेशन" असे झाले. या कलाकाराला पुढे भारतातील कलेच्या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट "दादासाहेब फाळके" पुरस्कार मिळाला. दाक्षिणात्य तमिळ संस्कृतीवर शिवरायांच्या शौर्याचा, कार्याचा, व्यक्तिमत्त्वाचा प्रचंड प्रभाव आहे.
कर्नाटक आणि महाराष्ट्र हे अभिन्न प्रांत आहेत. दोन्ही राज्याचा सांस्कृतिक अनुबंध खूप प्राचीन आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे म्हणतात की "मराठी आणि कन्नड भाषेचा अनुबंध हा मायलेकीचा आहे." शहाजीराजे, संभाजीराजे, शिवाजीराजे, जिजाऊ माँसाहेब यांच्या कार्याचा, विचारांचा प्रचंड प्रभाव कर्नाटकाच्या लोकजीवनावर आहे. याचे अनेक संदर्भ आहेत. यादवाड येथील सावित्रीबाई देसाई यांनी शिवरायांची कोरून घेतलेली प्रतिमा त्याची साक्ष देते.
बंगाल म्हणजे क्रांतीचा ज्वालामुखीच!. पंजाब, महाराष्ट्र आणि बंगाल हे सतत क्रांतीची मशाल घेऊन अन्यायाविरूद्ध लढणारे प्रांत आहेत. बंगालच्या भूमीवर टागोर, सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंद, महायोगी अरविंद घोष इत्यादींनी सतत अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा जिवंत ठेवली. त्यांच्यावर छत्रपती शिवाजीराजांचा मोठा प्रभाव होता. रवींद्रनाथ टागोर हे विश्वकवी होते. त्यांनी "शिवाजी उत्सव" नावाचे प्रदीर्घ काव्य लिहिले आहे. ते बंगाल क्रांतीचे स्फूर्ती गीत ठरले. त्याचे गावोगावी-घरोघरी गायन होऊ लागले. जनतेत अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा निर्माण झाली. "शिवाजी महाराज म्हणजे अखंड भारताला एकत्र बांधून ठेवणारे, लढण्याची प्रेरणा देणारे युगपुरुष!" अशी टागोरांची भूमिका होती.
टागोरांच्या गीताची प्रेरणा घेऊन गावोगावी शिवजयंती उत्सवाला सुरुवात झाली. स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाषचंद्र बोस, अरविंद घोष हे शिवप्रेमाने भारावून गेले. विवेकानंद नेहमी म्हणत "हतबल झालेल्या भारताला अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारा शिवाजी राजा अखंड भारताचा ज्वलंत स्फूर्तीदाता आहे." नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौजेला शिवचरित्राची प्रेरणा दिली. इंग्रजांच्या नजर कैदेत असणाऱ्या सुभाषबाबूंना शिवरायांच्या आग्रा सुटकेच्या प्रसंगातून निसटण्याची प्रेरणा मिळाली. सुभाषबाबू तारुण्यात जेव्हा पुण्याला आले होते, तेव्हा ते सवंगड्यासह सिंहगडावर गेले आणि सिंहगडाच्या पायऱ्यावर उभे राहून त्यांनी टागोरांचे "शिवाजी उत्सव" हे काव्य गायले. शिवाजी उत्सव हे काव्य त्यांचे मुखोदगत होते. महान तत्त्वज्ञानी अरविंद घोष यांनी शिवचरित्रावर काव्य लिहिले आहे. त्यांनी निराश झालेल्या भारतीयांना शिवरायांचा इतिहास काव्याच्या माध्यमातून सांगितला. बंगाली जनतेवर शिवरायांचा मोठा प्रभाव होता.
पंजाब हा नेहमीच अन्यायाविरुद्ध लढणारा प्रांत आहे. प्राचीन काळापासून पंजाब ही युद्धभूमी राहिलेली आहे. पंजाबी जनतेवर शिवरायांचा मोठा प्रभाव आहे. पंजाबचा सिंह लाला लजपत राय यांनी छत्रपती शिवाजी राजांचे चरित्र लिहिले आहे. त्याचा मोठा प्रभाव पंजाबी, उत्तर भारतीय जनतेवर आहे. आमच्या देशातही धैर्य आहे. शौर्य आहे आणि राजनीती आहे. हे दाखवून देण्यासाठी लाला लजपतराय यांनी शिवचरित्र लिहिले. ते राष्ट्रवादी आणि प्रागतिक विचारांचे होते. भगतसिंग हे बालपणापासून शिवप्रेमी होते. बेळगाव येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनासाठी आले असता ते आवर्जून रायगड पाहण्यासाठी गेले. त्यांनी गुरुनानक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून अन्याविरुद्ध लढण्याची प्रेरणा घेतली.
आसामच्या अहोम राजाचा पराभव करण्यासाठी औरंगजेबाने शाहिस्तेखान आणि जयसिंग पुत्र रामसिंगाला आसाम मोहिमेवर पाठवले, तेव्हा आसामी जनता मोगलाविरुद्ध निकराने लढली. शिवाजीराजांनी शाहिस्तेखानाला पुण्यातून पळवून लावलेले होते, ही घटना आसामी जनतेसाठी प्रेरणादायक होती. त्यांचा सेनापती लचित बोरफुकान मोगलाविरुद्ध निकराने लढला, त्याला आसामचा शिवाजी म्हटले जाते.
महान बंगाली लेखक जदुनाथ सरकार आणि सुरेंद्रनाथ सेन यांनी छत्रपती शिवाजीराजांचा अभ्यासू आणि प्रेरणादायी इतिहास लिहिला. त्याचा प्रभाव केवळ बंगालवरच नव्हे, तर संपूर्ण भारतावर आहे. शिवाजीराजे आग्र्यावरून पाटणामार्गे राजगडावर आले असे मानते. तेथे मोठे शिवस्मारक आहे
शिवाजीराजांचे इंग्रजी चरित्र जगभर जावे, यासाठी इंदूरच्या होळकर यांनी इतिहास अभ्यासक कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांना सर्वतोपरी मदत केली. बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी बडोद्यात शिवरायांचा पुतळा उभारला. शिवचरित्र लेखनासाठी व प्रचारासाठी सतत मदत केली. ग्वाल्हेरचे शिंदे आणि इंदोरचे होळकर यांनी पुण्यातील शिवस्मारकासाठी सढळ हाताने मदत केली.
हरियाणातील लोक आजही एकमेकांना भेटले की "छत्रपती की जय!" म्हणतात आणि बाळाचा जन्म झाला की त्याच्या कानात "छत्रपती की जय!" असे सांगतात. हरियाणात छत्रपतींच्या कार्याचे, शौर्याचे आणि विचारांचे बाळकडू पाजले जाते.
आज अमेरिका, युरोप, जपान सारख्या देशात छत्रपती शिवाजीराजांच्या युद्धनीतीचा अभ्यास केला जातो. रशियन प्रा. चेलीसेव यांनी रशियन भाषेत शिवचरित्र लिहिले आहे. अण्णा भाऊ साठे यांनी रशियामध्ये जाऊन शिवचरित्र सांगितले. क्युबाचे राष्ट्राध्यक्ष फिडल कॅस्ट्रो हे छत्रपती शिवाजी राजांच्या इतिहासाचे अभ्यासक होते. अनेक यूरोप राष्ट्रातदेखील छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास अभ्यासला जातो. मोगल इतिहासकार भीमसेन सक्सेना, ईश्र्वरदास नागर, खाफिखान यांनी छत्रपती शिवाजी राजांच्या पराक्रमाचे, नैतिकतेचे मुक्तकंठाने कौतुक केले आहे. पोर्तुगाल डेलनच्या शिवाजी राजांच्या शौर्याचे, पराक्रमाचे आणि नैतिकतेचे वर्णन करतो. ब्रिटिश इतिहासकार ग्रँड डफ, डेनिस किंकेड यांनी शिवचरित्र लिहिले. रशियाचे पंतप्रधान मार्शल बुल्गानिन म्हणतात "शिवाजीराजांनी साम्राज्यशाहीविरुद्ध लढा देवून सामान्य जनमानसाचे स्वराज्य निर्माण केले." जपानचे बॅरन कादा म्हणतात "शिवाजी महाराज हे सत्पुरुष होते."
वरील सर्व विवेचनावरून स्पष्ट होते की, शिवरायांचा प्रभाव केवळ महाराष्ट्रात नाही, तर तो महाराष्ट्रातबाहेरदेखील मोठ्या प्रमाणात आहे. हातबल, हताश, निराश झालेल्या जनतेला शिवाजीराजांचे शौर्य आणि कार्य सतत प्रेरणा देते. संकटाविरुद्ध लढण्याचे धैर्य शिवचरित्रातून मिळते. लोककल्याणकारी राज्यकर्ता कसा असावा, हे शिवचरित्रातून समजते. आपल्या विरोधकाच्या स्त्रियांचादेखील आदर सन्मान केला पाहिजे, याची प्रेरणा शिवचरित्र देते. मुहूर्त, भविष्य, पंचांग, यज्ञयाग न करता संकट समयी प्रयत्नवादी राहिले पाहिजे, याची प्रेरणा शिवचरित्र देते. आपण आपल्या राज्यात कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव करू नये, याची प्रेरणा शिवचरित्रातून मिळते. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका प्रांताचे, पंथाचे, देशाचे राजे नाहीत, तर ते जागतिक कीर्तीचे युगपुरुष आहेत,हे स्पष्ट होते.
डॉ.श्रीमंत कोकाटे