पुरस्कारवापसी, डॉ.शीतल आमटेंनी परत केला ‘दुर्गा पुरस्कार’

Update: 2020-08-06 02:13 GMT

‘दुभंगलेले आनंदवन’ या शीर्षकाखाली लोकसत्ता दैनिकाने बाबा आमटेंच्या आनंदवनात सारं काही आलबेल नाही अशी वृत्तमालिका चालवली. या वृत्तामध्ये बाबा आमटेंनी उभारलेले ते आनंदवन आता उरलेले नाही आणि तिथे लोकांना वाईट वागणूक दिली जात असल्याचे वृत्त दिले होते. पण हे सर्व दावे आनंदवनाचा कारभार पाहणाऱ्या डॉ. शीतल आमटे यांनी फेटाळून लावले आहेत. त्याचबरोबर लोकसत्ताने दोन वर्षांपूर्वी दिलेला दुर्गा पुरस्कार परत केला आहे. हा पुरस्कार परत करताना लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांना त्यांनी पत्र लिहिले आहे.

प्रिय गिरीशकाका (कुबेर),

प्रिय काका म्हणताना आता मला कसेसेच वाटते. कोणे एके काळी आपण अतिशय जवळ होतो. तुमचा माझ्यावर खूप विश्वास होता. आपण कितीतरी गप्पा करायचो. कितीतरी चांगल्या योजनाही बनवल्या. सर्वकार्येशुसर्वदाचे स्नेहमीलन आनंदवनला आपण घेणार होतो.

अचानक काय झाले कळले नाही. कोणीतरी तुमचे कान भरविले आणि तुम्ही विश्वास ठेवला. कान भरविणारा स्वतः किती विश्वासू आहे ते तुम्ही तपासले का? माझी सर्वोच्च दर्जाची मानहानी तुमच्याच वृत्तपत्राने केली, ते ही आनंदवनला येऊन, कुठलाही आकडा तपासून न बघता, त्याबद्दल आमच्या कुटुंबाला काय लाखो लोकांना खूप वाईट वाटले. यात लोकसत्तातले आणि एक्सप्रेस ग्रुपमधील मोठे पत्रकारही आहेत.

तुम्ही मला दिलेला दुर्गा पुरस्कार मी परत पाठवते आहे. दोन वर्षांपूर्वी, 2018 साली आनंदवनात मी अतिशय चांगले काम करते असे माझे भरभरून कौतुक करत 'लोकसत्ता'ने मला कार्याला सलाम म्हणून हा पुरस्कार दिला आणि नुकतीच माझे काम किती वाईट आहे यावर दोन भागांची मालिका पण केली. त्यामुळे एकतर पुरस्कार देताना आपली भूमिका चुकली आहे किंवा हे जे काय लेख म्हणा ते लिहिण्यामागची भूमिका चुकली आहे.

मला पूर्वी वाटायचे फक्त राजकीय नेतेच सोयीनुसार भूमिका बदलतात पण त्यात तुमच्यासारखे संपादकही असतील असे मला कधीच वाटले नव्हते. तेव्हा तुमची ही अडचण दूर करण्यासाठी मी तुम्हाला मदत करते. मी क्रूर आणि वाईट आहे याच निष्कर्षाला तुम्ही ठाम रहा आणि त्यासाठी मला तुम्ही दिलेला पुरस्कार मी परत करते आहे.

फक्त इथून पुढे अशा निवड करताना थोडी काळजी घ्या. मदर तेरेसा यांच्यावरील अग्रलेख तुम्ही दडपणापोटी मागे घेतला होता. हा विश्वविक्रम फक्त संपादक म्हणून तुमच्याच नावावर जमा आहे. तेव्हा तसाच दिलेला पुरस्कार ही परत घेऊन मागे घेण्याची तुमची परंपरा आपण पुढे चालवावी ही विनंती.

आनंदवनवर प्रेम करणारे लाखो लोक आणि येथे राहणाऱ्या आमच्या माणसांच्या आशीर्वाद हाच माझ्यासाठी पुरस्कार आहे...

सांगोपांगी ऐकीव माहितीवर लेख लिहून बदनामी करणाऱ्यांचा पुरस्कार मला नको आहे. त्यामुळे तो मी परत करीत आहे.

डॉ.शीतल विकास आमटे

आनंदवन

Similar News