सी समवन टू द डोअर (See someone to the door)
अलिकडे राजकारणामध्ये टोकाचा द्वेष, ध्रुवीकरण वाढलेलं असताना दोन पक्षाचे नेते आपल्या घरी आलेल्या राजकीय नेत्यांना सोडण्यासाठी दारांपर्यंत येतात. या कृतीतून नक्की काय दिसून येतं. वाचा राज कुलकर्णी यांचा लेख;
व्यक्तीव्यक्तीमधील स्नेहभाव टिकला पाहीजे वृद्धिंगत झाला पाहीजे. आज राजकीय क्षेत्रांत सर्वच पातळीवर अनेक अंगाने ध्रुवीकरण झाले असताना अशा कृती वा प्रसंग सदिच्छा निर्माण करणा-या असतात.
कांही दिवसांपुर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. ममता बँनर्जी तशा मूळ कॉग्रेसच्याच! त्या काही महिन्यापुर्वीच बंगालच्या मुख्यमंत्रीपदावर प्रचंड बहुमताने पुन्हा विराजमान झाल्या आहेत. सोनिया गांधी सध्या कॉग्रेसच्या अध्यक्षपदी आहेत. त्यांची भेट निव्वळ सदिच्छा भेट या अनुषंगाने नक्कीच नसणार, त्यात राजकीय चर्चा असणार पण तो या लेखाचा विषय नाही.
ममता बॅनर्जी भेट घेऊन जेंव्हा १० जनपथ निवासस्थानाच्या बाहेर पडल्या तेंव्हा त्यावेळी त्यांच्या सोबत राहुल गांधी आणि सोनिया गांधी दोघेही स्वत: दरवाज्या पर्यंत आले आणि ममता बॅनर्जी यांना निरोप दिला.
पाश्चात्य शिष्टाचारात या बाबीस खूप महत्व आहे. आलेल्या पाहुण्यांचा निरोप घेताना त्यांच्या सोबत दरवाज्यापर्यंत जाणे ही आलेल्या पाहुण्यांच्या स्वागता प्रमाणेच निरोप घेताना सन्मान करणारी कृती असते. राजकीय व्यक्तींनी राजकीय कारणास्तव घेतलेल्या भेटीतही हा शिष्टाचार पाळणे ही कृती कौंटुबिंक स्नेह आणि प्रेमाचेही प्रतिक असते.
इंग्रजी भाषेत यासाठी एक वाक्य प्रचार आहे. त्यास see someone out, to see him/her out किंवा see someone to the door असेही म्हणतात.
भारतीय परंपरेतही कौटुंबिक प्रसंगात ही कृती आवर्जून दिसते. आपल्याकडे लेकीबाळी माहेराहून आपआपल्या घरी निघाल्या की, त्यांना सोडायला अगदी बस स्टँडवर सोडायला आपण जातो. स्वागत नि निरोप या दोन्ही बाबी प्रेम वृद्धींगत करणा-या असतातच शिवाय त्या प्रेमाचं प्रतिक म्हणूनही पाहील्या जातात. हैद्राबादला माझे गुरू डॉ. नृसिंह गोविंद राजूरकर यांना मी आणि सत्यजीत जाधव भेटण्यासाठी गेलो होतो. त्यांना भेटलो अनेक विषयांवर चर्चा केली.
राजूरकर सरांच्या पीएचडीचा विषय नेहरूंचे विचार असा आहे. त्यासाठी नेहरूंना दोन वेऴा भेटण्याचा त्यांना योग आला होता. नेहरूंची दोन वेळा मुलाखत घेतल्यानंतर परतत असताना दोन्ही वेळा नेहरू त्यांचा निरोप घेण्यासाठी दरवाज्या पर्यंत आल्याचे त्यांनी सांगीतले आणि ते स्वत: देखील आम्हांस निरोप देण्यासाठी लिफ्टपर्यंत आमच्यासोबत आले. नेहरूवियन असणं म्हणजे काय याचा प्रत्ययच त्यांच्या कृतीतून मिळाला.
नेहरूंच्या बाबत घडलेला आणखी एक प्रसंग या शिष्टाचाराच्या अनुषंगाने सांगण्यासारखा आहे.
अमेरिकेच्या दौ-यावर असताना नेहरू यांनी इंदिरा गांधी यांच्यासह विश्वविख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईनची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. दोघेही आंतरराष्ट्रीय राजकीय व्यासपीठावर महत्वाचे स्थान असणारे होते. त्यांच्यातील चर्चा पुर्ण होऊन, नेहरूंना निरोप देण्यासाठी आईन्स्टाईन स्वत: दरवाज्यापर्यंत आले होते. न्यूयार्क टाईम्स या वृत्तपत्राने आवर्जून या प्रसंगाचे छायाचित्र छापले होते.
भेटीगाठी, संवाद वा चर्चा मग त्या सर्वसामान्य व्यक्तींच्या असो वा मोठ्या व्यक्तींच्या त्यात असा स्नेह हा आपुलकीचा, परस्पर आदर नि सन्मानाचं द्योतक असतो. मग भेटणा-या दोन्ही व्यक्ती राजकीय असो वा सांस्कृतिक वा क्रिडा क्षेत्रातील!
व्यक्तीव्यक्तीमधील स्नेहभाव टिकला पाहीजे वृद्धिंगत झाला पाहीजे. आज राजकीय क्षेत्रांत सर्वच पातळीवर अनेक अंगाने ध्रुवीकरण झाले असताना अशा कृती वा प्रसंग सदिच्छा निर्माण करणा-या असतात.
©️ राज कुलकर्णी (फेसबुक साभार)