अनुबंध सावित्रीबाई फुलेंचा
21व्या शतकाचे नागरिक म्हणून मलाही ज्या मी चुकीच्या धारणा पाळल्या आहेत, त्या unlearn करता आल्या पाहिजेत, जे नवीन आणि बरोबर माझ्यासमोर आले आहे, ते learn करता आले पाहिजे मी मोकळ्या मनाने(ओपन माइंडेड) राहून त्यात सतत दुरुस्त्या जर येत असतील तर त्या मला relearn करता येऊन , माझ्या आयुष्याला आकार देता यावा हीच खरी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन ठरेल असे अश्विनी गावंडे यांनी म्हटले आहे..
दि 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी केली जाते . खरंतर आपल्याकडे जयंती पुण्यतिथी साजरी करण्याची एक विशिष्ट पद्धत बनून गेली आहे. आपण ज्या महनीय व्यक्तींची जयंती किंवा पुण्यतिथी साजरी करतो, तेव्हा त्यांनी केलेल्या कार्याची माहिती एकमेकांना देतो. अर्थात इतिहासातील घटनांची माहिती एकमेकांना देतो त्यांनी किती महान कार्य केले. ते केले आहेच. त्याची उजळणी करतो .(वारंवार उल्लेख करणे,आठवण करून देणे गरजेचे आहे.तरिही )आणि कार्यक्रम संपतो.
परंतु मी त्यांच्यापासून काय शिकले पाहिजे? काय आत्मसात केले पाहिजे? जेणेकरून ह्या महान व्यक्तींनी संपूर्ण समाज जीवनाच सोनं केलंय. तर आता त्यांच्याकडून कशा प्रकारची प्रेरणा घेऊन माझ्या आयुष्याचं मी सोनं करावं?
याविषयीचे निरीक्षण मला करता यावं ,शिकता यावं कारण ,आता *करण्यालायक तीच एक गोष्ट बाकी आहे. असे माझ्या अल्पमतीला वारंवार वाटते. खरंतर सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचं स्मरण माझ्यामते वेगवेगळे होऊच शकत नाही.हे दोघे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. असेही मी म्हणणार नाही कारण नाण्याची जी कोणती बाजू आपण वर ठेवू त्या बाजूने या दोघांची प्रतिमा माझ्यासमोर येते. कारण हा तेजोमय अनुबंधच असा आहे.
अनुबंध म्हणजे काय? अनुबंध म्हणजे संबंध आणि संबंध म्हणजे ज्याची व्याख्या ए.नागराज यांनी आपल्या 'मध्यस्थ दर्शन 'अर्थात 'जीवनविद्ये'मध्ये करून ठेवली आहे. तर संबंध म्हणजे म्हणजे "पूर्णता के अर्थ मे अनुबंध ही संबंध है। नातं कोणतेही असो एक दुसऱ्याची अपूर्णता पूर्ण करत करत अर्थात एक दुसऱ्याला समृद्ध परिपूर्ण ,परिपक्व करत करत गंतव्य स्थानापर्यंत पोहोचणे म्हणजे संबंध.
म्हणून तर कळत नाही की शिक्षित करून महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंच्या पंखात बळ भरलं ,की आता मी ही तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकते असा भक्कम विश्वास सावित्रीबाईंनी फुल्यांना दिला असा संभ्रम पाहणाऱ्याच्या मनी निर्माण व्हावा असे हे दांपत्य जीवन होते.
या दोघांपैकी कोणामुळे कोणाच्या जीवनाचे सोने झाले हा प्रश्न आपण स्पष्ट करू शकत नाही मात्र इतरांसाठी झटतांना स्वतःच्या आयुष्याची माती करून घेतली म्हणूनच आपल्यासारख्या कित्येक जीवनाचे ते सोने करू शकले एवढे मात्र नक्की. त्याकाळानुसार अतिशय लहान वयात दांपत्य जीवन सुरू केलेल्या या महानुभावांनी अपेक्षित वैवाहिक जीवन समाजासमोर प्रस्तुत केले.
21 व्या शतकातील सामान्य धारणेनुसार असे म्हटले जाते की तत्वज्ञान म्हणजे जे जगता येत नाही फक्त लिहिता येतं किंवा पुस्तकात शोभून दिसत हीच समान धारणा असणाऱ्या आधुनिक जीवनशैलीचे आपण वारकरी. परंतु जीवनात तत्वच नसेल तर तथ्य कसे प्रकट होईल हाच तर लाख मोलाचा प्रश्न आहे.
प्रत्यक्ष तत्व समजावून घेऊन तथ्यपूर्ण जीवन कसे जगावे?याचे दर्शन सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या दांपत्य जीवनातून दिसून येते. खरं म्हणजे विवाह हा एक संस्कार. हे रक्त संबंध नसतातच तरीही एकत्र राहून जगण्यात एवढी एकरूपता येते की ,एक प्राण दोन शरीर याचा प्रत्यय येतो. किंवा अशीच विवाहाची व्याख्या आहे किंवा यात्रा आहे. असे आपण म्हणू शकू.तर विवाह म्हणजे काय?
विवाह म्हणजे विवेक पूर्ण किया गया वहन। (बाबा नागराज) कशासाठी ?- तर पूर्णतः प्राप्त करण्यासाठी आणि पूर्णतः प्रस्तुत करण्यासाठी. ही प्रक्रिया घडून येते ती म्हणजे म्हणजे दोघांची एकरूप समज, परस्पर पूरक विचार, प्रत्येक कामामध्ये समान वाटा आणि आणि प्रत्येक कामाच्या मिळणाऱ्या फळ परिणामांची समान जबाबदारी या मार्गाने.
खरोखरच ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी स्वतःची पूर्णता मिळवत ती पूर्णतः प्रस्तुत केली ती त्यांच्या कार्याच्या रूपाने. या माध्यमातून संपूर्ण समाजाचा त्यांनी परिवार केला आणि परिवाराचा समाज.
त्या दोघांची काम करण्याची हातोटी आणि संघटन कौशल्य वादातीत होते. असे म्हटले जाते की असे म्हटले जाते की "खरा नेता तोच जो त्याच्यासारखे इतर नेते निर्माण करतो. या दोघांच्या सहवासातून आणि प्रेरणेतून निर्माण झालेली फातिमा शेख. जिने मुस्लिम समाजात क्रांती घडवून आणली. त्यांचे अनेक कार्यकर्ते नेते झाले. या कामी जसा त्यांना तळागाळातून विरोध झाला तसाच काहींनी जीव तोड प्रतिसादही दिला. आणि खरं म्हणजे अशाच लोकांच्या आधारावर समाजाचे अस्तित्व चिरकाल टिकून राहते . तो प्रतिसाद एवढा ताकदवान होता की या दोघांच्या अमिट कार्याची छाप समाजाचे विधीलिखित बदलवून गेला. मनुष्य जीवनात असे एकही क्षेत्र राहिले नाही की जिथे सुधारणेची गरज आहे आणि ते त्यांच्या नजरेतून सुटले.
त्याकाळी शिक्षण आणि तेही महिलांसाठी सुरू करणे ही एक क्रांतिकारक बाब होती. समाज वहिवाटीच्या विरुद्ध जाऊन एखादी गोष्ट तन्मयतेने करणे लोकांच्या केवळ शाब्दिक शिव्या शाप न खाता प्रत्यक्ष घाण अंगावर झेलणे .कर्मकठीण.
सावित्रीबाई शाळा चालवत असताना त्यांच्या शाळेतील थत्ते गुरुजीनी , सावित्रीबाईं ची काशीबाईशी भेट घडवून आणली. जी स्त्री विधवा होती आणि आता गर्भवती होती. कुटुंबातील पुरुष मंडळींशी बोलल्यानंतर सावित्रीबाई जेव्हा काशीबाईंना विचारायला गेल्या या सगळ्या बाबतीत तुमचं मत काय? मी यापुढे जी काही मदत करणार आहे. ती तुमच्यासाठी करणार आहे. समाजासाठी किंवा तुमच्या घराच्या मानमरातबासाठी करणार नाही.
त्यावेळी काशीबाईंना माझ्याही मताला किंमत आहे, माणूस म्हणून कोणीतरी मला विचारते आहे हे सत्य वाटलेच नसेल, कारण तोपर्यंत एक व्यक्ती म्हणून स्त्रीला ही काही भावना असतात किंवा तिला काही मते असतात असे अनुभवच नसतील. किंबहुना सर्व स्त्रियांची कमी अधिक प्रमाणात अशीच स्थिती असेल.
काशीबाईच्या या प्रसंगातूनच ज्योतिबांना बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू करावे आणि विधवांना आसरा द्यावा असे सुचले त्यात सावित्रीबाईंचा सिंहाचा वाटा होता. पुढे काशीबाईचा मुलगा यशवंत याला ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी दत्तक घेतलं. आणि तोच यशवंत पुढे डॉक्टर झाला व प्लेगच्या रुग्णांची सेवा करण्यासाठी त्याने पुण्याबाहेर स्वतंत्र दवाखाना सुरू केला.
ह्याच काशीबाईंच्या केशवपनासाठी जेव्हा न्हावी फुल्यांच्या घरी आला तेव्हा ज्योतिबांनी त्यांना ठणकवून सांगितले की अशी घाणेरडी रूढी आणि प्रथा परंपरा पाळणाऱ्या समाजातील पुरुषांना तुम्ही का सांगत नाही? की ही प्रथा जोपर्यंत तुम्ही बंद करत नाही तोपर्यंत आम्ही तुमचेही केशकर्तन करणार नाही. तळागाळात काम करणाऱ्या लोकांशी या दांपत्याचा प्रत्यक्ष संवाद होता जो मुळापासून धारणा बदलण्यास सहाय्यकारी झाला.
शिक्षण,विधवाविवाह , केशवपन ,बालहत्या प्रतिबंधक गृह ,शेतीविषयक कामकाज, कामगारकल्याण सत्यशोधक समाज, आरोग्य अंधश्रद्धा निर्मूलन इत्यादी इत्यादी. हा केवळ वरचा बदल नव्हताच त्याच्या मागे होते ते सखोल चिंतन आणि कायमचा उपाय शोधण्याची तळमळ. प्रत्येक सुधारणा आणि प्रत्येक चळवळ उभारण्याच्या आधी या दोघांनी हजार वेळा आतला प्रवास केला असणार,त्याचे चिंतन केलं असणार तेव्हाच ते समाज मनाच्या धारणा बदलवू शकले.
"मलाही माणूस म्हणून जगण्याचा हक्क आहे यासाठी जे जे गरजेचे आहे ते ते मी करेल. ही भावना ते लोकांमध्ये निर्माण करू शकले. साधारणतः स्त्री विषयी असे म्हटले जाते.अगदी आज एकविसाव्या शतकात सुद्धा कि "नारी कभी हारती नही, उसे हराया जाता है। लोग क्या कहेंगे यह कहकर ,डराया जाता है।"
तर सावित्रीबाईंच्या काळात ही परिस्थिती आणखीच बिकट होती .परंतु आश्चर्याची बाब म्हणजे या विचारसरणीच्या अधीन सावित्रीबाई कधी गेल्याच नाहीत.कारण त्या स्त्री असण्याच्या आधी एक माणूस होत्या आणि त्यांचा खरा धर्म माणूस धर्म होता. माणूस धर्म म्हणजे अपार करुणा आणि करूणेच क्रियापद म्हणजे परोपकार त्यातून मिळणारे फळ म्हणजे समाधान.
अशा माणूस धर्माचे हे दोघेही वारकरी असल्याने त्यांच्या कर्तुत्वाचे आभामंडळ एवढे मोठे झाले की त्यांनी त्यांच्या कार्याच्या माध्यमातून मानवी जीवन "नित्य उत्सव" करून टाकला.
ह्या दोघांनी ते जगत असतानाच्या काळालाच जिंकले नाही तर पुढच्या काळालाही कलाटणी दिली. त्यामुळेच ते कालातीत झाले. असे म्हटले जाते की समाजाचे नेतृत्व करणारा जर का पुरुष नेता असेल तर तो संपूर्ण समाजाला जिथे पाहिजे तिथे पोहोचवून देतो आणि समाजाचे नेतृत्व करणारी जर का स्त्रीनेता असेल तर समाजाला जिथे पाहिजे तिथे नाही पोहोचवत, तर जिथे पोहोचणे गरजेचे आहे तिथे पोहोचवते. या
दोन्ही गोष्टींचा मिलाफ ह्या अनुबंधातून घडून आला. अर्थात समाज जिथे असणे गरजेचे आहे. आणि समाज जिथे पोहोचणे गरजेचे होते. तिथे तो त्यांनी आपल्या कार्याने नेऊन ठेवला.
गदिमांच्या शब्दात या दांपत्य जीवनाचे वर्णन करायचे झाल्यास असे म्हणता येईल की सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले समाज घडविण्याच्या अर्थाने समाजाचे कुंभार होते. कुंभारासारखा गुरु नाही रे जगात वरी घाली धपाटा आत आधाराचा हात. म्हणून महात्मा फुले किंवा सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण तारखेनुसार वेगवेगळ्या जरी साजरा करत असलो तरी त्यांनी घडवलेला समाज हा त्यांच्या अनुबंधाचा परिपाक आहे.
अश्विनी गावंडे