पीठमांगे, भिकारडे आणि फुकटे.. आरक्षणाची कठीण वाट आणि आपण - रवींद्र आंबेकर
एखाद्या समाजातील रडत-खडत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिकणाऱ्या, नोकरी करणाऱ्या तरूणाला संपूर्ण आयुष्यभर फुकट्या, पीठमांग्या म्हणायचं आणि त्या तरूण-तरूणीचा लढण्याचा आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न करायचा हे योग्य नाही. तुम्ही या सिच्युएशन मध्ये स्वतःला टाकून बघा. तुम्हाला रोजगार नाही-शिक्षण नाही आणि संपूर्ण जग तुम्हाला चिडवतंय. हा मानसिक खच्चीकरणाचा संघटीत प्रकार आहे. यामुळे अनेकांना संपूर्ण आयुष्य वैफल्य-नैराश्य येऊ शकतं किंवा तुम्हाला जशास तसे उत्तर देण्याची वृत्ती ही जन्माला येऊ शकते.;
जातवास्तवाची चर्चा करणारी पोस्ट, लेख टाकला की, अनेक कमेंटस येतात. त्यातील काही कमेंटस अतिशय खालच्या दर्जाच्या असतात. सहसा दुर्लक्ष कराव्यात अशा, पण मला त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. बहुतांश वेळा या पोस्ट बहुजन समाजातील तरुण-तरूणींकडूनच होत असतात. या पोस्ट मध्ये जातीची एक टोकाची अस्मिता दिसते. स्वजातीचा अभिमान आणि दुसऱ्यांची हेटाळणी असा भाव असतो. जातीचा चश्मा लावला असल्याने अशा लोकांच्या कमेंटना उत्तर दिलं काय आणि नाही दिलं काय, ते त्यांच्या लॉजीक ने अर्थ काढत असतात आणि अशा कमेंटना लाइक्स ही प्रचंड मिळतात. यावरून कमेंट करणारे हे एकटेदुकटे नसून अशीच भावना बाळगणारे अनेक लोकं समाजात वावरत असल्याचे दिसते.
जातवास्तवावर लिहिणे आणि जातीयवादी लिहिणे यातील सूक्ष्म भेद कुणाला समजवून सांगण्याची परिस्थिती नसते. तरी सुद्धा मला यावर लिहावेसे वाटते. डिकास्ट होणं किंवा जातविरहीत होणं ही थोडक्यात निर्वाणवस्था अवस्था आहे. जात आणि धर्म या फेऱ्यातून बाहेर पडणे कठीण म्हणून अनेक समाजसुधारकांनी धर्मपरिवर्तन किंवा नवीन पंथ स्थापन करून समाजसुधारणा केली. जात सोडणे किंवा धर्म सोडणे या अवस्थेपर्यंत माणूस येईल असे मला वाटत नाही. मी जात मानत नाही म्हणणारे ही अंततः मी या जातीत जन्माला आलो पण जात मानली नाही या वाक्यापर्यंत सहज प्रवास करून जातात. या वर्गवारीमध्ये मी मला कुठे बघतो असं विचारालं तर मी निर्वाणवस्थेच्या अगदी जवळ आहे असंच सांगता येईल.
असो, तर मुद्दा जातीवरच्या कमेंटस् चा आहे. माझ्या वॉलवर अनेकदा मी भिकमांगे, पीठमांगे, फुकटे, आरक्षणामुळे मोठे झालेले अशा कमेंटस येत असतात. आरक्षणाच्या लाभार्थींचा राग-तिटकारा-दुस्वास करण्यामागे ते लाभार्थी असणे हा निकष आहे की, त्यांची जात हा पुन्हा वादाचा मुद्दा आहे. सध्या आपण वादासाठी संधी चा मुद्दा घेऊ. जर आरक्षणामुळे गुणवत्ता असूनही संधी नाकारली जाते. असा कुणाचा समज असेल तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, गुणवत्ता असलेल्यांना खुल्या प्रवर्गातील ५० टक्के जागा आहेतच. त्यातही मॅनेजमेंट कोटा सारख्या गोष्टी ही आहेत. कुणाला तरी जास्त संधी हा मुद्दा सामाजिक न्यायाच्या रस्त्यातील सर्वांत मोठा अडसर आहे. सर्वांना समान संधी हा सामाजिक न्याय आहे. ज्या समाजांमध्ये कोणीच शिकलेले नाही, कमावतं नाही त्यांची गुणवत्ता आणि ज्यांच्याकडे गुणवत्ता वाढीसाठी पोषक वातावरण आहे. त्यांची गुणवत्ता याच नेहमीच फरक राहणार आहे. मात्र, अलिकडच्या काळात गुणवत्तेचा हा भेद-बचाव आणि प्रचार ही खोटा असल्याचं सिद्ध झाले आहे. अनेक ठिकाणी आरक्षित जागांसाठीच्या कटऑफ या खुल्या प्रवर्गाच्या बरोबरीने असल्याचं दिसून येत आहे.
आणखी एक महत्वाचा मुद्दा, जो खरं तर माझ्या लेखाचा खरा मुद्दा आहे. आपण करत असलेल्या कमेंटस किंवा मतप्रदर्शन आपण इतक्या उघडपणे समाजमाध्यमांवर ही करत असतो. खरं तर या वर्णभेद आणि वंशभेद दर्शविणाऱ्या प्रतिक्रीया आहेत. एखाद्या समाजातील रडत-खडत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिकणाऱ्या, नोकरी करणाऱ्या तरूणाला संपूर्ण आयुष्यभर फुकट्या, पीठमांग्या म्हणायचं आणि त्या तरूण-तरूणीचा लढण्याचा आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न करायचा हे योग्य नाही. तुम्ही या सिच्युएशन मध्ये स्वतःला टाकून बघा. तुम्हाला रोजगार नाही-शिक्षण नाही आणि संपूर्ण जग तुम्हाला चिडवतंय. हा मानसिक खच्चीकरणाचा संघटीत प्रकार आहे.
यामुळे अनेकांना संपूर्ण आयुष्य वैफल्य-नैराश्य येऊ शकतं किंवा तुम्हाला जशास तसे उत्तर देण्याची वृत्ती ही जन्माला येऊ शकते. तुम्ही एखाद्याला चिडवल्यानंतर एकदा त्या व्यक्तीच्या अंगाने या सगळ्या गोष्टींचा विचार करून बघा. माणूस म्हणून आपण जर एखाद्याचा २४ तास तिरस्कार करत असू तर याने आपल्या मनावर, शरीरावर, समाजावर ही विपरीत परिणाम होणार आहे, इतकं लक्षात घ्या. आज आरक्षणाच्या माध्यमातून शिकून नोकरी लागलेले समाजात सुस्थितीत आहेत. उलट ज्यांनी चांगली परिस्थिती-संसाधने असूनही शिक्षणाची कास सोडली त्यांची अवस्था बिकट झालेली आपण पाहिलेली आहे. शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे, ते सोडून आपण तिरस्काराच्या भट्टीत स्वतःला झोकून देऊ नका. आपल्या जातीचा-घराण्याचा ज्वाज्वल्य इतिहासाचे दाखले देऊन आपल्या वर्तमानाचा बळी देऊ नका.
आरक्षण हा गरीबी हटवण्याचा कार्यक्रम नाहीय. तो सामाजिक न्यायाचा कार्यक्रम आहे. जे जे वंचित-शोषित घटक आहेत त्यांना जगण्याची उभारी देण्याचा हा कार्यक्रम आहे. वर्षानुवर्षे ज्ञान आणि मनगटाच्या जोरावर स्वतःचा वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्यांनी सामाजिक न्यायाची संकल्पना अंगिकारली नाही. त्यामुळे विषमता वाढली. छत्रपती शिवाजी महाराजांपासून शाहू महाराजांपर्यंत अनेक राजांनी आपल्या रयतेला समान अधिकार देण्याचं धोरण अंगिकारलं. या धोरणाला विरोध असणारे छत्रपतींचे वारसदार असू शकत नाहीत.
शाहू महाराजांनी आरक्षण लागू केलं त्यावेळी त्यांची भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वदूर पोहोचोवली. छत्रपतींचा विचार संपूर्ण देशात लागू झाला, त्याला कुठल्या कपाळकरंट्यांचा विरोध आहे मला हेच समजत नाही.
आज महाराष्ट्रात मराठा, धनगर तसंच इतर अनेक समाज आरक्षणासाठी लढाई लढतायत. त्या त्या समाजातील काही पोट भरलेले पुढारीच या लढ्यांना विरोध करतायत. मराठा समाजात तर अनेक पुढारी स्वतःला मागास समजत नाहीत. मात्र, या समाजांची सध्याची परिस्थिती पाहता त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. अशी भूमिका संपूर्ण महाराष्ट्राने घेतली. ही भूमिका सामाजिक न्यायाची आहे. आरक्षणाच्या प्रवाहात सामील झाल्यानंतर कदाचित या सगळ्या समाजांनाही पीठमांगे-फुकटे अशा टोमण्यांचा सामाना करायला लागू नये म्हणून आजच आपण तयारी केली पाहिजे. कुणाचाही आत्मविश्वास तोडण्याचा अधिकार कुणालाही नाही. सामाजिक न्याय म्हणजे भीक नाही, तो अधिकार आहे. समानतेचा अधिकार हा घटनादत्त अधिकार आहे.
महाराष्ट्रातील सोशल मिडीयावरील तसंच गावखेड्यातील-शहरांतील सर्व जातीभिमानी लोकांना माझं इतकंच सांगणं आहे, तुमची जात सुटणार नाहीय, मात्र, जातीय मानसिकता सोडा. कट्टरता ही विनाशाकडे नेते. काय निवडायचं याचा फैसला आज करावा लागणार आहे, उद्या कदाचित उशीर झालेला असेल.