sardar patel : सरदार पटेल आणि भारतीय मुस्लिम
सरदार पटेल हे मुस्लिमविरोधी होते का? सरदार पटेल यांची मुस्लिमांबाबत काय होती भूमिका? हिंदू आणि मुस्लिम दंगलीमध्ये सरदार पटेल यांनी नेमकी कुणाची बाजू घेतली होती? सरदार पटेल यांनी RSS वरील बंदी का उठवली? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी मॅक्स महाराष्ट्रचा हा ब्लॉग नक्की वाचा...
सरदार वल्लभभाई पटेल हे आजच्या घडीला भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले व्यक्तिमत्त्व आहे. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचे पट्टशिष्य म्हणवून घेणारे आणि पंडित जवाहरलाल नेहरू (Javaharlal Neharu) यांच्या नेतृत्वाखाली निष्ठापूर्वक काम करणा-या पटेलांना बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये गांधीजी आणि नेहरूंचे विरोधक म्हणून उभे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचवेळी काँग्रेसने पटेलांवर अन्याय केल्याचेही सांगितले जात आहे.
गांधीजींच्या खुनामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) सहभागी असल्याचा आरोप झाल्यानंतर संघावर बंदी घालणा-या पटेलांना संघविचारांच्या बाजूने आणि काँग्रेसच्या विरोधात उभे करण्यासाठी युक्तिवाद केले जात आहेत. सरदार पटेल (Sardar Vallabhbhai Patel) हे मुस्लिमविरोधी असल्याच्या तत्कालीन गैरसमजांचा आधार घेऊन आपले युक्तिवाद बळकट करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. इतिहासाची अशी राजकीयदृष्ट्या सोयीस्कर मांडणी केली जात असताना सरदार पटेल यांच्या भूमिकेचे वस्तुस्थितीनिदर्शक चित्र समोर आणण्याचे काम रफिक झकेरिया यांच्या 'सरदार पटेल आणि भारतीय मुसलमान' हे पुस्तक करते. भारतीय विद्या भवनच्या या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद ज्येष्ठ पत्रकार एकनाथ बागूल यांनी केला असून तो श्रीविद्या प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.
आकाशवाणीने आयोजित केलेल्या सरदार पटेल व्याख्यानमालेत झकेरिया यांनी दिलेल्या दोन व्याख्यानांमध्ये भर घालून हे पुस्तक साकारले आहे. फाळणीपूर्वी आणि नंतरच्या सरदार पटेल यांच्या मुस्लिमांशी असलेल्या संबंधांचे विश्लेषण झकेरिया यांनी यामध्ये केले आहे. सर्व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे झकेरिया यांनी सरदार पटेलांच्या मुस्लिमविषयक मतांचा शोध घेतला आहे.
पाकिस्तानने स्वतःला मुस्लिम राष्ट्र घोषित केल्यामुळे भारतानेसुद्धा हिंदू राष्ट्र म्हणून घोषणा करावी, यासंदर्भात पटेलांवर सतत दडपण येत होते. त्या मागणीचे एक जोरदार समर्थक बी. एम. बिर्ला यांना पटेलांनी सांगितले, 'भारताचे रुपांतर हिंदू धर्म धारण करणा-या हिंदू राष्ट्रात करणे संभवनीय नाही. देशात इतरही अल्पसंख्याक आहेत आणि त्यांचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे, याचा आपण विसर पडू देता कामा नये.' पटेलांना हिंदुत्ववादी राजकारणाचे आयकॉन म्हणून उभे करणा-यांसाठी त्यांची ही भूमिका म्हणजे मोठी चपराक आहे.
मुस्लिमद्वेषाचे राजकारण करणा-यांसाठी पटेलांचे हे वक्तव्य विशेष उल्लेखनीय ठरू शकेल, 'हिंदू आण मुस्लिम या दोन जमातींना एकमेकांच्या जवळ आणणारा दुवा बनण्यासाठी मी झगडत आहे, जरुर तर या प्रयत्नात माझे रक्त सांडण्याचीही माझी तयारी आहे. तथापि त्या आधी मुसलमानांना मला सिद्ध करुन द्यावयाचे आहे की, त्यांच्यावर मी जेवढे प्रेम करतो तेवढेच प्रेम मी हिंदूंवरही करतो.'
झकेरिया यांनी म्हटले आहे की, हिंदू-मुसलमान संबंधांच्या प्रश्नावर गांधी, नेहरू आणि पटेलांच्या दृष्टीकोनात फरक होता. दोघांमध्ये ऐक्य प्रस्थापित होणे हे गांधींच्या मते जास्त महत्त्वाचे होते. नेहरूंनाही तसेच वाटे. पटेलांचे मत असे होते की जोपर्यंत देशावर ब्रिटिशांची सत्ता आहे, तोपर्यंत हिंदू-मुसलमान ऐक्य शक्य नाही.जातीय सलोखा ही त्यांच्यादृष्टीने दुय्यम बाब होती. याचा अर्थ त्यांचा विरोध होता असे नव्हे. खरेतर जातीय सलोख्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्नही केले आहेत. सरदार पटेलांना मुस्लिमांबद्दल आकस होता, असा अपप्रचार त्यावेळीही केला जायचा आणि आजही केला जातो. परंतु रफीक झकेरिया यांनी सप्रमाण हा अपप्रचार खोडून काढला आहे.
काँग्रेससाठी लोकांचे पाठबळ मिळवताना सरदार पटेल यांनी लोकांच्या धार्मिक भावना किंवा रुढींना कुरवाळण्याचा मार्ग चोखाळला नाही. बालविवाहाच्या प्रथेसंदर्भात हिंदूंना धारेवर धरताना ते म्हणाले, अशा ढोंगी विवाहांना जबाबदार असलेल्या आई-वडिलांनाच नव्हे, तर लग्न लावणा-या भटजींनाही गोळ्या घालून ठार करण्यात यावे, असा कायदा मी करणार आहे. त्याचवेळी मुस्लिमांच्या पडदा पद्धतीबद्दल ते विचारत, 'तुम्ही तुमच्या आया-बहिणींना पडद्यात झाकून ठेवता, त्याबद्दल तुम्हाला लाज कशी वाटत नाही ?'
सरदार पटेल एकदा तुरुंगात अडकले असताना अहमदाबादमध्ये हिंदू-मुसलमान दंगा झाला. सरदारांना व्यक्तिशः या घटनेचा मोठा धक्का बसला. सुटका झाल्यानंतर अहमदाबादेतील तुरुंगाबाहेर जमलेल्या हजारो कामगारांपुढे भाषण करताना पटेल यांनी दंगलीमुळे आपल्याला झालेल्या जखमा खोल असल्याचे सांगितले. ते म्हणाले, 'तुम्ही हिंदू असा नाहीतर मुसलमान. ताठ उभे राहा आणि तुमच्या शत्रूशी सामना करा. मात्र अहिंसेच्या नावाखाली भित्रेपणा दाखवू नका.'
दक्षिण दिल्लीतील अवलिया निझामुद्दीन दर्गा काही उपद्रवी लोकांनी ताब्यात घेतल्याचे एके रात्री कळाल्यावर सरदार पटेल लगेच खांद्यावर शाल टाकून बाहेर पडले आणि तेथे पोहोचले. काही वेळ तिथे थांबून परिस्थितीची पाहणी केली आणि 'पुन्हा येथे काही घडले तर नोकरीला मुकावे लागेल,' असा दम तेथील अधिकारी व पोलिसांना देऊन परत फिरले. फाळणीला जबाबदार असलेल्या मुसलमानांचा ते जोरदार समाचार घेत, परंतु मुसलमानांना अकारण त्रास देणा-या हिंदूंनाही ते दया दाखवत नसत.
सरदार पटेल यांनी तत्कालीन परिस्थितीत केलेल्या काही वक्तव्यांमुळे त्यांना मुस्लिम द्वेष्टे ठरवण्याचा प्रयत्न सुरू होता. दरम्यानच्या काळात नेहरू आणि पटेल यांच्यातील मतभेद वाढत चालले होते, ते कमी करण्याचा प्रयत्न गांधीजी करीत होते, त्याच सुमारास गांधीजींचा खून झाला. देशावर ओढवलेल्या मोठ्या संकटाला तोंड देण्यासाठी नेहरू-पटेल या दोन्ही नेत्यांना पुन्हा निकट आणले. त्यानंतर सरदार पटेल नेहरूंच्या प्रत्येक मताशी सहमत होऊ लागले. नेहरू हे नेते आहेत, आपण त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले पाहिजे, हे त्यांनी ठरवले. गांधीजींच्या खुनाच्या घटनेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप असल्यामुळे संघावर बंदी घालण्याचा प्रस्ताव आला तेव्हा पटेलांनी त्याला पाठिंबा दिला. पुढे मग गोळवलकर गुरूजी यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर बंदी उठवण्यात आली.
कोणत्याही अल्पसंख्यांकाच्या भावना अवास्तव नसतील तर त्या दुखवता कामा नयेत. यादृष्टीने आपण जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे. तसेच असमाधानी अल्पसंख्यांक म्हणजे ओझे आणि धोका आहे, हेदेखील आपण विसरता कामा नये, असे पटेलांचे मत होते. अल्पसंख्यांकांना सध्या ज्या पद्धतीने वागवले जाते त्या पद्धतीने आपल्याला वागवले तर आपल्याला काय वाटेल याचा विचार करून, अल्पसंख्यांकांच्या भावना आपण जाणून घेतल्या पाहिजेत, असे ते तळमळीने मांडत असत. १९४९ मध्ये त्यांनी जाहीरपणे सांगितले की, हिंदू राष्ट्र ही वेडगळकल्पना आहे. ज्या देशाच्या उभारणीसाठी आपण परिश्रम घेतले, कष्ट केले ते या कल्पनेला कधीच पाठिंबा देणार नाहीत. तसे काही घडले तर भारताचा आत्माच खतम होईल.
जयप्रकाश नारायण यांनीदेखील सरदार पटेलांवर जातीयतेचा आरोप केला होता. परंतु त्यांनाही आपल्या मताचा फेरविचार करावा लागला. वीस वर्षांनी त्यांनी हे मत बदलले. त्यांच्याबदद्ल आपण केलेले मूल्यमापन चूक होते, हे जयप्रकाश यांनी मान्य केले.
सरदार पटेल यांची हिंदू-मुस्लिम संबंधांबद्दलची भूमिका समजून घ्यायची असेल तर हे पुस्तक आवर्जून वाचायला हवे. विशेषतः आजच्या काळात या पुस्तकाचे मोल खूप मोठे आहे.