राजदीप सरदेसाईंचं प्रायश्चित्त काय?

‘देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे’, अशी विंदाची कविता आहे. विंदांच्या कवितेचा मूळ अर्थ सोडला आणि सध्याच्या परिप्रेक्ष्यात पाहिलं तर राजदीप सरदेसाई तसंच अनेक लिबरल पत्रकार, सामाजिक - राजकीय कार्यकर्त्यांनी घेता घेता ट्रोल संस्कृतीचे हातच घेऊन टाकले.;

Update: 2021-01-30 16:09 GMT

या आठवड्यात राजदीप सरदेसाईंच्या निमित्ताने पत्रकारितेवर खूप चर्चा झाली. इतकी चर्चा २ हजारांच्या नोटेमधल्या चीप बाबत, किंवा आमने-सामने आ असं बाह्या सरसावून आव्हान देणाऱ्या अँकर बाबत, किंवा प्राइम टाइम मध्ये अजेंडा म्हणून विषारी माहिती पेरणाऱ्या संपादकांबाबत झाली नाही. पण, राजदीप च्या निमित्ताने या शुद्धीकरणाची चर्चा सुरू होईल. या चर्चेतून हाताला काही लागणार नाही, पण चर्चेतून समोर आलेल्या मुद्द्यांची यादी तयार झाल्यानंतर बोलणाऱ्यांना आपल्या आतमध्येही पाहण्याची गरज निर्माण होईल.

'देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे', अशी विंदाची कविता आहे. विंदांच्या कवितेचा मूळ अर्थ सोडला आणि सध्याच्या परिप्रेक्ष्यात पाहिलं तर राजदीप सरदेसाई तसंच अनेक लिबरल पत्रकार, सामाजिक - राजकीय कार्यकर्त्यांनी घेता घेता ट्रोल संस्कृतीचे हातच घेऊन टाकले. मला व्यक्तिशः ही बाब गंभीर बाटते. मी राजदीप सरदेसाई यांच्या सोबत काम केलं आहे. पडताळणी केल्याशिवाय बातम्या देऊ नका, बातम्या देताना घाबरू नका असं ते नेहमी सांगायचे.

मला आठवतेय 26/11 हल्ल्यावरील प्रधान कमिटीचा रिपोर्ट सरकारने गोपनीय घोषित करून टाकला होता. आमचे एक वरिष्ठ संपादक आणि माझ्या ताब्यात हा रिपोर्ट आधीच लागला होता. बोलता बोलता हा विषय मी निखिल वागळेंशी बोललो आणि पुढच्या काही वेळात राजदीप सरदेसाईंचा मला फोन आला. त्यांनी मला फोनवर अक्षरशः झापलं. हातात रिपोर्ट असूनही तुम्ही शांत कसे बसू शकता वगैरे वगैरे. माझं त्या रिपोर्ट वरचं काही काम शिल्लक होतं, तसंच मला ज्या सोर्स कडून हा रिपोर्ट आला होता, त्यांची विनंती होती की काही बाबींची पूर्तता झाल्याशिवाय रिपोर्ट पब्लिश करू नका. मी ही बाब सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र राजदीप सरदेसाईंचं म्हणणं होतं, की सरकारने केलेल्या गंभीर चुकांवर प्रधान कमिटीने भाष्य केलेले आहे, अशा वेळी आपण हा रिपोर्ट सर्व प्रकारच्या कारवाईला तोंड देण्याची तयारी ठेवून प्रसिद्ध करायला हवा. अशाच स्वरूपाची भूमिका त्यांनी अनेक बातम्यांमध्ये घेतली होती. सरकार कुणाचं ही असो, बातमी हातात असल्यावर ते चवताळून उठतात.

राजदीप सरदेसाई यांचा हा चवताळून उठण्याचा स्वभाव आपल्याला फिल्डवर काम करत असताना सातत्याने दिसून येतो. अनेकदा गर्दी तुम्हाला माहिती देत असते. लाइव्ह टीव्ही मध्ये मिळत असलेली माहिती पडताळण्याचे सोर्स कमी असतात तरी तुम्हाला ती कसरत करावी लागते. राजदीप बऱ्याचदा गर्दीसोबत वाहवत जातात, आणि त्यांना त्याबदद्ल अनेकदा ट्रोलींगचा सामना करावा लागला. गेल्या आठवडयात त्यांच्या कडून दोन चुका घडल्या. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फोटोसंदर्भातील व्हायरल पोस्ट अनेक 'ब्लू टीक' असलेल्या सेलेब्रिटी पत्रकारांनी शेअर केली. राजदीप ही त्यात होते. त्यानंतर शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी राजदीप सरदेसाईंच्या विश्लेषणात आलेली माहिती खरी नसल्याचं समोर आलं. 
राजदीप सरदेसाई आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैर सगळ्यांना माहित आहे. नरेंद्र मोदींच्या प्रचार दौऱ्यात राजदीप सरदेसाई यांना बस मध्ये मुलाखत देत असताना मोदींनी खाली बसावं लागेल अशी जागा निवडली होती. बातमीदारी करत असताना पत्रकाराला मान-अपमान काही नसतो हे मी राजदीप सरदेसाई यांच्याकडून शिकलो. त्यांच्यावर अनेकदा खूप खालच्या स्तरावर जाऊन भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवारातील लोकांनी आरोप केले. मानहानी केली. मात्र त्यांचा संयम कधी ढळला नव्हता. मात्र ते अस्वस्थ जरूर होते.

राजदीप सरदेसाई यांच्याकडून खोटी माहिती प्रसारित होईल असं मला कधी वाटलं नव्हतं, पण अशी माहिती प्रसारित झाल्यावर ते मोठ्या मनाने ते मान्य करतील आणि चूक सुधारतील, किंवा त्यांच्याशी या विषयावर बोलता येऊ शकतं इतकी जागा मात्र शिल्लक आहे. सध्या ज्या लोकांचं माध्यमांवर राज्य सुरू आहे, त्यांच्या तुलनेत हा गुणच म्हणावा लागेल.

राजदीप यांच्या निमित्ताने फेकन्यूज च्या चर्चेत खुद्द राष्ट्रपतींनी उडी मारली आहे. देशातली बहुसंख्य उजव्या विचारधारेने भारलेले चॅनेल्स दिवसरात्र फेक न्यूज-फेक नॅरेटीव्ह च्या माध्यमातून विष पसरवत असताना, तथ्याचा अंश नसलेल्या बातम्या देत असताना, जनतेच्या प्रश्नांपासून लांब जाणाऱ्या बातम्यारूपी अफवा पसरवत असताना सत्तेचं असं अचानक जागं होणं हे ही सकारात्मक पद्धतीने घेतलं पाहिजे. 
या सगळ्या ज्वलंत विषयाकडे 'एक आँख की दृष्टी' से पाहिलं पाहिजे. सगळ्या प्रकारच्या खोट्या बातम्यांबाबत एकच धोरण अवलंबलं पाहिजे. हे नजिकच्या काळात होईल की नाही माहित नाही, पण पत्रकारितेला लागलेली किड दूर करण्यासाठी आवश्यक फवारणी करणारे हात शाबूत राहिले पाहिजेत. मी एका मिनिटात खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करू शकतो असा दावा करणाऱ्या गृहमंत्र्याला जाब विचारण्याइतपत नैतिकता जोपासली गेली पाहिजे. हे सगळं व्हायला पाहिजे.

सध्या देशातील सगळंच वातावरण राजकीयदृष्ट्या भारलेले आहे. एकतर तुम्ही या गटाचे किंवा त्या गटाचे असता, नसलात तरी ते तुम्हाला रोज कुठल्यातरी गटात ढकलत असतात. दलाल, देशद्रोही, विकले गेलेले असं काही बाही बोलून तुमच्या संयमाचा कडेलोट होई पर्यंत प्रवृत्त करत असतात. अशा वेळी आपण या ट्रोलच्या जाळ्यात अडकत जातो, आणि नंतर तसंच वागू लागतो. मी स्वतः यातून गेलो आहे. त्यामुळे मी अनेक सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवरून गायब झालो. काही भरगच्च फॉलोअर्स असलेले अकाऊंट डिलीट केले. ट्रोल आणि बॉटस च्या विळख्यातून बाहेर पडणं फार गरजेचं आहे.माझा तितका अधिकार आहे की नाही मला माहित नाही पण, मला वाटतं राजदीप सरदेसाईंनी आता हे करायला हवं.

या निमित्ताने परत शोध पत्रकारिता आणि ग्राऊंड रिपोर्ट कड़े वळता येईल. विश्लेषणाच्या जंजाळातून बाहेर पडून पत्रकारितेच्या मुलभूत ढाच्याकडे-केंद्राकडे परत जाता येईल. काहीच झालं नाही तर सच्चा पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना आधार देण्यासाठी उभं राहता येईल. या नवीन प्रवासात मी सदैव तुमच्या सोबत असेन.

Tags:    

Similar News