हिट विकेट राज ठाकरे

राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत घेतलेली भुमिका आणि त्याचा राज ठाकरे यांच्याच राजकारणावर कसा विपरीत परिणाम होणार आहे. तसेच एखाद्याने गाय मारली तर आपण वासरू मारायचे नसते अशा शब्दात डॉ. विनय काटे यांनी राज ठाकरे यांच्या भुमिकेचे विश्लेषण केले आहे.;

Update: 2022-05-05 03:17 GMT

काल राज ठाकरे यांनी घेतलेली प्रेस कॉन्फरन्स ही बऱ्याच अंशी खास होती. आपण कसे कायद्याचे पालन करायला त्यांना (मुस्लिम धर्मियांना) भाग पाडत आहोत, हे सांगतानाच दुसऱ्या बाजूला त्यांनी भोंगा लावला तर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावली जाईल, हे राज यांनी सांगणे हे मुळात कायद्याच्या विरोधात जाते. एकाने कायदा तोडला म्हणून त्याला प्रत्युत्तर म्हणून आपण दुप्पट ताकदीने कायदा तोडणे याला शहाणपण म्हणत नाहीत. विधायक राजकारण तर मुळीच म्हणत नाहीत. एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारायचे नसते असे आमच्या खेड्यात अडाणी लोकसुद्धा सांगतात हो!

त्याहीपुढे जाऊन आम्हाला ते (अजान) दिवसाही ऐकायचं नाही, हे जेव्हा राज म्हणाले, तेव्हा त्यात त्यांचा धार्मिक द्वेष करणारा अजेंडा सहज दिसतो. कधी काळी याच मुस्लिम समाजातील असंख्य तरुण राज ठाकरेंच्या मागे उभा राहिले होते. जेव्हा राज ठाकरे विकासाची ब्लू प्रिंट आणि नवनिर्माण वगैरे गोष्टी करत होते. पण गेल्या 15 वर्षात राज ठाकरेंना त्यांच्या पक्षाच्या मूळ अजेंड्यावर काहीच काम करता न आल्याने त्यांनी पक्षाचे धोरण (आणि झेंडाही) बदलला आणि भाजपचे मांडलिक बनत हिंदुत्वाचा अजेंडा रेटायला सुरुवात केली. नवनिर्माण आणि विकास हा आता राज ठाकरेंचा मुद्दाच नाही हे अत्यंत दयनीय आहे.

जेव्हा कुणी कायदा किंवा सुप्रीम कोर्टाचा आदेश मानत नाही, तेव्हा पोलिसात, कोर्टात, सरकारकडे तक्रार करायची असते. हे आपल्या देशात असणारा कायदा सांगतो. पण राज ठाकरेंनी यातले काहीही न करता थेट सरकारला अल्टिमेटम द्यायला सुरुवात केली. त्यांना आपण बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे जननेते झालो आहोत आणि सरकार आपल्याविरोधात काहीही कारवाई करू शकत नाही असा भास व्हायला लागला होता. पण राज ठाकरे हे विसरले की हा एकविसाव्या शतकातला महाराष्ट्र आणि देश आहे जिथे जनता, सरकार आणि कोर्ट सगळे सजग झाले आहेत, आणि इथे कुणा नेत्याचे एकतर्फी फर्मान चालत नाही.

मुंबईतल्या मशिदींची एकूण संख्या 1300 वगैरे सांगताना, त्यात बहुतांश मशिदी अनधिकृत आहेत आणि 130 मशिदीनी आज नियम तोडला वगैरे आकडेवारी देताना राज ठाकरेंना मुंबईबाहेरचा महाराष्ट्र आठवला नाही. धार्मिक स्थळ अधिकृत कसे करतात हा प्रश्न त्यांना एखाद्या पत्रकाराने विचारायला हवा होता. महाराष्ट्रात किमान 40-50 हजार गावे असतील जिथे किमान लाखभर मंदिरे नक्कीच असतील. ह्या मंदिराची अधिकृतपणाची व्याख्या राज ठाकरे कशी करतील हे एक महान कोडे आहे. उद्या ह्या मंदिरांना भोंगे लावायचे असल्यास अधिकृतपणाचे सर्टिफिकेट देणार कोण? गंमतीचा भाग म्हणजे बोलता बोलता राज ठाकरेंनी न्याय्य भूमिका दाखवण्यासाठी मंदिरांचे भोंगे पण उतरवावे हे सांगितले.

राज ठाकरेंना कदाचित हेही माहीत नसेल की खेडेगावांमध्ये हिंदू लोकांना लग्न, बारसे, काकडआरती, सप्ताह, भजन, कीर्तन, जत्रा, यात्रा, क्रिकेट टुर्नामेंट, हरिपाठ, जयंती, मिरवणुका, वराती, जागरण गोंधळ, तमाशा, कुस्त्या, बैलगाड्याच्या शर्यती, मार्केट यार्ड मधले लिलाव वगैरे असंख्य गोष्टीसाठी भोंगे सदासर्वकाळ वापरावे लागतात. उद्या प्रत्येक ठिकाणी 55 डेसिबल (मिक्सरचा आवाज) ही मर्यादा पाळायची म्हणाले तर यातल्या प्रत्येक आयोजनातली जान निघून जाईल. मी स्वतः खेड्यात निम्मे आयुष्य घालवले आहे आणि आजही आमच्या पंढरपूरच्या घरी मध्यरात्री शेजारच्या इसबावी गावातली सप्ताहातली कीर्तने रात्रभर ऐकू येतात. कार्तिकी वारीत जनावरांच्या विक्रीचे बोली आम्ही आठवडाभर ऐकल्या आहेत. आम्हाला कधी त्या आवाजाने विशेष त्रास झाला नाही.

भोंगा हा ग्रामीण भागातील कुठल्याही सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यासाठी एक गरज असते कारण घरे दूरदूर असतात, आणि गावातील प्रत्येक माणसाला स्वतःच्या घरातून किंवा रानात काम करताना गावात काय कार्यक्रम सुरू आहे आणि तो कुठवर आलाय हे भोंग्याने सहज कळते. जेव्हा राज ठाकरे ते आणि आम्ही हे धार्मिक संदर्भाने वापरत, भोंगा हा सामाजिक प्रश्न आहे असे सांगत सरसकट कारवाईची भाषा करतात तिथे त्यांचा ग्रामीण महाराष्ट्राबद्दल अनुभव किती कच्चा आहे हे सहज कळते. त्यांचे आंदोलन शहरातील मुस्लिमांपेक्षा गावखेड्यात राहणाऱ्या हिंदूंना जास्त त्रासदायक ठरेल याची त्यांना कल्पनाच नाही. हिंदू जननायक होण्याच्या नादात राज ठाकरे येत्या काळात स्वतःच्या पक्षाला ग्रामीण भागात अजुन कमकुवत बनवणार आहेत. राज ठाकरे हिट विकेट होत आहेत!

राज ठाकरेंना शुभेच्छा...


Tags:    

Similar News