चांगली शाळा खूप मार्क ही अंधश्रद्धा: श्रीमंत कोकाटे
तुम्हाला कमी मार्क पडलेत, तुम्ही नापास झालात? चांगली शाळा कॉलेज मिळाले नाही. निराश होण्याची गरज नाही.. जगातील बुद्धिवंत आणि श्रीमंतांकडे पहा.दहावी- बारावी नापास आणि पास विद्यार्थ्याचे अभिनंदनच केलं पाहिजे असं परखड विश्लेषण करत आहे इतिहास अभ्यासक डॉ.श्रीमंत कोकाटे...
बारावीचा निकाल लागला, आता दहावीच्या निकालाची उत्सुकता आहे. निकालाची सर्वांनाच विशेषतः विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना मोठी उत्सुकता असते. आपण पास होणार की नापास होणार, आपल्याला किती मार्क पडणार, वर्गात आपला कितवा नंबर येणार ? याबद्दल कमालीची उत्सुकता असते. नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड मानसिक तणावाचे वातावरण असते. महागडी शाळा म्हणजे चांगली शाळा आणि खूप मार्कस म्हणजे हुशार - कर्तृत्ववान विद्यार्थी ही अंधश्रद्धा आहे.
बारावीचा निकाल लागला. अनुत्तीर्ण आणि उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! असंख्य विद्यार्थ्यांना भरपूर मार्क मिळाले. 90%, 95%, 97%, 88%, 80%, 75%, 70 टक्के अशी मार्कस मिळवून अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! पास विद्यार्थ्यांचे कोणीही अभिनंदन करतात, नापास विद्यार्थ्यांचेही अभिनंदन करायला हवं, पण का?
असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना 40%, 46 %, 50%, 55%, 60%, 65% मार्क्स मिळाले आहेत. काही विद्यार्थी नापास देखील झालेले आहेत, त्यांचेदेखील अभिनंदन! कारण मार्काचा आणि गुणवत्तेचा, मार्काचा आणि कर्तृत्वाचा जगात काहीही संबंध नाही. जगाचा इतिहास आणि वर्तमान पाहिला तर कमी मार्क पडणाऱ्या आणि नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांनी इतिहास घडवलेला आहे, त्यामुळे कमी मार्कस पडणाऱ्या आणि नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांनी कधीही निराश होऊ नये.
जगविख्यात शास्त्रज्ञ न्यूटन हे शिष्यवृत्तीच्या परीक्षेत नापास झाले होते. ज्यांना आफ्रिकेचे गांधी म्हटले जाते, असे नेल्सन मंडेला लॉ च्या परीक्षेत अनेकवेळा नापास झाले होते. जागतिक कीर्तीचे विद्वान, घटनेचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 37.5 टक्के मार्क मिळवून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. अमेरिकेतील जागतिक धर्म परिषदेमध्ये जाऊन विश्वविख्यात भाषण करणारे स्वामी विवेकानंद 39 टक्के मार्क मिळवून ग्रॅज्यएट झाले होते. सहावी नापास झालेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जगविख्यात रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांनी लाखो विद्यार्थी घडविले. एक दिवस शाळा शिकलेल्या आण्णा भाऊ साठे यांनी 70 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय स्तरावरची साहित्यनिर्मिती केली. त्यांच्या अनेक कादंबऱ्या अनेक भाषेत अनुवादित झाल्या. अनेक कादंबऱ्यावर लोकप्रिय चित्रपट निघाले.
देशाचे लोकप्रिय नेते मा. शरद पवार यांना मॅट्रिकला 35 टक्के मार्क्स होते. अभिनयाचा बादशहा अमिताभ बच्चन हे अलाहाबाद आकाशवाणी केंद्राच्या वृत्तनिवेदक परीक्षेत नापास झाले होते. महान चित्रपट अभिनेते निर्माते, शाहीर दादा कोंडके गणित विषयात अनेक वेळा नापास झाले होते. सैराटसारखा रेकॉर्डब्रेक मराठी चित्रपट देणारे निर्माता नागराज मंजुळे दहावीच्या परीक्षेत नापास झाले होते. हिंदकेसरी मारुती माने, गायिका लता मंगेशकर, कुस्तीपट्टू खाशाबा जाधव, महान कलाकार विठाबाई नारायणगावकर, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचे शिक्षण किती? पण त्यांचा लौकिक आंतरराष्ट्रीय स्तरावरचा आहे. अशी खूप मोठी यादी आहे की ज्यांना पास होता आले नाही, किंवा जास्त मार्क मिळाले नाहीत, पण कला, साहित्य, संगीत, क्रीडा, नाट्य, अभिनय, कृषी, उद्योग, संशोधन आणि राजकारण इत्यादी क्षेत्रात कार्य करून दाखवले. त्यामुळे मार्कस म्हणजे गुणवत्ता नव्हे.
सुप्रसिद्ध विचारवंत प्राचार्य शिवाजीराव भोसले सर नेहमी म्हणायचे "चिमणीचे पिल्लू चाळीस दिवसाचे झाले की उंचच उंच भराऱ्या मारायला लागते, परंतु माणसाचे पिल्लू चाळीस वर्षाचे झाले तरी ते स्वतःच्या पायावर नीट उभा राहू शकत नाही, कारण पंख हे आतून फुटलेले असतात, पदव्या या बाहेरून चिटकवलेल्या असतात". स्वामी विवेकानंद म्हणतात "मनुष्याच्या ठायी असणाऱ्या पूर्णत्वाचा विकास म्हणजे शिक्षण होय" तर जागतिक कीर्तीचे तत्त्ववेत्ते आचार्य ओशो रजनीश म्हणतात "विद्यापीठ आपल्याला गोल्ड मेडल देईल, पण कर्तृत्व नाही गाजवले तर ते गोल्ड मेडल तुम्हाला मिट्टी का मेडल भी नही दे सकता". थोर शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतात "मेंदू मन आणि मनगट याचा समतोल विकास म्हणजे शिक्षण होय".
परंतु दुर्दैवाने अलीकडच्या काळात शाळा, पालक, शिक्षक, विद्यार्थी मार्कांच्या पाठीमागे लागलेले आहेत, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. नवनिर्मितीची क्षमता म्हणजे शिक्षण होय, असे देखील विवेकानंद म्हणाले होते, याचा सर्वानीच गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. 90%, 95% मार्कस मिळविणारे विद्यार्थी केपलर, न्यूटन, आईन्स्टाईन, कोपर्निकस का होत नाहीत?. जास्त मार्कस पडणारे बहुतांश विध्यार्थी नोकर होतात, तर कमी मार्क असणारे किंवा नापास होणारे विद्यार्थी उद्योजक, व्यावसायिक होतात. अनेक नापास विद्यार्थ्यांनी उद्योग उभा केलेले आहेत की जेथे पास विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली.
कांहीं विद्यार्थी नापास होण्याच्या भीतीने किंवा नापास झाल्यानंतर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात त्यांना हे समजावून सांगा की मार्कांचा आणि कर्तृत्वाचा, मार्कांचा आणि गुणवत्तेचा जगात कांहीही संबंध नाही. अनेक नापास विद्यार्थ्यांनी उद्योग व्यवसाय उभे केले की जेथे आज मेरिटवाले विद्यार्थी नोकऱ्या करत आहेत. अनेक नापास विद्यार्थी मंत्री झाले की ज्यांच्या हाताखाली मेरिटवाले नोकरी करत आहेत. अनेक नापासांनी शिक्षणसंस्था काढल्या की जेथे सेट, नेट, पीएच.डीधारक नोकऱ्या करतात.
त्यामुळे कमी मार्कस पडले निराश होऊ नका, जगाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर मार्कांला पर्याय नाही. डॉक्टर,वकील, इंजिनियर होण्यासाठी मार्कस पाहिजेतच. परंतु नापास झालात, कमी मार्कस पडले म्हणून आपण पराभूत झालो, असे समजू नका. जगात खूप क्षेत्र आहेत की ज्यात नाव आणि पैसा कमावता येतो. ती क्षेत्रं तुमची वाट पहात आहेत. जीवन आणि जग खूप सुंदर आहे. फक्त सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, न्यूनगंड बाळगू नका, नापास होणे संकट नसून त्यात संधी शोधा. निराशावादी नव्हे तर प्रयत्नवादी राहा. त्यामुळे नापास आणि पास विद्यार्थ्याचे खूप खूप अभिनंदन!