#prostitutionLegal वेश्यापण स्रिया आहेत : डॉ.प्रदीप पाटील

सुप्रीम कोर्टाच्या एका निकालाने वेश्याव्यवसाय यावर चर्चा सुरू आहे. वेश्या आहेत म्हणून सामान्य स्त्रियांवरील बलात्कार वाचतात या चष्म्यातून आता वेश्यांकडे पाहणे सोडून द्यायला हवे..त्या देखील माणूस आहेत..त्यांना भावभावना आहेत आणि... आणि त्या समाजाचा घटक आहेत. त्यांचे जगणे सुसह्य होण्यासाठी आपण काय करू हे महत्त्वाचा असल्याचा सडेतोड विश्लेषण केलं आहे डॉ. प्रदीप पाटील यांनी;

Update: 2022-05-31 07:07 GMT

सेक्सचा व्यापार करणारी केंद्रे भारतात अनेक आहेत. त्यांची संख्या पावणेतीन लाखांच्या आसपास आहे. महिला व बाल कल्याण खात्याने भारतात घेतलेल्या सर्वेक्षणानुसार भारतात सात लाखांच्यावर स्त्री वेश्या आहेत. अनधिकृत आकडा किती असेल याची कल्पना करवत नाही. पैकी सुमारे ३६ टक्के मुली अठरा वर्षाच्या आतील आहेत. तर सव्वा लाख लहान मुलं-मुली आहेत. जर या वयात त्यांचा या व्यवसायात प्रवेश होत असेल तर त्यांचे नातेसंबंध कशा प्रकारचे पुढे घडत असतील? अर्थातच त्यांचा अंत हा केविलवाणाच असतो.

कोव्हीडच्या लाटांनंतर तर त्या गुलामीच्या पिंजर्यात जाऊन पडल्या आहेत. वेश्याव्यवसाय हा भारतात सर्वात हीन समजला जाणारा व्यवसाय आहे. या व्यवसायाविषयी एक प्रकारची घृणा समाजात आहे. आणि पुरुषी मानसिकता असणारे महाभाग या व्यवसायातील स्त्रीला 'कुलटा' आणि 'समाजविघातक' समजतात. नातेसंबंध म्हणजे काय हे समजायच्या आतच जर शरीर संबंधात ढकलली जात असेल तर ती या विकृत समाज व्यवस्थेचा बळी आहे.

ही विकृत समाजव्यवस्था उदारपणा आणि वैज्ञानिक ज्ञानाच्या अभावामुळे घडली आहे. खरेतर लैंगिक साक्षरता नावाची भानगड आमच्या समाजात कधीच नव्हती व आजही नाही. त्याचा दुष्परिणाम म्हणजे या देशात पसरलेली वेश्यालये! मानवाधिकार निरीक्षणानुसार आजची वेश्यांची संख्या वीस लक्ष आहे. एकट्या मुंबईत २००००० वेश्या आहेत. मुंबई सेक्सच्या व्यवसायाची राजधानी आहे. या राजधानीकडे मुलींचा ओघ येतो तो महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवरील पट्ट्यातून. ज्याला देवदासीचा पट्टा म्हंटले जाते.

भारतात काही भाग असे आहेत जे रेड लाइट एरिया समजले जातात. उदाहरणार्थ कोलकत्यातील सोनागाची, मुंबईतील कामाठीपुरा, पुण्यातील बुधवार पेठ, दिल्लीतील जी. बी. रोड, आग्र्यातील काश्मिरी मार्केट, आसाम मधील सिलचार येथील वॉर्ड नंबर १४, नागपूर येथील जमुना...

यात आता भर पडली आहे लैंगिक पर्यटनाची. वाराणसीतील मदमस्त केंद्रे, शरणपूर मधील नक्ष बाजार, मुजफ्फर मधील चतुर्भुज स्थान, आंध्र प्रदेशातील पीठापुरम आणि गुडीवाडा, अलाहाबादेतील मीरगंज, मिरत मधील कबडी बाजार ही लैंगिक पर्यटनाची केंद्रे बनली आहेत.

जर अशा ठिकाणी व इतर ठिकाणाहून आवक होत असेल तर ते रोखणे हे आव्हान असेल काय? रोखणे हे शक्य नाही. कारण भारतातील विषम समाज व्यवस्था ही याचे प्रमुख कारण आहे. परंतु दिवसेंदिवस बिघडत चाललेले नातेसंबंध आणि वाढणारे घटस्फोट हीदेखील या वाढत्या व्यवसायाला हातभार लावीत आहेत. अशावेळी पैशाचे सोंग आणायचे कोठून असा प्रश्न निर्माण होतो. पदरात मुले असतील तर परिस्थिती आणखीनच बिकट बनते.

ज्या स्त्रिया अशा रीतीने अडचणीत येतात तेव्हा त्यांना पैसे कमवण्यासाठी घर चालविण्यासाठी हा व्यवसाय सुचविला जातो. सनलाप नावाच्या कलकत्त्यातील रेड लाईट एरियात काम करणार्या संस्थेने एक सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार लग्नातून बाहेर पडणे किंवा कुटुंबाने घराबाहेर काढणे ही कारणे लैंगिक व्यवसायात शिरण्यास प्रवृत्त करतात असे दिसते.

एका सर्वेक्षणानुसार स्त्रियाच हे क्षेत्र निवडतात या समजाला धक्के बसणारे निष्कर्ष मिळाले आहेत. फक्त १४ टक्के स्त्रियांनी स्वेच्छेने हा व्यवसाय निवडलेला होता. तर उर्वरित ८६% जणींनी दलालाने या धंद्यात आणल्याचे सत्य समोर आणले.

दलाल हे या धंद्यात बरकतीची कमाई करतात. पैशांच्या भाषेत त्यांना भाडखाऊ म्हटले जाते. हे दलाल काहीवेळा अडचणीत असलेल्या आईबापांना पटवितात. शेजारी असलेल्या वाढणाऱ्या मुलींवर नजर ठेवून असतात. वयस्करांबरोबर ते संपर्कात राहून सावज पकडतात. जर आई बहीण किंवा जवळची नातेवाईक या धंद्यात असतील तर पटविणे सोपे जाते. बऱ्याच वेळा प्रेमाचे नाटक करायचे, लग्नाचे आमिष दाखवायचे किंवा मोठ्या पगाराच्या भूलथापा देऊन वेशालयात आणून सोडायचे तंत्र अवलंबले जाते.

खुद्द नवर्याने वेश्या होण्यास भाग पाडणे किंवा कॉलेजमधील मुलींना पळविणे हे प्रकार खूप कमी प्रमाणात आहेत. या दलालांपैकी एक गोष्ट चिंताजनक आहे. ७६ टक्के स्त्रिया या दलाल म्हणून काम करतात. या स्त्रिया ज्या तरुणींना या धंद्यात आणतात त्यापैकी ८०% जणी या शेजारच्या नात्यातल्या किंवा ओळखीचे असतात.

घरावर झालेल्या कर्जाच्या बदल्यात मुलींना हा व्यवसाय करायला लावणे हा एक अमानुष खेळाचा प्रकार आहे. खरे तर बाँडेड लेबर सिस्टीम (अबोलिशन) अॅक्ट १९७६ या कायद्याच्या कलमानुसार हा गुन्हा ठरतो. केंद्र सरकारने जवळपास तीस लाख जणांची सुटका आजवर केल्याचे आकडे सांगतात. मुंबईत दहा वर्षापूर्वी नेपाळी किशोरी व तरुणींची संख्या मोठ्या प्रमाणात होती. १४ वर्षाखालील सुमारे २००००० मुली या मुंबईतील वेश्यालयात विकल्या गेल्या आहेत.

वेश्यांच्या या व्यवसायामुळे त्यांचे नातेसंबंध निर्माण होणे ही एक अपघातांची मालिका असते, कारण या प्रकारचे जगणे हे कोणत्याही सामान्य माणसाच्या पचनी न पडणारी गोष्ट असते. त्यामुळे अतिशय धीराची आणि परिपक्व विचारांची ज्यांची झेप असते अशा व्यक्ती वेश्यांचे जगणे ही नाते निर्माण होण्याच्या आड येऊ देत नाहीत. याच्या अनेक कहाण्या इतिहासात देखील घडून गेल्या आहेत. परंतु हे जरी असले तरी त्यांच्या शरीरात शिरणाऱ्या व्याधी यांना मात्र अटकाव करणे कोणालाही शक्य नसते. एड्स, लैंगिक संबंधातून निर्माण होणारे इतर रोग यांना प्रतिबंध करता येऊ शकतो पण ज्या परिस्थितीत वेश्या जगत असतात व ज्या प्रकारचे गिर्हाइक त्या घेत असतात ते पाहता ते तेवढे सोपे काम उरत नाही.

गेल्या दहा वर्षात एड्सचे प्रमाण बऱ्याच अंशी खाली आले आहे. एड्स विषयी माहिती व प्रतिबंध प्रशिक्षण योजनांसाठी करोडो रुपयांची खैरात सुरुवातीस करण्यात आली होती मात्र प्रामाणिकपणे काम करणाऱ्या खूप कमी संघटना होत्या. पण त्यांनी कमी ताकदीने का असेना एड्सचे प्रमाण कमी करण्यात यश मिळवले आहे. शासनाच्या खंबीर धोरणाने देखील याला साथ दिली आहे. १९९२ मध्ये वेश्यांकडून निरोध वापरण्याच्या सक्तीचे प्रमाण २७ टक्के होते पण २००२ मध्ये हेच प्रमाण ८० टक्क्यांवर पोहोचले होते.

साधारणतः १९८० ते ९० च्या दशकातील लैंगिक संबंधित रोगांची जागा एड्सने झपाट्याने घेतली होती. त्यावेळी सुरुवातीस एड्स रुग्णांबरोबरच त्यांच्या मृत्यूचे प्रमाण देखील जास्त होते. अलीकडे मात्र हे प्रमाण घटले आहे. सरकारी दवाखान्यातून त्यावर होणारे उपचार व प्रबोधन हे त्यासाठी कारणीभूत ठरले होते. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेने यासाठी खूपच भरीव कामगिरी केली होती. त्याचबरोबर प्रबोधनासाठी झटणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या पाठीशी राष्ट्रीय एड्स नियंत्रण समिती (नॅको) उभी राहिल्याने प्रबोधन खूपच प्रभावीपणे झाले होते.

वेश्यांच्या या आजारी पडण्याच्या धोक्यामुळे त्यांचे जिव्हाळ्याचे नातेसंबंध निर्माण होणे ही स्वप्नवत गोष्ट बनवून राहिली आहे. खरे तर त्यांना जगण्याचा हक्क तर आहेच पण तो सन्मानाने जगण्याचा हक्क समाज हिरावून घेतो.

त्यात कायद्याची भर पडते. भारतात वेश्याव्यवसायासाठी लागू होणारा कायदा १९५६ चा आहे... द इम्मोरल ट्रॅफिक सप्रेशन ॲक्ट. सीटा नावाचा हा कायदा काय सांगतो? खाजगी लैंगिक व्यवसाय करण्यास मुभा आहे मात्र सार्वजनिक ठिकाणी जर या व्यवसायासंबंधी काही कृत्य केल्यास तो गुन्हा आहे. वेशालये, वेश्यांच्या चाळी, वस्त्या, दलाली, इत्यादी कृत्ये या अंतर्गत गृहीत धरली जातात. स्वेच्छेने आणि वैयक्तिक रीतीने जी स्त्री देहविक्रय करेल तेथे कायदा गप्प बसेल. सामान्य कामगार कायदे त्यांना लागू नाहीत. पण त्या या धंद्यातून सुटका करून घेऊ इच्छित असतील तर त्यांना अधिकार आहे.

व्यवहारात सीटा कायदा वापरला जात नाही. तो वापरला जातो ते वेश्यांना उपद्रव देण्यासाठी!! सार्वजनिक जागी असभ्य वर्तन, सामाजिक उपद्रव, इत्यादी कलमे लावून यांचा छळ केला जातो. सीटा कायद्यांमध्ये नवीन सुधारणा होऊन "द इम्मोरल ट्रॅफिक प्रिव्हेन्शन अॅक्ट" अस्तित्वात आला आहे. यात गिर्हाईकावरही कारवाई व्हावी अशी सुधारणा करण्याच्या शिफारशी आरोग्य मंत्रालयाने नकार दिला होता म. १९८६ मध्ये झालेल्या या कायद्याच्या सुधारणे नंतर अनेक कलमे घालण्यात आली. त्यातील काही अशी...

जी वेश्या ही आकर्षित करण्यासाठी देहप्रदर्शन करते, जी कॉल गर्ल सार्वजनिकरीत्या फोन नंबर जाहीर करते, त्यांना सहा महिने शिक्षा होते.

जे गिर्हाईक १८ वर्षे वयापेक्षा लहान स्त्रीशी लैंगिक व्यवहार करते, सार्वजनिक जागेपासून दोनशे यार्डाच्या आत असे लैंगिक व्यवहार करते, ते शिक्षेस पात्र ठरतील. लैंगिक व्यवसायातील दलाली, दलाल तसेच वेश्येबरोबर राहणारा कोणताही पुरुष शिक्षेस पात्र ठरेल.

वेश्यालये ठेवणारे मालक आणि व्यापारी हे शिक्षापात्र होत. स्त्रियांना पळविणे हलवून दुसरीकडे नेणे हे गुन्हे होत. या व्यवसायातून सुटका करून वेश्यांना पुनर्वसन केंद्रात पाठविण्याचे व संरक्षण देण्याचे बंधन शासनावर आहे. व्यवहारात कायद्याचा वापर करून वेश्यांना अभय देण्याऐवजी त्यांनाच लुटण्याचे प्रकार सर्रास घडतात. त्यांना कायद्याची नीट माहिती नसते. त्यामुळे त्यांच्यावर पोलीसी खाक्याची भीती सतत घर करत असते. त्यातून भाडखाऊ आणि गुंड यांची एक जमात तयार होते. या भाडखाऊ व गुंडांकडूनच प्रचंड छळ सातत्याने होत असल्याने वेश्यांचे जिणे मरणप्राय बनते.

बऱ्याच वेळा कायद्याचे रक्षक भक्षक बनल्याचेही आढळते. त्यामुळे अशा परिस्थितीत तणावपूर्ण जीवन जगण्यातच आयुष्य खचून जाते. अशा जीवघेण्या वातावरणात स्त्री ही स्त्री उरत नाही. ती मादी बनते. उपभोग्य वस्तू बनते. तीचे मार्केटिंग सुरू होते. अलीकडे 'एस्काॅर्टिंग ' या नावाखाली आधुनिक वेश्यालये उदयास आली आहेत. यात पुरूष वेश्या (गिगोलो) देखील धंद्यात उतरले आहेत.

वेश्या व्यवसाय हा संवाद कौशल्यांवर वाढतो आणि तगून राहतो. तो जर फक्त शरीराच्या आकर्षकतेवर उभा राहिला तर तो अल्पकाळच टिकतो. कारण शरीराच्या तजेलपणाचा काळ काही वर्षांचाच असतो. त्यानंतर शरीराची आकर्षकता ओहोटीस लागली की तीचा "भाव" घसरतो. म्हणजे पैसा कमावण्याचा काळ मर्यादित बनतो याच काळात जर वेश्येचे कोणाशी मधुर संबंध प्रस्थापित झाले तर ती वेश्या व्यवसायातून बाहेर पडते. पण हे बाहेर पडणे सुरक्षित की असुरक्षित हे त्या पुरुषावरच अवलंबून असते. त्यामुळे ती जर त्या पुरुषाकडूननही काही काळानंतर फसवली गेली तर उद्ध्वस्त होते आणि तिचे आयुष्य संपते.

खरेतर वेश्यांची मानसिकता या व्यवसायात इतकी खचते की बहुसंख्य जणींचा नाते या गोष्टींवर विश्वास राहत नाही. त्या धंद्यात येण्यापूर्वी नाते बिघडल्याने आल्यात हे त्यांच्या लक्षात येत नाही पण जेव्हा येते तेव्हा मात्र त्यांच्या दृष्टीने नाते म्हणजे ढोंग होय असेच त्यांना वाटते.

गिर्हाईक म्हणून येणाऱ्या पुरुषाची विश्वासार्हता नात्यासाठी माणूस म्हणून कशी काय वेश्या स्वीकारेल? कारण वेश्या हीदेखील स्त्रीच असते. तिला पुरुषी नजरा.. पुरुषी जुलमीपणा.. पुरुषी मानसिकता आणि पुरुषी समाजव्यवस्था चांगली समजते. कारण की या साऱ्यांचा ती बळी असते!!

वेश्या आहेत म्हणून सामान्य स्त्रियांवरील बलात्कार वाचतात या चष्म्यातून आता वेश्यांकडे पाहणे सोडून द्यायला हवे... त्या माणूस आहेत... त्यांना भावभावना आहेत आणि... आणि त्या समाजाचा घटक आहेत. त्यांचे जगणे सुसह्य होण्यासाठी आपण काय करू शकतो का याचा थोडा थांबून निदान विचार तरी करा....!

Tags:    

Similar News