पुरोगामी नेत्यांनो तुमची भूमिका सरड्यासारखी का ?
पुरोगामी महाराष्ट्रातले पुरोगामी नेते रंगबदलू सरडे झाले आहेत का ? वाचा नेत्यांच्या दलबदलूपणावर परखड भाष्य करणारा अशोक कांबळे यांचा लेख…;
महाराष्ट्राला पुरोगामी राज्य समजले जाते. या राज्यात छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले,छत्रपती शाहू महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर होऊन गेले. या थोर महापुरुषांनी देशाला दिशा देण्याचे काम केले. देश स्वातंत्र्य होण्याअगोदर त्याकाळातील तरुण पिढी स्वातंत्र्यासाठी लढत होती. त्यासाठी अनेकांनी प्राणाची आहुती देखील दिली. या काळातले नेते आपल्या विचारांवर ठाम होते. त्यांच्या विचारात धर-सोड नव्हता. देश स्वतंत्र झाल्यावर देखील हे नेते विशिष्ट्य विचारांनी प्रेरित होते. त्या विचारसरणीला बांधील होते. त्याकाळात तत्वाला अधिक महत्व होते. अलीकडच्या काळात राजकीय नेत्यांच्या भूमिका रंग बदलू सरड्या प्रमाणे झाल्या आहेत. त्यांच्या विचारात एक वाक्यता दिसत नाही. राजकीय नेते सकाळी एका पक्षाच्या स्टेजवर दिसतात तर संध्याकाळी हेच नेते दुसऱ्याच पक्षाच्या स्टेजवर दिसतात. पुरोगामी पक्षाचे नेते जनतेला फसवत असल्याचे दिसतात. स्वतःला पुरोगामी म्हणवणारे नेते ज्यावेळेस दलित,आदिवासी,मुस्लिम यांच्यावर अन्याय-अत्याचार होतो. त्यावेळेस बघ्याची भूमिका घेतात. त्यावर ठोस भूमिका घेत नाहीत. आंदोलन,मोर्चे काढत नाहीत. त्यामुळेच राज्यात जातीयवादी शक्तींचे फावते. अन्याय-अत्याचाराच्या अनेक घटनात याच पुरोगामी पक्षाचे लोक दिसून येतात. उठता - बसता फुले,शाहू,आंबेडकरांचे नाव घेणारे पुरोगामी नेते आपल्या कार्यकर्त्यावर कारवाई करत नाहीत.
पुरोगामी पक्षातील जातीयवाद
काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतःला पुरोगामी पक्ष म्हणून लोकांसमोर आणतात. परंतु खरेच हे पक्ष पुरोगामी आहेत का ? की मतापुरते हे लोक पुरोगामी पणाचे ढोंग करतात. अशी शंका येते. स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या या पक्षांनी मात्र जाती वरून आघाड्या निर्माण केल्या आहेत. यांच्या पक्षात अनुसूचित जाती सेल,ओबीसी सेल,मुस्लिम सेल अशा प्रकारची जातीवरून लेबल लावलेले नेते दिसतात. या पुरोगामी पक्षाना जातीच्या सेल वरून जातीवाद संपवायचा नाही,असेच दिसत आहे. यांच्या पक्षात दलित,मुस्लिम या जातीतील लोक राज्य कार्यकारणी,जिल्हा,तालुका या प्रमुख पदावर फारच थोड्या प्रमाणावर दिसतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी किती दलित लोकांची नेमणूक आहे. त्याचबरोबर एखाद्या जिल्ह्यात दलित,मुस्लिम जिल्हाध्यक्ष असल्यास त्याच्या हाताखाली काम करण्यास पक्षातील इतर समाजातील नेते तयार होत नाहीत. मग हे पुरोगामी पक्ष स्वतःला तर पुरोगामी म्हणतात परंतु जातीभेद पाळून पुरोगामित्व पाळतात. एखादा दलित,मुस्लिम,आदिवासी बांधव आरक्षणाने जिल्हा परिषद अध्यक्ष,पंचायत समिती सभापती किंवा इतर पदावर विराजमान झाल्यास याच पक्षातील पुरोगामी लोक त्याला जातीच्या उतरंडीतून पाहत असतात. मग स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या या पक्षातील पुरोगामीपणाचे ढोंग उघडे पडते. पुरोगामी पक्ष जर जातीयवाद पाळत नाहीत तर मग हे असले सेल कशासाठी मग,असा देखील प्रश्न उपस्थित होतोय.
दलित,आदिवासी,मुस्लिमावर अन्याय अत्याचार झाल्यास पुरोगामी आवाज उठवत नाहीत
राज्यात दलित,आदिवासी,मुस्लिम यांच्यावर अन्याय अत्याचार झाल्यास हेच पुरोगामी पक्ष आवाज उठवत नाहीत. मात्र निवडणुकीच्या काळात आम्ही कसे फुले,शाहू,आंबेडकरांचे विचार मानणारे आहोत. याचा मात्र जप करत असतात. परंतु अलीकडच्या काळात हेच पुरोगामी पणाचे ढोंग करणारे नेते भाजपला जातीयवादी म्हणतात आणि त्यांच्या बरोबर छुप्प्या युत्या करताना दिसतात. निवडणुकीच्या काळात मात्र भाजपला जातीयवादी म्हणायचे आणि निवडून आल्यानंतर या जातीयवादी पक्षाबरोबर युती करायची. हा असला पुरोगामी पणा लोकांच्या पचनी पडणार नाही. मध्यंतरी कोल्हापूरात हिंदू-मुस्लिम दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळेस या पुरोगामी लोकांनी ठोस भूमिका घेतली नाही. वर्षानुवर्षे पुरोगामी पक्ष लोकांत संभ्रम निर्माण करत आले आहेत. भाजपा आणि स्वतःला पुरोगामी म्हणवणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या एकाच नाण्याच्या बाजू असल्याच्या दिसतात.
खैरलांजी गावाला या पुरोगामी पक्षांनी दिला होता तंटामुक्तीचा पुरस्कार
देशात आणि राज्यात दलित,आदिवासी,मुस्लिम यांच्यावर राजरोसपणे अन्याय अत्याचाराच्या घटना घडत असतात. अशीच घटना खैरलांजी गावात घडली होती. या गावातील दलित कुटुंबाला जातीयवादी लोकांनी बेहाल करून मारले होते. त्यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणात दंगल उसळली होती. मोर्चे निघाले होते. या मोर्चेकर्याना तत्कालिक गृहमंत्री आर.आर पाटील यांनी नक्षलवादी संबोधले होते. दलित कुटुंबावर अन्याय अत्याचार होवून ही राज्यकर्त्यांची भाषा आरोपींना वाचवण्याची होती. मग भाजपला जातीयवादी म्हणणाऱ्या आणि स्वतःला पुरोगामी म्हणणाऱ्या पक्षात काय फरक आहे. दोघांची ही जातीयवादी मानसिक दिसून येते. यामध्ये दलित,आदिवासी,मुस्लिम भरडले जात आहेत. भाजपा उघडपणे जातीयवादावर मुस्लिम,दलितांना भीती दाखवतोय तर या भीतीचा फायदा हे पुरोगामी पक्ष घेताना दिसतात. ज्यावेस दलित,आदिवासी,मुस्लिम यांच्यावर अन्याय अत्याचार होतो. त्यावेळेस हे पुरोगामी पक्ष गपचाळीस असतात. खैरलांजी प्रकरण जगभर गाजले होते. या प्रकरणी युनोत सुद्धा आवाज उठवला होता. परंतु तत्कालीन काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरकारने या गावाला तंटामुक्तीचा पुरस्कार दिला होता. जनतेच्या रेट्याने हा पुरस्कार माघारी घेण्यात आला.
दलित,आदिवासी,मुस्लिम यांचा पुरोगामी पक्ष मतासाठी वापर करतात
भाजपा उघडपणे हिंदुत्वाचा पुरस्कार करत असल्याने दलित,आदिवासी,मुस्लिम भयभीत होतात. त्याचा फायदा हे पुरोगामी पक्ष घेतात. परंतु पुरोगामी पक्षांचे सरकार आल्यानंतर मात्र याच दलित,आदिवासी,मुस्लिम नेत्यांना न्याय मिळत नाही. राज्य मंत्रिमंडळात बोटावर मोजण्याइतके मंत्री दलित,आदिवासी,मुस्लिम असतात. या लोकांचा वापर फक्त मतासाठी होतो. या लोकांच्या समस्या वर्षानुवर्षे त्याच आहेत. मंत्रिमंडळात एकाच जातीचा जास्त भरणा केला जातो. याच जातीच्या मंत्र्यांकडे महत्वाची खाती असतात. दलित,आदिवासी मंत्र्यांकडे सामाज कल्याण मंत्रिपद दिले जाते. काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एका विशिष्ट्य जातीच्या लोकांना शैक्षणिक संस्था,शाळा,कॉलेज विविध प्रकारची कामे दिली असून याच समाजाच्या हाती सत्ता असल्याचे दिसून येते.
काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे सोयीचे पुरोगामित्व
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुरोगामित्व सोयीचे असल्याचे अनेकदा दिसून येते. मनोहर भिडे विष ओकत असताना त्याच्या कार्यक्रमाला हेच पुरोगामी लोक गेलेले दिसून येतात. तशा प्रकारचे व्हिडिओ देखील सोशल मीडिया वर आढळून येतात. मनोहर भिडे सांगली जिल्ह्यातील असून याच जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील देखील राहतात. परंतु स्थानिक पातळीवर त्याचा त्यांनी निषेध केला नाही. पुरोगामी नेत्यांचे पुरोगामित्व वेळोवेळी बेगड असल्याचे सिद्ध झाले आहे.