PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी अस्वस्थ की हतबल ?

पंतप्रधान मोदी हे जगाचं नेतृत्व करणारे नेते असल्याचे म्हटले जाते. पण तरीही पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह अस्वस्थ आणि हतबल का आहेत? नेमकं काय आहे कारण? जाणून घेण्यासाठी वाचा ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. बाळासाहेब पवार यांचा लेख....;

Update: 2023-04-12 12:43 GMT

PM Narendra Modi and Amit Shah restless due to Rahul Gandhi and today political situation News in marathi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक प्रखर हिंदुत्ववादी नेता (Hindutvavadi leader) व भारताचे आजपर्यंतचे सर्वात धाडसी पंतप्रधान अशी प्रतिमा प्रसार माध्यमांनी तयार केली आहे. त्यानंतर अतिशय नियोजनपूर्वक जगातील अनेक ठिकाणी भारतीयांचे मेळावे व सभा घेऊन जागतिक नेता अशी प्रतिमा तयार केली. पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Neharu) व इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी अलिप्ततावादी चळवळीचे (Non-Aligned Movement)नेतृत्व करत जागतिक महासत्तांना शीतयुद्ध (Cold War) काळात आव्हान दिले होते. नाम (NAM), सार्क(SARC) या संघटनांचे यशस्वी नेतृत्व केले होते. इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचा (Pakistan War) युद्धात पराभव केला आणि पाकिस्तानचे दोन तुकडे केले. हा सर्व इतिहास पुसण्याचा प्रयत्नाचा हा या सगळ्याचा एक भाग होता. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांची जगात सर्वात शक्तिशाली पंतप्रधान अशी जाणीवपूर्वक प्रतिमा तयार केली होती. अर्थात याला जागतिक मान्यता किती होती हा प्रश्न आहे? भारतीय प्रसार माध्यमे हा त्यासाठीचा निकष ठरू शकत नाहीत.

अलीकडे नरेंद्र मोदी (Narendra Modi) व अमित शहा (Amit Shah) यांची स्वतः ची वक्तव्य स्वतःचीच प्रतिमा उध्वस्त करणारी आहेत. त्यांची खंबीर कणखर प्रतिमा ढासळताना दिसत आहे. देशाचे नऊ वर्ष पंतप्रधान असतानाही त्यांचे बोलण्यातील सूर व शब्द ते अस्वस्थ असल्याची जाणीव करून देतात. ते घाबरले आहेत असा अर्थ नाही. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रा यशस्वी पूर्ण केली व त्यांची माध्यमानी केलेली आभासी प्रतिमा त्यांनी मोडून काढली. तेव्हापासून मोदी व शहा बॅकफूटवर जायला लागलेले आहेत. भारत जोडो यात्रा ते कुठेच अडवू शकले नाहीत. अनेक योजना आखल्या परंतु जनतेचा प्रतिसाद फारच प्रचंड होता. त्यामुळे काही करता आले नाही. सुरुवातीला प्रसारमाध्यमे व आयटी सेलने राहुल गांधी यांच्यावर केलेले व्यक्तिगत हल्ले अंगावर आले. चरित्र हनन करण्याचे प्रयत्न सुद्धा अपयशी ठरले. मोदी या प्रतिमेला जागतिक पातळीवर धक्का बसला. भारतीय प्रसार माध्यमानी भारत जोडो यात्रेला पूर्णपणे टाळले. पण सामाजमाध्यम व परदेशी माध्यमांनी मात्र ही यात्रा जगभर पोहोचवली व मोदी एकमेव नेतृत्व नाही तर त्यांना आव्हान देणारे नेतृत्व भारतात आहे, हा संदेश भारतात व जगात पोहोचवला गेला.

राहुल गांधी यांनी लोकसभेत अदानींचा वीस हजार कोटींचा मुद्दा उपस्थित केला . हिंडेनबर्गने (Hindenberg) अदानी प्रकरण बाहेर काढलेच होते. त्याचा फायदा उठवत लोकसभेतील मुद्दा कोणी थांबवू शकले नाही. त्याला योग्य उत्तर देताना मोदी व शहा गडबडलेले जाणवले. त्यानंतर अनेक मुद्दे काढून हा मुद्दा कसा बाजूला करता येईल, हा प्रयत्न यशस्वी होत नव्हता . त्यातच राहुल गांधी यांनी ब्रिटनमधून पुन्हा हल्ला चढवला. राहुल गांधी यांनी परकीय मदत मागितली. ते देशद्रोही आहेत व त्यांनी माफी मागायला हवी, म्हणून संसद कामकाज बंद पाडले. सत्ताधारी पक्ष कामकाज होऊ देत नाही, असे पहिल्यांदा घडत होते. राहुल भारतात आल्यावर मला बोलू द्या, म्हणून मागणी करत होते. तो हल्ला आणखीनच प्रखर होता. त्यांना बोलू दिले तर मोदी अदानी प्रकरण बाहेर येईल, या भीतीपोटी जुने प्रकरण काढून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा करून त्यांची खासदारकी रद्द करण्यात आले. या सर्व हालचाली राहुल गांधी यांच्या आरोपात सत्य असल्याच्या गोष्टींना पुष्टी देणाऱ्या होत्या. ही सत्ताधाऱ्यांची घबराट देशाला जाणवत होती. मोदी व शहा यांना या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. ना खाऊंगा ना खाणे दूंगा या घोषणेवर सत्तेत आलेल्या मोदी व अदानी यांचा संशयास्पद व्यवहार आता समोर आलाच होता.

हा पैसा अडाणीचा नाहीच तर हा पैसा मोदींचा आहे, असा आरोप अतिशय जोरदारपणे दिल्ली विधानसभेत अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी केला. ते भाषण रेकॉर्डवर आले आहे. नंतर केजरीवाल यांनी काय केले ते धक्कादायक होते. हे वीस हजार कोटी मोदींचेच आहेत, हे जनमाणसात रुजत असताना केजरीवाल मोदींच्या मदतीला धावले. त्यांनी मोदींच्या पदवीचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे सामान्य लोकांचे लक्ष मोदी-अदानी यांच्यातील 20 हजार कोटींवरून हटले गेले. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या मदतीला केजरीवाल धावून आल्याचे म्हटले जाते.

एकीकडे पदवीचा विषय काढला असताना दुसऱ्या बाजूला सावकरांचा विषय उकरून काढण्यात आला. मात्र सावरकर गौरव यात्रा यशस्वी ठरत नसल्याचे जाणवल्याने राहुल गांधी यांनी ओबीसी आणि मोदी समाजाचा अपमान केल्याचं वक्तव्य करण्यात आलं. त्यामुळे एकूणच या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर मोदी आणि शहा हे बॅकफूटवर गेल्याचे दिसून येत आहे.

अदानी प्रकरण व मोदी यांचा घनिष्ठ संबंध आहे, हे हळू हळू रुजत आहे. नरेंद्र मोदी यांच्या जागतिक नेता या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे . सर्व चोर मोदीच का आहेत? हा प्रश्न थोडा पुढे जाऊन विचार केला तर, खंबीर, कणखर जागतिक नेता ज्याला सर्व देश घाबरतात ही जी आभासी प्रतिमा तयार झाली आहे ती उघडी पडत आहे . जर एवढे मोठे नेतृत्व असेल तर ललित मोदी (Lalit Modi), नीरव मोदी (Neerav Modi), मेहुल चॉक्सी (Mehul Choksi), मल्ल्या या पळून गेलेल्या व हजारो कोटी रुपयांचा बँकांना चुना लावणाऱ्यांना भारतात का आणू शकले नाहीत? हा पैसा सामान्य भारतीय माणसांचा आहे. त्यांना पकडून आणून तुरुंगात टाकायला हवे होते. हे मोदींनी व शहा यांनी केले नाही. म्हणजे त्यांची प्रतिमा खोटी आहे हे स्पष्ट होत आहे. तरी आणखी हा मुद्दा राहुल गांधी यांनी म्हणावा तसा लावून धरला नाही . पण हे अपयश कधी तरी समोर उभे ठाकेल तेव्हा यांची गोची होईल .

मोदी व शहा यांच्या हतबलतेचे आणखी एक कारण दुर्लक्षुन चालणार नाही. ते म्हणजे आज त्यांच्या पाठीशी संघ व भाजपा पूर्ण ताकदीने उभा नाही. दिल्लीतील नेतृत्व आज या आरोपांचा प्रतिवाद करताना दिसत नाही. स्मृती इराणी, संबित पात्रा, भाटिया, रविशंकर प्रसाद हे लोक सोडता कोणी ही प्रतिवाद करत नाही. या प्रवक्त्यांना कोणीच गंभीर्याने घेत नाही. मीडियाला हवेची बदललेलि दिशा समजते आहे. त्यामुळे अनेकदा विचारलेल्या प्रश्नांमुळे या प्रवक्त्यांची फजिती होताना दिसते आहे. लोकसभेत पियुष गोयल, अनुराग ठाकूर, निशिकांत दुबे फक्त बोलत आहेत. बाकी कोणीही बोलत नाही. पियुष गोयल (Piyush Goyal) यांची हालत इतके बहुमत असताना एकटा पडलेला कार्यकर्ता अशी झाली आहे. समोरचा मारा सहन करण्याची ताकत त्यांच्यात नाही. मोदी किंवा शहा कधीच पत्रकारांना समोरे जात नाहीत ते अदानी प्रकरणी प्रेस घेऊन काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट करत नाहीत. ही अस्वस्थता भयंकर आहे. संघ व भाजपा त्यांच्याबरोबर नाही. कारण मोदी हा एकमेव चेहरा निवडून आणू शकतो, हे सर्वांना माहित आहे. पण यात चुक झाली तर ते माफ करत नाहीत. त्यामुळे या भानगडीत पडायचे नाही, ही पक्षाच्या खासदारांची भूमिका मोदी, शहापासून अलिप्त राहणारी आहे व कोणत्या मंत्र्याला काय अधिकार आहेत? कोणत्या खासदाराला कोण विचारतो? हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे ते तरी कसे मैदानात उतरतील? हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळेच हे खासदार गप्प आहेत.

कधी अमित शहा पण मोदींपासून दुरावा राखून आणि अशा प्रकारच्या मुद्द्यावरून त्यांना अडचणीत आणून पुढे होतील हे सांगता येत नाही. सी.बी.आयने मोदी यांचे नाव घेण्यासाठी माझा छळ केला, असे ते म्हणाले म्हणजे मी बोललो नाही म्हणून् मोदी आज पंतप्रधान आहेत, असे तर त्यांना सुचवायचे नाही ना? हे येणारा काळ ठरवेल. कारण राजकारणात कोणी कोणाचे नसते. असतात फक्त महत्वकांक्षा.

नरेंद्र मोदी यांचे भाषण ही असेच हतबल व व्यथित असल्याचे दर्शविते. इतके वर्ष निरंकुश सत्ता असून मला संपवण्यासाठी भारतातून व जगातून प्रयत्न होत आहेत. मला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. माझी कबर खोदू म्हणणारे लोक मला संपवायला निघाले आहेत, हे वक्तव्य त्यांची हतबलता आणि एकाकी पण दर्शविते. हे त्यांच्या सहनुभूती मिळवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या प्रतिमेला तडा देणारे वक्तव्य आहे. मोदी घाबरत नाहीत. अजिंक्य आहेत. ते पराभूत होणार नाहीत. हे तसे लोकशाहीत मिथक आहे. लोकशाहीत जनता चांगल्या चांगल्याना संपवते हा इतिहास आहे.

मोदींचा हा बदलता स्वभाव व त्यांनी पक्षात व प्रशासनात केलेली दहशत उफाळून येऊ शकत, याची जाणीव त्यांना झाली असल्याचे जाणवते. त्यामुळे मोदी इमोशनल कार्ड खेळत आहेत. मला संपवण्यासाठी सर्वजण एकवटले आहेत, हा त्यांचा दावा आहे. पण सर्वजणात त्यांच्या पक्षातील दाबलेला आवाज पण आहे, याची जाणीव त्यांना नक्की झाली असावी. त्यामुळे ही हतबलता असावी. राहुल गांधींच्या विरोधात भाजपात कोणी समोर मैदानात येत नाही. मोदी शहा त्यांच्या प्रश्नाचा सामना करत नाहीत, हे लक्षात आल्यानंतर काँग्रेसमध्ये आयुष्यभर सत्तेची उब घेतलेले जोतिरादित्य सिंधीया व गुलाम नबी आझाद यांना त्यांच्या राज्यात मुख्यमंत्री करण्याचा उद्देश ठेऊन राहुल गांधीवर आरोप करण्याचे आदेश दिलेले दिसत आहेत. सिंधीया तर थेट काँग्रेस व गांधी परिवार देशद्रोही आहे ही स्क्रिप्ट वाचत आहेत. मग हे पिढ्यान पिढी देशद्रोह्यांच्या टोळीत होते का? पण त्यांना आता ते बोलावे लागेल. पण या बाहेरून आलेल्या नेतृत्वाला मूळ भाजपा सहन करेल का? हा प्रश्न आहेच. पण यातील एक मुद्दा गंभीर आहे. तो म्हणजे मोदी अडाणी प्रकरणात मूळ भाजपा व संघ मात्र मोदींना हवी तशी साथ देत नाही. शहा त्यांना सोडून देतील हे म्हणणे मूर्खपणा ठरेल परंतु यातून मोदी यांची पक्ष व सरकारवरील पकड हळूहळू सैल होत आहे हे नक्की.

नरेंद्र मोदी यांची काही वक्तव्य अतिशय धक्कादायक आहेत. त्यावरून त्यांच्या मानसिकतेची कल्पना येते. ते इतिहासातील तथ्यांची मोडतोड करत आहेत. मी सांगतो तो इतिहास अशी मानसिकता दिसते. इतिहास बदलणे काही गोष्टी वगळणे हे का करत आहेत? भारत 2014 साली 800 वर्षानंतर स्वतंत्र झाला म्हणत त्यांनी स्वतः ची तुलना पृथ्वीराज चौहान यांच्याशी केली. एन सी ई आर टी (NCERT History Book) चा इतिहास अभ्यासक्रम बदलला. हे बरेच काही सांगून जाणारी बाब आहे. एकतर ते एकाकी आयुष्य जगतात त्याचा हा परिणाम दीर्घ काळानंतर जाणवतो आहे का? कारण माणूस कितीही मोठा झाला व समाजिक जीवनात कितीही महान दिसत असला तरी तो माणूसच असतो. त्याला सर्व भावभावना असतात व त्याची सुद्धा मनस्थिती बदलत असते, असा हा प्रकार दिसतो. पुन्हा इतिहासाकडे जात धार्मिक ध्रुवीकरण यशस्वी होईल, असे नाही. जनतेला रेशनचे धान्य देणे हा विकास नसतो. आज अर्ध्या पेक्षा जास्त लोक अन्नासाठी सरकारवर अवलंबून असतील तर हे मोदींचे अपयश आहे. हे झाकण्यासाठी केलेल्या प्रयत्नात हतबलता व धाबरट दिसत आहे

आणखी एक मुद्दा, मोदी शहा यांना एनवेळी धोका देणारा आहे. तो म्हणजे राहुल गांधीच विरोधी नेता म्हणून जाणीवपूर्वक समोर आणणे. हा अंदाज चुकणार आहे. आता ते राहुल गांधी राहिले नाहीत . राहुल गांधी मोदी सरकार हटवण्यासाठी कोणताही त्याग करू शकतात त्यांची भाषा व देहबोली बरेच काही सांगून जाते. खूप जण त्यांना व काँग्रेसला सोडून गेले. त्यांनी त्यांना थांबवले नाही, जाऊ दिले व जे राहिले त्यांना बरोबर घेत संघर्ष सुरु ठेवला. आता मोदी पराभूत होत नाहीत, हे मिथक तोडण्याचा प्रयत्न ते कर्नाटकसह उर्वरित राज्यात करतील. जिथे विधानसभा निवडणुका होत आहेत. भाजपात आज तरी कोणी बाहेर पडत नाही. पण हे मिथक जेव्हा उध्वस्त होईल तेव्हा भाजपमध्ये गेलेले सर्वजण त्यामध्ये अनेक मूळचे भाजपाचे लोक पण बाहेर पडतील, अशा घटना घडत असतात. राजकारण हा अतिशय सावध खेळ असतो. बुडत्या नावेत कोणी थांबत नाही बाहेर पडतात. यात जेव्हा फार आणीबाणीची परिस्थिती येईल व मोदी सरकार घालवण्यासाठी कोणताही टोकाचा त्याग करण्याची वेळ येईल तेव्हा राहुल गांधी त्याग करतील. त्याचा त्यांना काही फरक पडणार नाही. त्यामुळे राहुल गांधी यांना समोर ठेऊन केलेली रणनीती फसू शकते व मोदी कमकुवत भासतील तेव्हा महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यातील नेतृत्व त्यांना पर्याय म्हणून संघ पुढे करेल, हा मुद्दा दुर्लक्षुन चालणार नाही.

एकूणच मोदी हे एवढ्या सहज पध्दतीने सत्तेवरून पायउतार होणार नाहीत. परंतु येणाऱ्या निवडणुका त्यांच्या एकट्याच्या कसोटी सारख्या असतील. त्यांना त्याच त्या घोषणा साथ देणार नाहीत. गेल्या दहा वर्षात काय केले? हे सांगण्यासारखे काही नाही. भावनिक व धार्मिक मुद्दा पण महागाई व बेकारी पुढे फार टिकेल याची शक्यता नाही. एकूणच विरोधकातील कोणी मदतीला आले नाही. जसे केजरीवाल मोदीच्या मदतीला येतात ते जर आले नाही व त्यांच्या डोक्यावर असलेल्या टांगत्या तलवारीचा मुकाबला त्यांनी केला व काँग्रेस बरोबर ही आले नाही तरी मोदी शहा एकाकी पडू शकतात . राजकारण गृहीत धरण्याचे क्षेत्र नाही. बेभरवश्याचे क्षेत्र आहे. त्यामुळे मोदी कमकुवत होत आहेत, हे जाणवत आहे. हे आणखी जाणवले व राहुल गांधी व काँग्रेसचे हल्ले प्रखर झाले तर आतुन आणि बाहेरून विरोधाचा सामना करणे मोदींना शक्य होणार नाही. काँग्रेस सोडून इतर पक्ष आज शांत आहेत. पण ते मोदी कडे जातील, अशी अजिबात शक्यता नाही. कारण एकही पक्ष मोदींनी छळला नाही असं नाही. शेवटी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल आणि ती म्हणजे येणाऱ्या निवडणुका भाजप विरुद्ध नाही तर भाजपातील मोठा गट विरोधी पक्षाला मदत करेल. कदाचित संघ बाजूला राहील व मोदी शहा विरुद्ध सर्व अशी लढत होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये समोरचा शत्रू स्पष्ट आहे. त्यामुळेच अजूनही घरभेदी उघड झालेला नाही ही मोदी शहांची खरी हतबलता आहे.

Tags:    

Similar News