तुला काय कळतं ग!
तुला काय कळतं ग ? म्हणणाऱ्यांनी हे वाचण्याचं धाडस कराच;
तुला काय कळतं ग! हे वाक्य आपण अनेक घरात ऐकत आलो आहोत. कुठे ना कुठे, कधी ना कधी, महिलांना, मुलींना हे वाक्य ऐकावेच लागते. अनेक पुरुषांमध्ये महिलांना काय कळतं हा समज दृढ झाला आहे. सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात अशा समजांना खतपाणी घालणारे अनेक पेजेस सोशल मीडियावर दिसतात. त्याचा थेट परिणाम वाढत्या वयातील मुलांच्या मनावर होतो आणि त्यांनाही कुठेतरी वाटते महिलांना काही कळत नाही. यावरूनच व्हायरल झालेला एक मीम म्हणजे दोन पुरुष हातात चहा घेऊन वुमन म्हणून हसत आहेत. हा मीम जरा कुठे महिलांचे काही चुकलेकी चीपकवून देण्यात येतो. या सर्व पार्श्वभूमीवर महिला काय करू शकतात आणि महिलांनी काय केले आहे, हे ठळकपणे सांगणे गरजेचे होऊन जाते.
आज जगातील कुठेलेही क्षेत्र घेतले तरी महिलांचा वरचष्मा सहज दिसून येतो. समाजकारण, राजकारण, क्रीडा, साहित्य, चित्रपट अशा प्रत्येक क्षेत्रात महिलांचा वाटा हा मोठा आहे. जगभरात आज २८ देश असे आहेत ज्यांच्या प्रमुखपदी एक महिला आहे. हा आकडा निश्चितपणे लहान नाही.
जर्मनी हा कधीकाळी हिटलरच्या छळछावण्यांनी जगभर बदनाम झालेला देश या देशात २००५ साली सत्तेची सूत्रे हाती घेतलेल्या एका महिलेने सावरले. अँजेला मर्केल या २००५ ते २०२१ अशी तब्बल १६ वर्ष त्या जर्मनीच्या प्रमूखपदी होत्या. या काळात जर्मनीची अर्थव्यवस्था सांभाळण्याचे मोठे काम त्यांनी केले. २००८ मधील आर्थिक मंदी, ब्रेक्झित, कोरोना, रशिया युक्रेन युद्ध अशा सर्व संकटांवर मात करत या देशाला जागतिक स्तरावर मान मिळवून देण्याचे मोलाचे कार्य अँजेला मर्कल नावाच्या एका महिलेच्या नावावर आहे.
मलाला युसुफजाई नावाची तरुणी आज जागतिक स्तरावर तरुणींसाठी प्रेरणास्थान ठरली आहे. अवघ्या १४ वर्षाच्या वयात मुलींच्या शिक्षणासाठी लढा देणारी ही तरुणी आज जगात मुलींच्या शिक्षणासाठी अंबेसेडर म्हणून ओळखली जाते. जेव्हा मुलींना शिक्षण मिळणार नाही म्हणून समाजातील प्रतिगामी शक्ती उभ्या राहिल्या तेव्हा त्यांना विरोध करायला एक महिलाच पुढे आली, आणि अंगावर गोळ्या झेलूनही ही महिला मागे हटली नाही. धैर्याचे सर्वात मोठे उदाहरण मलालाने दाखवून दिले आहे.
ग्रेटा थनबर्ग नावाची फक्त २० वर्ष वय असणारी मुलगी आज जागतिक पर्यावरणवादी चळवळीचा चेहरा आहे. पर्यावरण रक्षणासाठी तिच्या कामाची ओळख जागतिक स्तरावर आहे पर्यावरण संबंधित तिचे मत जगात प्रत्येकाला लक्ष घ्यावे लागते, एवढ्या कमी वयात तिने प्राप्त केलेली विश्वासाऱ्हता ही लहान नाही. भविष्यात पर्यावरण क्षेत्रात तिच्या कामाची दखल निश्चितपणे मोठ्या प्रमाणावर घेतली जाईल.
ही काही प्रतिनिधिक उदाहरणे आहेत, जर एका महिलेने एखादे कार्य हाती घेतले तर ते किती मोठ्या प्रमाणावर तडीस नेले जाऊ शकते हेच या महिलांनी सिद्ध केले आहे. आपला विचार केला तर आज ज्या प्रकारे महिला आपलं कर्तृत्व सिद्ध करत आहेत त्यामुळे या पुरुषप्रधान मानसिकतेला तडे जातायत हे तितकंच खरं आहे पण लढा अजून संपलेला नाही. जोपर्यंत पुरुषांच्या या मानसिकतेत बदल होत नाही तोपर्यंत महिलांना हा लढा लढावाच लागणार आहे. आजही अनेक पुरुषांना महिला या नेहमी दुय्यम वाटतात. अशा पुरुषांमध्ये बदल घडवायचा असेल तर सर्वात महत्वाचं म्हणजे महिलांनी आर्थिक सक्षम होणे गरजेचे आहे. महिला सगळ्या क्षेत्रात आघाडीवर आहेत हे अगदी मान्य आहे. पण आजही अनेक महिला कर्तुत्व असूनही अशा मानसिकतेच्या लोकांमुळे दबून राहिल्या आहेत. आता त्या प्रत्येक महिलेला या विरोधात संघर्ष देण्याची गरज आहे. त्याशिवाय ही बुरसटलेली मानसिकता संपणार नाही इतकं मात्र नक्की...