शाळा, पालक आणि मूल शिक्षणाचा त्रिकोण
मुलांचा विकास करण्याची पालकांची गंडलेली व्याख्या... 'आपण जे करू शकलो नाही' चा पालकांना चावलेला किडा... शाळेची शहानिशा न करता लोकप्रियतेचा निकष बघून मुलांसाठी निवडलेली शाळा....पालकांची फक्त प्रोव्हायडर आणि ड्रायव्हर इतकीच भूमिका आपल्या पाल्याप्रति असते का? शाळांचे स्नेहसंमेलनपासून ते मुलांच्या माथी मारलेले अपेक्षांचे ओझे, अशोभनिय कृत्य त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करतेय का? शाळा, पालक आणि मूल या शिक्षणाच्या त्रिकोणाविषयी लेखिका गौरी साळवेकर यांनी मांडलेलं परखड मत नक्की वाचा;
लिहावे की नाही हा विचार करत असतानाच काही व्हिडीओ, काही बातम्या पुन्हा पुन्हा नजरेस पडतात. कुठल्याशा शाळेत प्रमुख पाहुण्या म्हणून याल का अशी विचारणा झाल्यावर मी शाळेची कार्यक्रम पत्रिका बघून 'या कार्यक्रमाला मी येणार नाही' असं सांगितल्यावर संस्थाचालकांना या दीड शहाण्या बाईला बोलावून चूकच केली असं वाटतं. त्यामुळे आज काही गोष्टी स्पष्टच मांडतेय.
हा लेख 'शाळा' या संस्थेचं सरसकटीकरण करणारा नाही, हे आधी लक्षात घ्यावे. मला कित्येक लहान-मोठ्या, साध्या-श्रीमंत चांगल्या शाळा, उत्तम संस्थाचालक माहिती आहेत. 'म्हणून आम्हाला मुलांना शाळेतच घालायचं नव्हतं' म्हणणाऱ्या, दुसरा पर्याय निवडणाऱ्या पालकांसाठीही हा लेख नाही. हा लेख त्या पालकांसाठी आहे ज्यांना शाळा, पालक आणि मूल हा शिक्षणाचा त्रिकोण, ही सामाजिक व्यवस्था मान्य आहे.
मुलांचा 'विक्कास' करणं हे आपल्या पिढीतील बहुतेक पालकांचं जीवनध्येय आहे. पण या विक्कासाची त्यांची व्याख्या थोडीशी गंडलेली आहे. व्यक्तिमत्त्व विकास ही बाहेरून करून घ्यायची गोष्ट असते आणि आपली भूमिका यात फक्त प्रोव्हायडर आणि ड्रायव्हर इतकीच असते असं अनेक पालकांना वाटत असतं. पैसे भरले, मुलांची ने आण केली, त्यांना भरपूर खायला दिलं, झालं!
सुरुवात होते शाळेपासून. शिक्षण, खेळ, कला, सगळ्याला प्रोत्साहन देणारी शाळा असावी हे अगदी मान्य आहे. फक्त इथे एक मेख असते. 'आपण जे करू शकलो नाही' चा किडा पालकांना इतका जोरात चावलेला असतो की शाळेच्या एकूण शैक्षणिक, सांस्कृतिक, भावनिक वातावरणाची कोणतीही शहानिशा न करता फक्त लोकप्रियता हा एकमेव निकष बघून मुलांसाठी शाळा निवडली जाते. तर या शाळांमधील स्नेहसंमेलन हा एका वेगळ्या लेखाचा विषय होऊ शकतो. मुलांशी अत्यंत विसंगत थिम्स, सुमार आणि कित्येकदा सवंग कंटेंटचं सादरीकरण, कॉस्च्युम डिझायनिंगच्या नावाखाली पालकांना लावलेला चुना असे अनेक मुद्दे आहेत. लेझर लाईट्स, डीजेच्या आवाजात मेंदू आणि डोळे बधिर झालेल्या पालकांना आपलं मूल 'तिथे' (स्टेजवर)आहे जिथे आपण आपल्या शालेय जीवनात कधीच पोहोचू शकलो नाही, यातच काय तो आनंद वाटत असतो. पण आपलं मूल नेमकी कोणती 'कला' सादर करतेय, त्यातून आपणच एक सवंग, रसातळाला जाणारी, व्हॅलीडेशन के लिये कुछ भी करेगा असं समजणारी पिढी तर घडवत नाहीओत ना? याचं भान पालकांना असतं का?
जे शाळेत, तेच थोड्याफार फरकाने रिएलिटी शोज आणि स्पर्धांच्या बाबतीत. आपलं मूल आशा, लता, सचिन होऊनच बाहेर पडणार याबाबत त्यांच्या मनात कोणतीही शंका नसते. पण या दिग्गजांच्या पालकांनी काय खस्ता खाल्लेल्या असतात, या लता, आशा, सचिनने लहानपणी काय तपश्चर्या केलेली असते हे आपण सोयीस्करपणे विसरतो.
सुमारांचे प्रमाणीकरण हा एक गंभीर मुद्दा होऊन बसलाय आपल्याकडे. सुमार कंटेंट, सुमार साहित्य, सवंग सादरीकरण याला आपण जर दाद देत असू तर प्रॉब्लेम आपल्यात आहे; सादर करणाऱ्यात नव्हे! नाही, मला अजिबात असं म्हणायचं नाही की शाळेने, स्पर्धांमध्ये थेट अभिषेकी बुवा, अमोणकर, उस्ताद झाकीर हुसेनच्या बंदिशी, वादन सादर करावं किंवा पं. बिरजू महाराज यांच्या तोडीचं नृत्य सादर करावं. (काही शाळा हे करतात बरं!) पण मुलांच्या त्या-त्या वेळच्या भावविश्वात नसणारे टोकाचे शृंगारिक हावभाव असलेले, नको त्या वयात नको त्या जगाला एक्सपोज करणारे कंटेंट निदान टाळावेत इतकंच म्हणणं आहे.
कोणत्याही शाळेत किंवा स्पर्धा वा रिएलिटी शोज मध्ये 'आज की रात... रात अकेली है, मालवून टाक दीप चेतवून अंग अंग, ईश्क, प्यार यावर समरसून नाचणाऱ्या वा ते गाणाऱ्या लहानग्या मुलांना आणि ते बघून भावविभोर होणाऱ्या, आता आपल्या मुलाला खूप पैसा आणि प्रसिद्धी मिळणार म्हणून लाळ गाळणाऱ्या पालकांना बघून एकच विचारावेसे वाटते:
उद्या सहा सात वर्षाची एखादी मुलगी पिवळी पुस्तकं वाचते म्हणून 'बघा तरी केवढी वाचनाची गोडी आहे तिला! वाचेना का काहीही" किंवा दहा अकरा वर्षाचा मुलगा बंदूक चालवत असेल तर ' शौर्य तरी बघा, कशी सफाईने बंदूक चालवतोय! आता मेला एखादा माणूस तर त्याचं काय मेलं एवढं?" असं म्हणायला तुमचं मन धजावेल?
पुन्हा एकदा हे ठामपणे सांगेन की प्रश्न शाळेचा, आयोजकांचा नाहीये; पालकांचा आहे. आम्ही मुलांची शाळा निवडताना एक अगदी साधा निकष ठेवला होता 'जे वातावरण घरात आहे, तेच शाळेत असावं आणि vice versa'. त्यामुळे आम्हाला खरोखरच या प्रश्नाला सामोरे जाण्याची वेळ कधी आली नाही. परंतु कौटुंबिक-सामाजिक वातावरण आणि शाळेतील वातावरण यात प्रचंड तफावत असणाऱ्या जगात कित्येक मुलं जगत आहेत. भाषा, मानसिकता, आर्थिक सामाजिक स्तर या कशाचीही मेळ न खाणाऱ्या शाळांमध्ये मुलं जात आहेत आणि ब्रँड संस्कृती, सवंग लोकप्रियता, इन्स्टंट व्हॅलीडेशन यांची चटक लागलेले पालक असे कार्यक्रम चवीचवीने बघत आहेत आणि त्यांना प्रोत्साहन देत आहेत. एकही पालक अशा कार्यक्रमाचा जाहीर निषेध करून हॉल सोडून जाऊ शकत नाही? एकही पालक मीटिंगमध्ये 'आमची मुलं या कार्यक्रमात भाग घेणार नाही, आम्ही पैसे भरणार नाही. जबरदस्ती केल्यास आम्हाला लिविंग सर्टिफिकेट द्या आणि मोकळं करा' असं का म्हणू शकत नसेल?
व्यक्तिमत्त्व विक्कास (personality development)आणि चारित्र्य बांधणी (character building) या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत हे आपल्याला कळेल तो सुदिन!
जितकी गरज पालकांना, मुलांना शाळेची आहे, त्यापेक्षा जास्त गरज शाळेला मुलांची आहे हे का विसरतो आपण?
उत्तमोत्तम पॉडकास्टचे सादरीकरण, शास्त्रीय मोहिमांच्या विषयी असणाऱ्या माहितीचे नाट्यमय सादरीकरण, AI व त्यानुसार बदलणारे जग, सैनिकांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग, पर्यावरण, बदलत्या पिढीचे प्रश्न, असे कित्येक विषय घेऊन सादरीकरण करण्याची उत्तम संधी असताना संस्था आणि मुख्यत्वे पालक काय निवडतात हा मुद्दा आपल्याला महत्वाचा वाटत नाही? का?? कला हा मुद्दाच सोडून देऊ पण हे घाण आहे, हिणकस आहे असं कुणालाच वाटू नये?
तंत्र (टेक्निक), विद्या आणि सौंदर्यबोध (एसस्थेटिक) या कशाचाही संबंध नसणाऱ्या नाचगाण्याला 'कला' म्हणायला माझी जीभ धजावत नाही!
मला यात कोणतीही शंका नाही की गणपती पुढे 'अंग भिजलं घामाने' या लावणीवर टाळ्या ,शिट्ट्या देणाऱ्या पालकांची मुलं शाळेत 'आज की रात हुस्न का मजा लिजीए' वर परफॉर्म करत असतील. शेवटी, जे आडात तेच पोहऱ्यात असणार यात दुमत नसावं!
- गौरी साळवेकर
(लेखिका)
#सुमारांचीसद्दी