नाराजी चा विस्फोट होणार?
पंकजा मुंडे समर्थक आक्रमक, देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव वाढणार का? का झाले मुंडे समर्थक आक्रमक वाचा;
गोपीनाथ मुंडे. भाजपाचे दिवंगत नेते. त्यांच्या निधनाला 6 वर्ष होऊन गेली, तरी राज्याच्या राजकारणात आजही मुंडे नावाची जादू कायम असल्याचं दिसतं. विषय राज्याच्या राजकारणाचा असो, सेना-भाजपामधल्या तणावाचा असो, मराठवाड्याचा असो, किंवा नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचा. मुंडे नावाशिवाय या कशाचीच चर्चा पूर्ण होऊ शकत नाही.
सध्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावरून भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडे नाराज असल्याचं वृत्त आहे. या चर्चेनंतर पंकजा यांना पत्रकार परिषद घेऊन आपण नाराज नसल्याचं स्पष्टीकरण द्यावं लागलं. एकीकडे पंकजा आणि त्यांचे भाजपामधले सहकारी पंकजा नाराज नसल्याचं सांगत असताना दुसरीकडे पंकजा यांच्या कार्यालयाबाहेर त्यांचे समर्थक भाजपा नेत्यांना फोडून काढण्याची भाषा करत होते.
पंकजा यांच्या अनेक समर्थकांनी भाजपामधल्या आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. अनेकजण द्यायच्या तयारीत आहेत. सोशल मीडियावर कॅम्पेन करण्यात येत आहे. राष्ट्रीय भाजपा नेत्यांच्या पोस्टवर कमेंट करून पंकजा समर्थक आपला रोष व्यक्त करत आहेत. पण याची सुरूवात कुठून झाली हे पाहणं गरजेचं आहे.
खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून होत्या. पण नंतर त्यांचं नाव मागे पडलं आणि राज्यातून नारायण राणे यांच्यासह कपिल पाटील, भारती पवार आणि डॉ. भागवत कराड यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आणि इथेच माशी शिंकली. कदाचित भागवत कराड यांना केंद्रात संधी दिली गेली नसती तर पंकजा समर्थकांची एवढी आक्रमकता दिसली नसती. पण 'मुंडे' नावाला डावलून 'कराड' नावाला थेट केंद्रात संधी मिळणं अनेकांना रुचलेलं नाही. अगदी भागवत कराड हे गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक होते आणि पंकजा यांचे समर्थक आहेत तरीही.
या विषयाला गेल्यावर्षी झालेल्या विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडीची पार्श्वभूमी आहे. पंकजा यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पक्षानं त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याची मागणी होऊ लागली. पक्ष पंकजा मुंडेंसारख्या नेतृत्वाला रिकामं ठेवणार नाही हे अपेक्षित असताना त्यांना विधान परिषदेत पाठवलं जाणार हे पक्कं मानलं जात होतं. पण ऐनवेळी पंकजा यांच्याऐवजी त्यांचेच समर्थक मानल्या जाणाऱ्या लातूरच्या रमेशअप्पा कराड यांना उमेदवारी देण्यात आली आणि ते परिषदेवर गेले.
त्यानंतर गेल्यावर्षी मार्च महिन्यात गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय डॉ. भागवत कराड यांची भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. ही निवड जेवढी भाजपा कार्यकर्त्यांसाठी धक्कादायक होती तेवढीच स्वतः कराड यांच्यासाठीही असावी. कारण, गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर कराड भाजपच्या पक्षीय राजकारणापासून बरेच दूर गेले होते. भाजपाचे उपाध्यक्ष झाल्यानंतरही अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती औपचारिक असायची. त्यामुळे स्थानिक पातळीवरच्या एका नेत्याला थेट राज्यसभेवर पाठवण्याचं कोडं अनेकांना त्यावेळी उलगडलं नाही.
या दोन्ही उदाहरणांमध्ये पंकजा यांना मिळू शकणारी संधी 'कराड' घेऊन गेले अशी साधारण भावना पंकजा समर्थकांमध्ये झाली. त्यानंतर याचा पुढचा भाग केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात पाहायला मिळतोय. खासदार प्रीतम मुंडे मंत्रिपदाच्या दावेदार असताना भागवत कराड यांना मंत्री बनवलं गेलं अशी भावना पंकजा मुंडे समर्थकांमध्ये आहे. आता या दोघांपैकी उजवा उमेदवार कोण किंवा कुणाला द्यायला हवं हा सर्वस्वी पक्षाचा निर्णय आहे. पण एकच बाब वारंवार होत असेल तर तो योगायोग निश्चितच नसावा.
प्रीतम यांची लोकसभेची दुसरीच टर्म आहे, त्यांच्याकडे आणखी बराच वेळ आहे असा सूर अनेक ठिकाणी पाहायला मिळतोय. एकाच घरात सगळ्या संधी द्यायच्या नाहीत, ही पक्षाची भूमिका आहे असंही सांगितलं जातंय. या गोष्टी मान्य केल्या तरी मुंडे नावाला बाजूला सारून सातत्यानं इतरांना ताकद दिली जात आहे हे काही लपून राहत नाही. यासाठीही मोठी पार्श्वभूमी आहे जी सर्वश्रूत आहे. मुंडे नावाच्या उमेदवाराचा विचार करायचा नाही. पण मुंडे समर्थक म्हणून राजकारण केलेल्या कार्यकर्त्यांना मोठं करत रहायचं हे दिसतं तेवढं सहजसोपं नक्कीच नाही. एखाद्याची रेष पुसता येत नाहीय म्हटल्यावर त्याबाजूला त्याच खडूची दुसरी रेष काढली की प्रश्न मिटला असं नियोजन यामागे असावं.
प्रीतम यांना मंत्रिपद न देण्याबाबत आक्षेप असण्याचं काही कारणच नाही. तो सर्वस्वी पक्षाचा निर्णय आहे. पण डॉ. भागवत कराड यांनी आपल्या खासदारकीच्या 16 महिन्यात अशी कोणती जादू दाखवली की त्यांना थेट अर्थराज्यमंत्री करण्यात आलं हा प्रश्न सहाजिकच उपस्थित होते.
बाकी, गेल्या दीड वर्षात पंकजा कितव्यांदा नाराज असल्याच्या चर्चा समोर आल्या आहेत याची एकदा उजळणी करण्याची गरज आहे. पक्षाकडून एखादा निर्णय होतो, मग पंकजा मुंडे पक्ष सोडणार, त्या नाराज आहेत अशा बातम्या समोर येतात. समर्थक चिडतात.
पक्षातले इतर नेते ताई आमच्या नेत्या आहेत, त्या नाराज नाही असं सांगतात आणि शेवटी पंकजा यांना समोर येऊन स्पष्टीकरण द्यावं लागतं आणि नाराजीनाट्य संपतं. हे चित्र अनेकवेळा दिसलंय. पण यावेळी पाणी डोक्यावरून गेल्याचं काहींच्या बोलण्यात जाणवतंय. स्वतः पंकजा यांनीही खासगीत अनेकांजवळ आपली नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय. पुढच्या एका महिन्यात त्या 'मोठा' निर्णय घेणार असल्याचं त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यानं सांगितलं. त्यासाठी कार्यकर्त्यांना तयारीत राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात. त्यामुळे पंकजा मुंडे आणि त्यांच्या समर्थकांसाठी हा काळ महत्वाचा आहे.
आता कार्यकर्ते म्हणतात तसं पंकजा खरंच 'मोठा' निर्णय घेतात, की नेहमीप्रमाणं नाराजी बासनात गुंडाळून पुढच्या राजकीय धक्क्यासाठी तयार होतात हे पाहणं औत्सुक्याचं असेल.