आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांना सहाय्य करण्यासाठी महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समितीचे गठन करण्यात आले आहे. या समितीचे मी पूर्णपणे स्वागत करत आहे. कारण या समितीच्या माध्यमातून त्या सर्व आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना त्यांच्या कुटुंबाशी जोडण्याचा प्रयत्न होणार आहे. या समितीचे मुख्य कार्य असे आहे की या समितीने आजपर्यंत आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय जे विवाह झाले आहेत त्या नोंदणीकृत किंवा अनोंदणीकृत विवाहांचा डेटा मिळवायचा व त्यांची वास्तवात असणारी परिस्थिती जाणून घेऊन त्यावर उपाय योजना करायच्या.
ज्या कुटुंबांनी त्यांच्या पाल्याने आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह केला आहे म्हणून त्यांना स्वीकारले नाही किंवा त्यांना कुटूंबातून बेदखल केलं आहे अशा विवाहित जोडप्यांच्या घरच्यांची भेट घेऊन त्यांना समुपदेशन करून आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहबद्दल त्यांच्या मनात असणारा संकोचित दृष्टिकोन बाजूला सारून त्यांना त्यांच्या पाल्याला पुन्हा कुटुंबातील सदस्य म्हणून स्वीकारायला भाग पाडण्यासाठी ही समिती काम करेल. आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह केलेल्या लोकांसाठी ही खूप आनंदाची बाब आहे की सरकारने या गोष्टीचा विचार करून त्यावर एक समिती स्थापन केली आहे.
या समितीकडून नक्कीच सकारत्मक काम घडेल अशी आपण आशा करू आणि या समितीला शुभेच्छा देऊ. या समितीवर माझा एकाच गोष्टींमुळे आक्षेप आहे तो म्हणजे समितीचे सदस्य हे आंतरजातीय विवाह केलेले असावेत. कारण ते जर आंतरजातीय विवाह केलेले असतील तरच आंतरजातीय विवाह केलेल्या लोकांचा विश्वास या समितीवर बसेल व ते या समितीच्या संपर्कात येऊन त्यांच्या अडीअडचणी समितीला सांगतील व त्यांच्या समस्येचे निवारण करतील. त्यामुळे जनतेने या समितीत असणाऱ्या सदस्यांनी आंतरजातीय विवाह केला आहे की नाही याची पडताळणी केली पाहिजे व त्यांनी जर आंतरजातीय विवाह केलेला नसेल तर त्यांच्या जागेवर ज्या लोकांनी आंतरजातीय विवाह केला आहे आणि ज्याचं सामाजिक क्षेत्रात चांगलं काम आहे. अशा लोकांना या समितीचे सदस्य म्हणून निवडण्याची गळ शासनाला घालावी. तूर्तास यावर अधिक भाष्य करणे चुकीचे होईल त्यामुळे सध्या आपण या समन्वय समितीला शुभेच्छा देऊ व त्यांना त्यांचे कार्य उत्तमरीत्या करता यावे म्हणून सहकार्याची भूमिका घेऊ, असे विधीज्ञ वैभव चौधरी यांनी म्हटले आहे.