छापा इसलिए, छापा !

Update: 2023-10-06 13:44 GMT

सरकार कुठलंही असो प्रसार माध्यमांनी कायम सरकारला प्रश्न विचारायचे असतात. चांगलं असेल तर चांगल म्हटलं पाहिजे, अन्याय-अत्याचारावर लेखणीतून आसूड ओढणं अपेक्षित असतं. प्रश्न उपस्थित करून त्यातून जनहितासाठी सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडणं माध्यमांचं काम असतं. अशा परिस्थितीत पूर्वाश्रमी मुख्य प्रवाहात काम करणाऱ्या काही पत्रकारांनी विविध डिजिटल मीडियाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करायला सुरूवात केली. त्याला नेटिझन्सनी चांगला प्रतिसाद द्यायला सुरूवात केली. मात्र, आता यापैकीच काही पत्रकारांच्या घरावरच सक्तवसुली संचलना लयानं धाडी टाकल्या आहेत. भारतात एकाच वेळी ३० पेक्षा अधिक पत्रकारांच्या घरी अशा पद्धतीनं धाडी पडल्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळं या घटनेकडं गांभिर्यानं बघितलं पाहिजे.

भारतात राजकीय नेत्यांच्या घरी सक्तवसुली संचलना लयाच्या (ED) धाडी पडत आहेत. या धाडी राजकीय द्वेषातून टाकल्या जात असल्याचा आरोप विरोधक आजही केंद्र सरकारवर करत आहेत. अशा धाडीनंतर काही नेत्यांनी तुरुंगवास भोगलाय, काहीजण आजही तुरुंगात आहेत, तर काहीजण न्यायालयीन प्रक्रियेला सामोरं जात आहेत. अशा परिस्थितीत काही पत्रकार सातत्यानं सरकारला आपापल्या स्वतंत्र माध्यमातून प्रश्न विचारत असतात.

स्वतंत्र माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांमध्ये अभिसार शर्मा, संजय राजोरा, भाषा सिंग, उर्मिलेश, प्रबीर पुरकायस्थ यांच्यासह ३० पेक्षा अधिक पत्रकारांच्या घरी ईडी नं छापेमारी केल्याची माहिती समोर आलीय. दिल्ली पोलिसांनी पत्रकारांच्या घरावर धाडी टाकून पत्रकारांचे मोबाईल, लॅपटॉप, जप्त केले आहेत. मंगळवारी (३ ऑक्टोबर) सकाळपासूनच पत्रकारांच्या घरी छापेमारी करण्यास सुरुवात करण्यात आली होती.

दिल्ली पोलिसांनी मारलेल्या धाडीनंतर ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी ट्वीट करून हीच लोकशाही आहे का ? असा सवाल उपस्थित केला आहे. राजदीप सरदेसाई यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दिल्लीतील पत्रकार आणि लेखकांच्या घरी धाडी मारल्या आहेत आणि त्यांचे फोन आणि लॅपटॉप ताब्यात घेतले आहेत. कोणत्याही वॉरंट किंवा एफआयआरशिवाय तपास सुरू आहे. लोकशाहीत पत्रकार संघराज्याचे शत्रू आहेत का ? असा सवाल राजदीप सरदेसाई यांनी उपस्थित केला आहे.

प्रकरण नेमकं काय?

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी न्यूज क्लिक या पोर्टलच्या माध्यमातून देशविरोधी अभियान चालविण्यासाठी चीन फंडिंग करत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ईडीने मनी लाँडरिंग प्रकरणी न्यूज क्लिकचे प्रधान संपादक प्रबीर पुरकायस्थ यांच्याशी संबंधित दिल्लीतील फ्लॅट जप्त केले होते. त्यापुर्वीच 2021 मध्ये दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने न्यूज क्लिकच्या फंडिंगवरून गुन्हा दाखल केला होता. तर संशयास्पदरित्या चीनकडून न्यूज क्लिकला फंडिंग मिळत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणी ईडीने ऑगस्टमध्ये कारवाई केली होती. मात्र, उच्च न्यायालयानं न्यूज क्लिकच्या प्रोमोटर्सना अटकेपासून संरक्षण दिलं होतं. हे सगळं झालं असतानाच कोणत्याही प्रकारे वॉरंट किंवा एफआयआर दाखल नसताना दिल्ली पोलिसांनी पत्रकार आणि लेखकांच्या घरी धाडी टाकल्या आहेत. त्यामुळं पत्रकारांकडून संताप व्यक्त केला जातोय. मात्र, न्यूज क्लिकची UAPA अंतर्गत चौकशी सुरू असून अद्याप FIR दाखल नसल्याचं दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आलंय.

ही कारवाई करतांना स्पेशल सेल चे ५०० पेक्षा अधिक सुरक्षा रक्षक उपस्थित असल्याचं आजतक या वृत्तवाहिनीनं म्हटलंय. याशिवाय निम्नसैनिक बलाचे जवानही उपस्थित होते. एरवी समाजामध्ये ताठ मानेनं चालणाऱ्या, समाजाकडून पत्रकार म्हणून मान-सन्मान मिळालेल्या पत्रकारांच्या घरी सुरक्षा रक्षकांच्या फौजफाट्यासह धाडी टाकण्याची खरंच आवश्यकता होती का ? असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो.

ईडी ने केलेल्या तपासात न्यूज क्लिक ला ३ वर्षात परदेशातून चुकीच्या पद्धतीनं ३८ कोटी ५ लाख रूपयांचं फॉरेन फंडिंग झाल्याचा खुलासा झालाय. हे पैसे गौतम नवलखा आणि तिस्ता सेटलवाड यांच्या हत्यांचे सहकारी आणि काही पत्रकारांना देण्यात आले होते, असंही आजतक नं आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलंय.

परदेशातून न्यूज क्लिक ला मिळालेल्या आर्थिक व्यवहाराचा खुलासा ईडीच्या तपासात झाल्याचा दावा केला जातोय. या व्यवहारात ९ कोटी ५९ लाख रूपये हे थेट परकीय गुंतवणूकीतून तर सर्विस एक्सपोर्टच्या माध्यमातून २८ कोटी ४६ लाख रूपये देण्यात आल्याचा दावाही केला जातोय. चीनमधून आलेला पैसा काही विदेशी कंपन्याच्या माध्यमातून न्यूज क्लिक पर्यंत पोहोचवण्यात आला. हाच पैसा न्यूज क्लिक शी संबंधित पत्रकारांना देण्यात आल्याचा आरोप केला जातोय.

२०२१ मध्ये दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं न्यूज क्लिक विरोधात बेकायदेशीर फंडिगशी संबंधित गुन्हा दाखल केला होता. ही संशयास्पद फंडिग न्यूज क्लिकला चीनी कंपन्यांच्या माध्यमातून मिळत होती. त्यानंतर ईडीनं गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली होती. मात्र, त्यावेळी उच्च न्यायालयानं न्यूज क्लिकच्या प्रवर्तकांना अटकेपासून दिलासा दिला होता.

सरकारच्या धोरणांवर कवितेतून टीका करणारे कवी डॉ. कुमार विश्वास म्हणूनच म्हणतात,”लष्कर तुम्हारा, सरदार तुम्हारा, तुम झूठ को सच लिख दो, अखबार तुम्हारा”. कुमार विश्वास यांच्या या कवितेतून सूज्ञ लोकांनी काय संदेश घ्यायचा तो घेतला असेलच...पत्रकारांच्या घरावरील या धाडीनंतर सोशल मीडियावर नेटिझन्सनी प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केलीय. काहींच्या मते या पत्रकारांनी सरकारविरोधात बातम्या ‘छाप’ल्या म्हणून त्यांच्यावर छापे टाकण्यात आले. 

Tags:    

Similar News