पर्यावरणाचं प्रबोधन करणाऱ्या महानोरांची उणीव जाणवेल - श्रीपाद भालचंद्र जोशी
कवी ना. धों. महानोर यांनी त्यांच्या काव्यरचनेने मराठी कवितेवर आपली स्वतंत्र मुद्रा उमटवली आहे. ही नुसतीच निसर्गकविता नाही तर ही पर्यावरणवादी कविता आहे. ते नुसते गाणेही नाही तर पर्यावरणीय प्रबोधन घडवण्याचे तसेच गीतातील, कवितेतील जानपद लोकलय जपण्याचेही मोठे कार्य नामदेव धोंडो महानोरांच्या कवितेसह त्यांच्या एकूणच कार्याने केले आहे.
कादंबरी लेखन, लोककथांचे, लोकगीतांचे संपादन, समकालीन कवितांचे प्रातिनिधिक संपादन, विपुल मराठी चित्रपट गीत लेखन, इतर गद्यलेखनही त्यांनी भरभरून केले आहे. राज्य आणि राष्ट्रीय पातळ्यांवरचे अनेक पुरस्कार, मानसन्मान त्यांना लाभले आहेत.
विधान परिषदेवर ज्या अपवादात्मक नियुक्त्या प्रतिभावंतांच्या झाल्या त्यात दोनदा विधान परिषदेवर त्यांना नियुक्त केले गेले होते. तिथेही त्यांनी त्यांची छाप उमटवली आहे.
आम्ही विदर्भ साहित्य संघाच्या वतीने घेतलेल्या पहिल्या व शेवटच्या अनियतकालिक विकास परिषदेसाठी महानोर आले होते. त्या परिषदेच्या शिफारशी त्यांनी विधान परिषदेत लावून धरल्या होत्या. परिणामी त्यावर शासनाने दोनदा समित्याही नेमल्या. ‘पद्मश्री’ प्राप्त महानोर साहित्य अकादमीच्या पुरस्काराचेही मानकरी आहेत. ‘जनस्थान पुरस्कार’ ही त्यांना मिळाला आहे. ‘मराठवाडा साहित्य संमेलन’, ‘जलसाहित्य संमेलन’, ‘औदुंबर साहित्य संमेलन’ अशा अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. मात्र मराठवाडा साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ अशा संस्थांचे अध्यक्ष राहूनही व ‘जागतिक मराठी अकादमी’, ‘साहित्य अकादमी’, ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ’, ‘चित्रपट महामंडळ’, ‘विश्वकोश निर्मिती मंडळ’ अशा साहित्य संस्थात्मक कार्याचे नेतृत्व करूनही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मात्र त्यांनी कधीच स्वीकारले नाही.
एकूणच मराठी साहित्य प्रांताला सतत जाणवत राहील अशी उणीव त्यांच्या जाण्याने आपल्या वाट्याला आली आहे.
अनेकांप्रमाणेच माझेही त्यांचे व्यक्तिगत मैत्र व परस्पर आदराचे संबंध राहिले होते.
त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली.
---श्रीपाद भालचंद्र जोशी