Pegasus साठी मोदी सरकारने इस्त्रायलकडे आपला स्वाभिमान गहाण ठेवला- रवीश कुमार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्त्रायल दौऱ्यात Pegasus सॉफ्टवेअर खरेदीचा करार झाला होता, असा गौप्यस्फोट The New York Times या वृत्तपत्राने केला आहे. यानंतर मोदी सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. मोदी सरकारच्या या कृत्यामुळे देशाचे काय नुकसान झाले यावर आपले मत मांडले आहे ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी....;
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्त्रायल दौऱ्यात Pegasus सॉफ्टवेअर खरेदीचा करार झाला होता, असा गौप्यस्फोट The New York Times या वृत्तपत्राने केला आहे. यानंतर मोदी सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. मोदी सरकारच्या या कृत्यामुळे देशाचे काय नुकसान झाले यावर आपले मत मांडले आहे ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी....रवीश कुमार यांच्या फेसबुक वॉलवरुन....
न्यूयॉर्क टाईम्सच्या रॉनेन बर्गमन आणि मार्क मजेटी यांच्या रिपोर्टने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. वर्षभर विविध देशांमध्ये जाऊन या दोघांनी Pegasus स्पायवेअर बद्दल माहिती मिळवली. या रिपोर्टनुसार मेक्सिको आणि पनामाशिवाय भारतानेही Pegasusची खरेदी केली आहे. इस्त्रायलने कशाप्रकारे या स्पायवेअरची विक्री करत जगभरात आपल्या राजकीय रणनीतीचा विस्तार केला, याची माहिती या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. या रणनीतीच्या जोरावर Pegasus ची खरेदी करणाऱ्या देशांना संयुक्त राष्ट्रात पॅलेस्टाईनविरोधात मतदान करण्यास भाग पाडण्यात आल्याचा दावा देखील या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. ज्या देशांनी इस्त्रायलकडून Pegasus खरेदी केले त्यांना आता हा देश ब्लॅकमेल करत आहे.
२०१७मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रायलला गेले होते. न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार याच दौऱ्यात Pegasus खरेदीचा करार झाला होता. विरोधी पक्षांचे नेते, पत्रकार यांच्या फोनमधील डाटा मिळवण्यासाठी आणि त्यांचे बोलणे रेकॉर्ड करण्यासाठी या वापर केला गेला. NSOचे Pegasus आणि फँटम सॉफ्टवेअरद्वारे असंख्य नागरिकांच्या फोनला कशाप्रकारे हॅक करता येते याची सविस्तर माहिती रॉनेन बर्गमन आणि मार्क मजेटी यांच्या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने NSOशी कोणतीही डील झाली नव्हती असा दावा केला आहे, पण न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार संरक्षण मंत्रालय या करारामध्ये सहभागी होते.
Pegasus चा करार हा एका स्वतंत्र देशाला एका गँगच्या हातात सोपवून देण्याचा प्रकार आहे. देशातील विरोधी पक्ष आणि पत्रकारितेचा आवाज दडपण्यासाठी या सॉफ्टवेअरची खरेदी करण्यात आली होती. पण दुसरा प्रकार पाहा, या कामासाठी दुसऱ्या देशाशी करार करताना भारताची प्रतिमा किती मलीन झाली असेल. आपल्या सत्तेसाठी या देशाचा लोकशाही स्वाभिमान इस्त्रायलच्या पायदळी तुडवण्यात आला. यापेक्षा अपमानकारक काही असूच शकत नाही. Pegasusची विक्री करुन इस्त्रायलने भारताला संयुक्त राष्ट्रसंघात पॅलेस्टाईनविरोधात मतदान करण्यास भाग पाडले. न्यूयॉर्क टाईम्सच्या या रिपोर्टमुळे देशभरात भारताची प्रतिमा मलिन झाली आहे. नरेंद्र मोदी यांची गणती आता हुकुमशाहांमध्ये होऊ लागली आहे, ही खूप लाजिरवाणी बाब आहे.
Pegasus प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात आहे. न्यूयॉर्क टाईम्सने जी माहिती दिली आहे तिथपर्यंत ही समिती पोहोचेल का ते पाहावे लागले. Pegasusची खरेदी केली आणि त्याचा वापर पाळत ठेवण्यासाठी केला गेला हे भारत सरकार नाकारत आहे. या नवीन वृत्तानंतर सरकारचे नाटक सुरू होईल की, दहशतवादाविरोधात लढण्यासाठी अशा गोष्टी खरेदी केल्या जातील. पण Pegasusची खरेदी केली की नाही, हे सांगितले जाणार नाही. या सॉफ्टेवेअरची खरेदी तर दहशतवादाच्या नावावर केली गेली, पण त्याचा वापर लोकशाहीच्या गळा घोटण्यासाठी केला गेला. विचार करा की जेव्हा नरेंद्र मोदी यांनी नेत्यानाहू यांच्याशी करार केला असेल तेव्हा त्यांच्या नजरेत भारताची प्रतिमी किती खालावली असेल, हा अपराध आहे आणि तो अक्षम्य आहे.
रवीश कुमार यांच्या फेसबुक वॉलवरुन साभार