विविधतेमध्ये एकता असं बिरूद भारतीय म्हणून आपण मिरवतोय. ते खरंही आहे. मग हीच विविधता आपल्याला अनेक घटनांमधून दिसूनही येते. आता हेच पाहा. तामिळनाडूचा १८ वर्षीय बुद्धिबळपटू रमेशबाबू प्रज्ञानानंद यानं जगातला पहिल्या क्रमांकाचा बुद्धिबळपटू असलेल्या मॅग्नस कार्लसनला जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत कडवी झुंज दिली. कार्लसनच्या अनुभवापुढे रमेशबाबूला पराभूत व्हावं लागलं. रमेशबाबूचं कौतुक सगळीकडे सुरू असतानांच उत्तरप्रदेशमधील मुजफ्परनगर इथल्या शाळेतला एक व्हिडिओ व्हायरल झाला. या दोन्ही घटना एकाच आठवड्यात घडल्या आहेत. या दोन्ही घटना भारताच्या दोन टोकांमधील मुलांशी निगडीत आहेत.
ग्रँडमास्टर रमेशबाबू प्रज्ञानानंद हा दक्षिणेतल्या तामिळनाडू राज्याचा आहे. कुटुंबातच बुद्धिबळाला पूरक असं वातावरण असल्यानं प्रज्ञानानंदला बुद्धिबळाचे बारकावे शिकायला वेळ लागला नाही. अगदी शातं दिसणारा रमेशबाबू हा इतर मुलांसारखाच अगदी नॉर्मल दिसतो. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासूनच रमेशबाबू हा प्रसिद्धीच्या झोकात राहिलेला आहे. मात्र, असं असलं तरी त्याची देहबोली आणि राहणी अगदी सामान्य आहे. तसंही इथले नेते असो की लोकं असो कपाळावर पांढरा टिळा, लुंगी हा साधारणतः तामिळनाडूच्या लोकांचा पेहराव असतो. अगदी जगात कुठेही गेले तरी त्यात फार फरक होऊ दिला जात नाही.
दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील मंसुरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुब्बापूर या गावातल्या एका खासगी शाळेतला व्हिडिओ व्हायरल होतोय. गृहपाठ न केलेल्या एका विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्यांकरवी मुख्याध्यापक असलेल्या तृप्ता त्यागी यांनी मारहाण करायला लावल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये या शिक्षिकेनं “मुहम्मदन मां को अपने बच्चो को उनके मामा के घर नहीं ले जाना चाहिए क्योंकि परीक्षा नजदीक आ रही है” असं वक्तव्यं केल्याचं म्हटलंय. मात्र, सोयीनुसार हा व्हिडिओ एडिट करून व्हायरल करण्यात आल्याचं त्यागी यांचं म्हणणं आहे. मुख्याध्यापक असलेल्या त्यागी या अपंग असल्यानं इतर मुलांकडून त्या मुलाला शिक्षा म्हणून मारहाण केल्याचं त्यांनी मान्य केलंय. यात हिंदू-मुस्लीम असा वाद नको असं त्या पीडित मुलाच्या वडीलांचंही म्हणणं आहे. या घटनेनंतर त्यांनी आपल्या मुलाला या शाळेतून काढलंय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटतातच. झालंही अगदी तसंच. काँग्रेस आणि एमआयएमच्या नेत्यांनी या घटनेच्या अनुषंगानं भाजपवर जोरदार टीका केली.
हा व्हायरल व्हिडिओ पीडित मुलाच्या चुलत भावानचं काढलाय. त्यामुळं त्याच्याकडूनच हा व्हिडिओ व्हायरल झाला असण्याची शक्यता आहे. यामागे त्याचा हेतू काय होता, हे अद्याप स्पष्ट नाहीये. या व्हिडिओमध्ये एक विद्यार्थी उभा आहे, त्याला आळीपाळीनं इतर विद्यार्थी येऊन तोंडावर चापट किंवा पाठीवर धपाटा लगावत असल्याचं स्पष्ट दिसतंय. इतकंच काय तर इतर विद्यार्थ्यांना जोरात चापट लावा, असंही या मुख्याध्यापक बोलतांना दिसत आहेत. मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी जर त्याला शिक्षकानं शिक्षा केली असेल तर त्यात गैर काय ? मात्र, ही शिक्षा त्या विद्यार्थ्याच्या मनाला लागेल अशी नसावी. इतर मुलांकडून सर्वांसमक्ष त्या विद्यार्थ्याच्या कानशिलात, तोंडावर, पाठीवर चापटा मारून त्या मुख्याध्यापिकेनं काय साध्य केलं ? असं केल्यामुळं त्या विद्यार्थ्याच्या मानसिकतेत काही फरक पडण्याऐवजी त्यावर आघातच जास्त होणार आहे. कारण हा व्हिडिओ इतक्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालाय, की तो इतक्या सहजासहजी डिलिट होणं केवळ अशक्य आहे. त्यामुळं तो जेव्हा सज्ञान होईल त्यावेळीही हा व्हिडिओ इंटरनेटवर सहज उपलब्ध असेल. त्यावेळी त्या मुलाची मानसिकता कशी असेल, याचा विचार ना तो व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याने केला असेल ना तो व्हिडिओ वारंवार बातम्यांमधून दाखविणाऱ्या माध्यमांनी. अशा घटनांनी पीडित कुटुंबियांच्या सोशल स्टेटस्, त्यांच्या मानसिकतेचा विचार कोण करणार ? माध्यमांमध्ये कामं करणाऱ्या लोकांनी फक्त त्या पीडित कुटुंबाच्या जागी एकदा स्वतःला ठेवून विचार केला पाहिजे. अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांना तात्काळ मिळतील. माध्यमांकडे बातम्यांचे विषय संपलेत का ? असा थेट प्रश्न बातम्या देणारे राजकीय नेते जसे विचारतात, तसंच सामान्य वाचक-प्रेक्षकही सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट मुख्य प्रवाहातील माध्यमांनाच विचारू लागले आहेत.
जेव्हा एखाद्या पक्षाची एकहाती सत्ता असते त्यावेळी माध्यमांची भूमिका ही लोकशाहीमध्ये अधिक जबाबदारीची होते. एरव्ही पण असं म्हटलं जातं की सरकार कुणाचंही, कसंही असलं तरी माध्यमांनी विरोधी पक्षाच्या भूमिकेतूनच सरकारला प्रश्न विचारले पाहिजे, जिथं चूक तिथं चूकच म्हटलं पाहिजे आणि चांगल्या कामांची स्तुती करतांनाही हात अखडता घेता कामा नये. मात्र, आता मुख्य प्रवाहातील माध्यमांसमोर सध्या दोन मोठी आव्हानं दिसत आहेत. एक आहे समाज माध्यमांनी उभं केलेलं आव्हान आणि दुसरं माध्यमांच्या अर्थकारणावर राजकीय नेते, कॉर्पोरेट कंपन्याचा असलेला प्रभाव. या दोन्ही आव्हानांना सामोरं जातांना मुख्य प्रवाहातील माध्यमांना नक्कीच त्रास होत असणार. सध्या लोकं उघडपणे माध्यमांना शिव्या, टोमणे मारायला लागलेले आहेत. तर दुसरीकडे अजूनही एक मोठा वर्ग वर्तमानपत्र किंवा टिव्हीवर बातम्या पाहिल्याशिवाय ज्यांचा दिवस सुरू होत नाही असा आहे. त्यामुळं स्वतःची पत टिकवून ठेवण्यासाठी आणि पत्रकारितेवरील विश्वास आणखी दृढ करण्यासाठी माध्यमांनी मोडेन पण वाकणार नाही, अशी भूमिका घेऊनच पत्रकारिता करण्याची गरज आहे. अन्यथा पत्रकारितेच्या घसरत जाणाऱ्या दर्जाच्या सामूहिक जबाबदारीपासून मुख्य प्रवाहातील माध्यमांना स्वतःला दूर ठेवता येणार नाही.