राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्याचा "भावी अनर्थ" – प्रा. सचिन गरुड

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचा आरोप केला आहे. पण त्यांचे हे वक्तव्य ओघाने आले आहे का, मुंबईतील आर्थिक शक्ती कुणाच्या ताब्यात आहे, महाराष्ट्रातच महाराष्ट्राविरोधात वक्तव्य करण्याची हिंमत कोश्यारी का करु शकतात, यासर्व प्रश्नांची चर्चा करणारे प्रा. सचिन गरुड यांचे विश्लेषण

Update: 2022-07-30 12:56 GMT

महाराष्ट्रात मध्ययुगापासून उद्योगधंदा - व्यापाराची फार मोठी वाढ झाल्याचे दिसत नाही. महाराष्ट्रात खास वैश्य व बनिया जातीही नाहीत. बनिया, बोहरी, पारशी व्यापारी सतराव्या शतकात महाराष्ट्रात आले. तत्पूर्वी विजयनगर साम्राज्यातील शेट्टी, मलबारी, रेड्डी हे दक्षिणेकडील व्यापारीही महाराष्ट्राकडे फिरकले नाहीत. महाराष्ट्राच्या समुद्रकिनारपट्टीवरील व्यापारही युरोपियनांच्या आगमनानंतर सोळाव्या- सतराव्या शतकात वाढत गेला.

वसाहत काळात मुंबईचा भांडवली विकास गतिमान झाला. त्यावेळी ब्रिटीश आणि बनिया, पारशी व्यापारी यांच्या साटेलोट्यातून गुजराती, मारवाडी बनिया व्यापारी भांडवलदारांकडे भांडवल संचयन व संपत्ती-मालमत्ता वाढल्याचे दिसते. हा व्यापारी भांडवलदार वर्ग जातीय उतरंडीच्या शोषणातून उभा राहिला. त्यामुळे मुंबईत भूमिपुत्र, मराठी बहुजन जातीजमातीय, कामगार-कष्टकरी आणि बनिया, पारशी व्यापारी भांडवलदारी जातीवर्ग यांच्यातील शोषण-शासन संबंध निर्माण झाले. फुले-शाहू -आंबेडकर यांच्या व डाव्या चळवळींनी बहुजन, जातीजमातीय कामगार कष्टकरी वर्गाच्या बाजूने या भांडवलदारी जातीवर्गाच्या शोषण-शासनाविरुद्ध लढा गतीमान ठेवला. संयुक्त महाराष्ट्राच्या ज्या चळवळीतून मुंबईसह महाराष्ट्र साकारला, त्या लढ्याला वरील जातीविरोधी व भांडवलदारी शोषण-शासनविरोधी या चळवळीचा आधार होता. त्यात आरएसएस नव्हते, आणि शिवसेना तर स्थापनही झाली नव्हती.

मुंबईची संपत्ती ही मूलतः ब्राह्मण- बनिया जातीवर्ग निर्माण करतो, असा विचार संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या संघर्षापासून हा विरोधी प्रवाह मांडत आला आहे. आज ह्या विरोधी ताकतीची व्याप्ती व क्षमता वाढली आहे. त्यामुळे आज महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी हाच विचार उघडपणे बोलून दाखवीत आहेत.

मुंबईसह महाराष्ट्राची संपत्ती केवळ बनिया, पारशी जातीवर्ग निर्माण करीत नाही तर तो येथील सर्व जातधर्मीय कामगार, कष्टकरी, शेतकरी व मध्यमवर्ग निर्माण करतो. फुले-आंबेडकरी, समाजवादी व डाव्या चळवळी आज मोठ्या प्रमाणात दुर्बल झाल्या असून प्रतिगामी, जात-जमातवादी फाशिवादी उजव्या शक्तींना सत्ताबळ मिळाले आहे. ह्या शक्ती संघ-भाजप असून शिवसेनेसारख्या उजव्या प्रादेशिक पक्षाला संपवू पाहत आहेत. कोश्यारी हे संघाचे केडर असून ते सत्तेच्या जोरावर असे बोलू शकतात. आणि फुले-आंबेडकरी, समाजवादी व डाव्या चळवळीच्या दुर्बलीकरणामुळे त्यांना राजकीय पातळीवर कोणीही संघटनात्मक ठोस विरोध करू शकत नाही याचीही त्यांना पूर्ण खात्री आहे.

शिवसेना ही प्रादेशिकवादावर वाढली असली तरी ती सुरवातीपासूनच फुले-आंबेडकरी, समाजवादी व डाव्या चळवळीच्या विरोधात होती. काँग्रेसच्या उच्चजातवर्गीय सत्ताकारणाने सेनेची अशी समांतर वाढ करण्यास हातभार लावला. १९८७ नंतर सेनेच्या खांद्यावर बसून भाजप वाढली आहे. मुंबईत मराठी माणसाचा मुद्दा आणि मुंबईबाहेर उर्वरित राज्यात हिंदुत्त्वाचा मुद्दा असा दुटप्पी राजकीय व्यवहार केल्याने 'बिगरकाँग्रेसी' हिंदुत्त्ववादी उच्चजातवर्गीय सत्ताकारण आणि अर्थकारण बळकट झाले आहे.

अर्थात यात मराठी बहुजन दलित जातीजमातींचे भले होणार नव्हते, आज मुंबईतील झोपडपट्टयात कोणते समाजघटक अत्यंत हलाखीच्या स्थितीत राहतात? दक्षिणेतील राजकीय पक्षांनी ज्याप्रमाणे तेथील भाषा आणि आर्थिक शक्ती तेथील प्रादेशिक समाजघटकांच्या ताब्यात ठेवण्याचा सामाजिक-राजकीय व्यवहार विकसित केला तसा शिवसेनेने किती प्रयत्न केला ? मराठी व्यावसायिकांना पुढे आणण्यास काहीही प्रयत्न केले नाही. मुंबईत १० टक्केही मराठी महाराष्ट्रीयन माणूस उरला नाही. मुंबईत सर्व्हिस सेक्टरमध्ये दुय्यम तिय्यम सेवा मराठी माणूस करत आहे. आणि मुंबई-ठाण्याचे सर्व आर्थिक स्त्रोत गुजराती, मारवाडी, राजस्थानी, उत्तर भारतीय आदींच्या हातात एकवटत आहे, हे आर्थिक वास्तव मात्र नाकारून चालणार नाही. मुंबई महापालिकेतील बहुसंख्य कॉन्ट्रॅक्टर्स राजस्थानी, उत्तर भारतीय आहेत. तेथील सेनेच्या स्थानिक नेत्यांना ते कमिशन देत असतात. ते कशाला पुन्हा सेनेची सत्ता आणण्यास उत्सुक असतील?

आता शिंदेगटामार्फत भाजप शिवसेनेला अस्तित्वाच्या निम्न स्तरावर संघर्ष करायला लावेल. ठाकरे सेनेचे उदार सहिष्णू हिंदुत्त्व आणि मराठी माणूस हा अजेंडा भाजपच्या जातीआधारित गुजराती, मारवाडी, बनिया भांडवलदारी वर्गाच्या शक्तीपुढे टिकणार नाही. यांना टक्कर फुले-आंबेडकरी व डाव्या चळवळीचा विचार व संघटन देऊ शकतात. पण ते आज मैदानात नाहीत.

कोशारींच्या या वक्तव्याचा अर्थ असा की, मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीनंतर मुंबईची सत्ता संघ-भाजपकडे आल्यानंतर मुंबईवर सरळ सरळ गुजराती, मारवाडी बनिया, भांडवलदारी जातीवर्गाच्या आर्थिक सत्तेचा पाया पक्का करण्याचा मनसुबा आहे. मग यथावकाश मुंबईची केंद्रशासित प्रदेश म्हणून राजकीय विभागणी करता येईल.

Tags:    

Similar News